Maharashtra Political News Today : राज्यात आज दिवसभरात अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. आयएएस तुकाराम मुंढे यांना त्यांच्याविरोधात झालेल्या आरोपांमधून अधिकृतरीत्या क्लीन चीट देण्यात आली… अमित शाह यांना देवेंद्र फडणवीसांना चेकमेट करायचे आहे, म्हणूनच ते एकनाथ शिंदेंना ताकद देत असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला… नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी केल्याने शिंदे-पवार गटातील नेते अस्वस्थ झाल्याची चर्चा रंगली… मुंबईत भाजपाचा नव्हे तर महायुतीचाच महापौर होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केला… ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भारतरत्न देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांनी केली… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट
आयएएस तुकाराम मुंढे यांना त्यांच्याविरोधात झालेल्या आरोपांमधून अधिकृतरीत्या क्लीन चीट देण्यात आली आहे. नागपूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आणि स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी असताना तुकाराम मुंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. या दोन्ही प्रकरणांमधील चौकशीत ते निर्दोष असल्याचे सरकारमधील मंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. तरीदेखील महिला अधिकाऱ्यांशी गैरव्यवहारप्रकरणी मुंढे यांची चौकशी अंतिम टप्प्यात असून, अहवाल महिनाभरात सादर होईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना सामंत यांनी मुंढेंना क्लीन चीट दिल्याचे माहिती दिली. खोपडे यांनी मुंढे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर तत्कालीन महापौर संदीप जोशी आणि आमदार प्रवीण दटके यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली होती.
फडणवीसांना चेकमेट करण्याचा प्रयत्न?
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधुम सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेतून एक खळबळजनक दावा केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना चेकमेट करायचे आहे, म्हणूनच ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताकद देत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा महायुतीला विरोध असल्याचा दावाही राऊत यांनी केला. एकनाथ शिंदेंना ताकद दिली जात आहे, जेणेकरून फडणवीसांना दिल्लीत येण्यापासून रोखता येईल, असेही राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा अमित शाहाचा पक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण हें महायुतीच्या विरोधात आहे. दोन ठाकरे एकत्र आले याची त्यांना भीती आहे. अशी टीकाही राऊत यांनी केली.
आणखी वाचा : शशी थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा दणदणीत विजय; डाव्यांसह काँग्रेसचा पराभव; केरळमध्ये अखेर शिरकाव?
शिंदे-पवार गटाला भाजपाची धास्ती?
आगामी महापालिकेच्या निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जातील असे भाजपाने स्पष्ट केले असले तरी नाशिकमध्ये मात्र शिंदे-पवार गटात अस्वस्थता असल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाने नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केल्याने महायुतीतील या दोन्ही मित्रपक्षांमधील नेते अस्वस्थ झाल्याची चर्चा रंगली आहे. भाजपा महायुती म्हणून आपणास जवळ करेल काय, अशी त्यांना धास्ती वाटत असून त्यास कारणही तसेच आहे. भाजपाच्या वतीने नाशिक महापालिकेसाठी उमेदवार निवड प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा लवकरच सर्व प्रभागांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहे. ही मुलाखत प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याचे भाजपाचे म्हणणे आहे. महायुती म्हणून निवडणूक लढवायची असेल तर भाजपाने सर्वच प्रभागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्याची काय गरज, अशी कुजबूज प्रश्न शिंदे गट आणि अजित पवार गटातील नेत्यांमध्ये सुरू आहे.
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार : फडणवीस
मुंबईत भाजपाचा नव्हे तर महायुतीचाच महापौर होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त संधी मिळावी असे कार्यकर्त्यांना वाटते. परंतु आम्ही महायुती म्हणून एकत्रित निवडणूक लढवणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये फारशी नाराजी नाही. आमच्यासाठी मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकविणे हे जास्त महत्त्वाचे आहे. मुंबईत भाजपाचा नव्हे तर महायुतीचाच महापौर होणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपाने जास्त जागांची मागणी केलेली नाही. तिथेही केवळ शिवसेना आणि भाजपा हेच दोन प्रमुख पक्ष आहेत. गेल्या वेळच्या महापालिका निवडणुकीत भाजपाच्या ४२ जागा आल्या होत्या. त्यामुळे आम्ही आपापसात बसून जागावाटप करू, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : भाजपामधील वाद उफाळला; पंतप्रधान मोदींच्या खासदारांना महत्वाच्या सूचना, नेमकं काय घडतंय?
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भारतरत्न देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी केली. १२ डिसेंबर रोजी शरद यांचा ८५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने देशभरातील राजकीय नेते आणि अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यादरम्यान खासदार निलेश लंके यांनी शरद पवार यांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीला समर्थन दिले. शरद पवार असे एकमेव कृषी मंत्री आहेत, ज्यांच्या काळात शेतकऱ्यांना ७२ हजार कोटींची विक्रमी कर्जमाफी मिळाली आहे. तसेच देशाच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांमध्येही त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अशी भावना आहे की, शरद पवारांना भारतरत्न पुरस्काराने गौरविले गेले पाहिजे. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनातही आम्ही याबद्दलची मागणी करू, असेही खासदार निलेश लंके म्हणाले.
