सुमित पाकलवार, लोकसत्ता
गडचिरोली: क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाने दावा केल्यामुळे सध्या जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यासंदर्भात नुकतीच मुंबई येथे काँग्रेसची बैठक पार पडली. यात हा मतदारसंघ काँग्रेस लढविणार असे नेत्यांनी जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसने सुध्दा याविषयी चर्चेसाठी १४ जूनला बैठकीचे आयोजन केले आहे. त्यात याविषयी मंथन होणार आहे. अंतिम निर्णय जरी पक्ष नेतृत्व घेणार असले तरी सध्या स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षात रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
दोन वर्षांपूर्वी गडचिरोली दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी देसाईगंज येथील सभेत २०२४ ला लोकसभा आमदार धर्मरावबाबा आत्राम लढविणार असे थेट जाहीर केले होते. तेव्हापासून आमदार आत्राम यांनी सुध्दा लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव गडचिरोली-चिमूर लोकसभेत भाजपपुढे आजपर्यंत काँग्रेसनेच आव्हान उभे केले आहे. त्यामुळे स्थानिकांसह वरिष्ठ नेते देखील या जागेसाठी आग्रही आहेत. काँग्रेसकडून २००९ मध्ये मारोतराव कोवासे यांनी बाजी मारली होती. त्यांनतर सलग दोनवेळा भाजपचे अशोक नेते यांनी विजयश्री मिळविली. त्यामुळे यावेळेस सत्ताविरोधी वातावरणाचा लाभ काँग्रेसला होऊ शकतो, असा दावा नेते करीत आहे. त्यादृष्टीने काँग्रेसने तयारी देखील चालविली आहे. काँग्रेसचे नेते डॉ. नामदेव किरसान यांनी मागील दहावर्षापासून संपूर्ण लोकसभा क्षेत्र पिंजून काढला आहे. त्यामुळे याहीवेळी ते दावा करणार आहेत. पक्षनेतृत्व देखील त्यांच्या नावासाठी अनुकूल असल्याचे कळते.
आणखी वाचा- रावसाहेब दानवेंनी आतापासूनच निवडणुकीसाठी कंबर कसली
परंतु आघाडीत घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदाच ताकदीने दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर सार्वत्रिक झालेल्या महाविकास आघाडीच्या यादीत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव होते. त्यामुळे दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांसह कार्यकर्ते देखील बुचकळ्यात पडले आहे. लोकसभेसाठी आता केवळ दहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे यावर लवकर तोडगा निघाल्यास मोर्चेबांधणीला वेग देता येईल असे दोन्ही पक्षातील नेते खासगीत बोलताना दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे ‘धर्मरावबाबा’ एकमेव पर्याय
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून गडचिरोली जिल्ह्यात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी पक्षाचा विस्तार केला. त्यांना पक्षाने दोनदा राज्यमंत्री केले. ते अहेरी विधानसभेचे नेतृत्व करतात. त्यांची राजकीय कारकीर्द आणि वलय बघता यावेळेस लोकसभेत चुरस पाहायला मिळणार आहे. परंतु जिल्ह्यात अहेरी विधानसभा वगळता राष्ट्रवादीचे फारसे प्राबल्य नाही. आणि त्यात धर्मरावबाबा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असे समीकरण असल्याने पक्षापुढे त्यांच्याशिवाय पर्याय नाही. मात्र, पक्षाच्या चिन्हावर लोकसभा लढविण्याबाबत एकदा नेतृत्वाने विचार करायला हवे असाही मतप्रवाह पक्षात आहे.