सुहास सरदेशमुख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सेवा पंधरवाड्यात कार्यकर्त्यांनी प्रत्येकी पाच घरात जाऊन खादी विक्री करावी, असा उपक्रम भाजपकडून आखण्यात आला आहे. मात्र, हा उपक्रम स्वातंत्र्य चळवळीतील प्रतिकांच्या पळवापळवीचा प्रकार असल्याचा आक्षेप आता घेतला जात आहे.

कोविडकाळात खादी उत्पादनात चाैपट वाढ झाली आहे. त्यामुळे खादीचे अर्थकारण बदलण्यास त्यामुळे मदत होईल असा दावा करण्यात आला आहे. भाजपच्या वतीने १७ स्पटेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ असा बंध जपत हे अभियान हाती घेतल्याचा दावा केला जात आहे. मात्र खादीच्या विक्रीच्या निर्णयावर आता बोट ठेवले जात आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी म्हणाले, ‘खादी ही काही वस्तू नाही. तो स्वातंत्र्य चळवळीतील स्वाभिमानाचा बंध आहे. त्यामुळे खादी वाढवायची असेल तर ग्रामीण भागात कापूस प्रक्रिया उद्योगातून सर्वसामान्यांना बळ द्यायला हवे. तसे होताना दिसत नाही.

हेही वाचा… ठाणे ग्रामीणमध्येही शिवसेनेला अखेर मोठा धक्का; संपूर्ण जिल्ह्यात वर्चस्वासाठी शिंदे गटाची मोहीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सूत कातत आहेत असे छायाचित्र प्रकाशित झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त खादी विक्रीची माेहीम भाजपकडून हाती घेतली जात आहे. कोविड काळात खादी उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. भाजप जनता पक्षाच्या राष्ट्रीय चिटणीस, राजस्थानच्या सहप्रभारी विजया रहाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाबरोबरच खादी विक्रीसाठीही भाजपचे कार्यकर्ते प्रयत्न करतील, असे सांगितले. एका कार्यकर्त्याने किमान पाच घरात खादी विक्री करावी असे ठरविण्यात आले आहे. खरे तर खादी वापरण्यासाठी त्यात नवनवे बदल करुन थोडी नाविण्यताही आणायला हवी असे त्या म्हणाल्या. या सेवा पंधरवाड्यात एक लाख युनिट रक्तदान होईल असेही नियोजन केल्याचे रहाटकर यांनी सांगितले. दरम्यान खादी विक्रीच्या या भाजपच्या उपक्रमाबाबत बोलताना तुषार गांधी म्हणाले, कापूस उत्पादकांना न्याय देता यावा आणि गावागावात स्वावलंबनाचे धडे देता यावेत म्हणून चरखा आला. त्यामुळे खादी ही काही केवळ वस्तू नाही. तो स्वातंत्र्य चळवळीतील बंध आहे. भाजपची खादीविक्री हा ती वस्तू समजून हाती घेतलेला उपक्रम आहे. खरे तर लोकशाहीची गळचेपी होण्याच्या काळात सामुहिक नेतृत्व निर्माण व्हावे असे प्रयत्न सुरू आहेत. पण भाजपकडून प्रतिकांची पळवापळव सुरू होतीच. ती आता खादीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आली आहे. तुषार गांधी हे औरंगाबाद येथे एका व्याखानासाठी आले होते.

हेही वाचा… राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील कायम; जितेंद्र आव्हाड राष्ट्रीय पातळीवर

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी या क्षेत्रात लक्ष घातल्यापासून खादीमधून एक कोटी ७५ लाख नवीन रोजगार निर्माण झाले. २०-२१ मध्ये खादी ग्रामोद्योगात २०.५४ टक्के वाढ झाली. २०२०-२१ मध्ये९५ हजार ७४१ कोटी रुपयांची उलाढाल आता एक लाख १५ हजार ४१५ कोटी ७४ लाख रुपयांपर्यंत पोहचली आहे. २०१४ पासून गेल्या आठ वर्षात खादीच्या उलाढालीमध्ये १९१ टक्क्यांची वाढ आहे. गेल्या वर्षात तीन हजार ५२८ कोटींची उलाढाल करुन त्यात ती वाढ ४३ टक्के एवढी आहे. ‘खादी फॉर नेशन आणि खादी फॉर फॅशन’ या घोषवाक्यासह देशभर काम होत असल्यानेच भाजपकडून खादी विक्रीचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचा दावा विजया रहाटकर यांनी केला.