scorecardresearch

Premium

एनडीए आघाडीची २५ वर्षे; भाजपाला बहुमत प्राप्त होताच एक एक घटक पक्ष एनडीएतून फेकले गेले

१९९८ साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात एनडीए आघाडीची स्थापना झाली. २५ वर्षांपासून एनडीएची आघाडी टिकली असली तरी त्यातील अनेक घटक पक्षांना बाहेर पडावे लागले किंवा ते बाहेर फेकले गेले.

NDA Alliance
राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएची स्थापना होऊन २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. (Photo – PTI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपद आणि मोदी सरकारच्या कार्यकाळाला २६ मे रोजी नऊ वर्षे पूर्ण झाली. भाजपाकडून यानिमित्त देशभरात महाअभियान राबविले जात आहे. मे महिन्यात भाजपाशी संबंधित आणखी एका घटनेला २५ वर्षे झाली आहेत. पण भाजपाने या घटनेचा फारसा उल्लेख केला नाही. १५ मे रोजी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे (NDA) २५ वर्षे पूर्ण झाली. २०१९ साली भाजपाने ३०३ जागा जिंकून संपूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले. त्यानंतर एनडीएमधील एक एक घटक पक्ष निसटत जाऊ लागले. भाजपाच्या एकहाती सत्तेपुढे नामोहरम झालेले अनेक घटक पक्ष या आघाडीतून गेल्या काही काळात बाहेर पडले आहेत.

२०२४ लोकसभा निवडणुकांसाठी भाजपा विरोधकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. देशभरातील विरोधकांच्या बैठकांचे सत्र सुरू असून एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विरोधकांसोबतच आता भाजपानेही एनडीएला नवसंजीवनी देण्याचे संकेत दिले आहेत. मागच्या काही काळात तेलूग देसम पार्टी, जनता दल (युनायटेड) आणि शिरोमणी अकाली दलासारखे भाजपाचे जुने मित्र एनडीएतून बाहेर पडले आहेत. तसेच शिवसेनेसारखा सर्वात जुना मित्र आता भाजपापासून दुरावलेला आहे. शिंदे गट जरी भाजपासोबत असला तरी उद्धव ठाकरे यांचा गट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत आहेत.

Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का

रविवारी (दि. २८ मे) नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एनडीएमधील घटकपक्ष पाव शतक एकत्र राहिले. एवढ्या मोठ्या काळापर्यंत कोणतीही आघाडी आजवर टिकलेली नाही. १९९६ साली भाजपाचे १६१ खासदार निवडून आले होते, तर काँग्रेसकडे केवळ १४० खासदार होते. तरीही भाजपाचे सरकार केवळ १३ दिवस टिकले. एनडीएमुळेच भाजपाची राजकीय अस्पृश्यता दूर झाली होती. अनेक बिगरकाँग्रेसी पक्षांना भाजपाने आपल्या बाजूला वळविले होते. १९८४ साली शिवसेनेसोबत युती झाल्यानंतर १९९६ पर्यंत भाजपासोबत इतर पक्षांनी युती केली नव्हती. त्यानंतर अकाली दल, हरयाणा विकास पार्टी (HVP) आणि समता पार्टी (आता जेडीयू) यांच्यासोबत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर आघाडीची मुहूर्तमेढ रचली गेली.

हे वाचा >> BBC IT Raid: अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ‘आउटलूक’वर पडली होती प्राप्तिकर विभागाची अशीच रेड

एनडीएच्या आघाडीला पहिले यश मिळाले ते १९९८ साली, जेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने दुसऱ्यांदा सरकार स्थापन केले. एनडीएला तृणमूल काँग्रेस पक्ष, अण्णाद्रमुक, शिवसेना, बिजू जनता दल या पक्षांचा पाठिंबा मिळाला होता. भाजपाने एकूण १८२ जागा जिंकल्या होत्या, तर एनडीए घटक पक्षांचे खासदार मिळून २६१ खासदार होत होते. त्यानंतर तेलगू देसम पक्षाने एनडीएला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे ही संख्या २७२ जवळ पोहोचली.

१९९९ साली अण्णद्रमुक (AIADMK) पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यानंतर एनडीएचे पहिले सरकार कोसळले. पुढील वर्षी झालेल्या निवडणुकीत एनडीएने अधिक जागा घेऊन सत्ता मिळवली. या वेळी एनडीएसोबत आणखी काही नवे पक्ष जोडले गेले. तामिळनाडूमधील अण्णाद्रमुक पक्षाचा प्रमुख प्रतिस्पर्धी द्रमुक (DMK) पक्षाने एनडीएला पाठिंबा दिला. तसेच जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स पक्षानेही एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. एनडीए द्वितीयने पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण केला. ज्यामुळे अटलबिहारी वाजपेयी हे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान ठरले. वाजपेयी यांचा कार्यकाळ संपत असताना २००२ साली गुजरातमध्ये जातीय दंगली पेटल्या. ज्याचा परिणाम एनडीएवरही झाला. २००२ साली नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.

गुजरात दंगलीनंतर बिहारमधील लोक जनशक्ती पक्षाने (LJP) आपल्या चार खासदारांचा पाठिंबा घेतला आणि एनडीएतून बाहेर पडले. लोक जनशक्ती पक्षानंतर बहुजन समाज पक्षानेही दलित मतपेटी हातातून जाऊ नये, यासाठी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच जम्मू आणि काश्मीरचा नॅशनल कॉन्फरन्स आणि द्रमुक पक्षही कालांतराने बाहेर पडला. वाजपेयीप्रणीत एनडीए सरकारने जुगार खेळत २००४ लोकसभा निवडणुका मुदतीआधी घेतल्या. इंडिया शायनिंगचा नारा देत काँग्रेसप्रणीत यूपीए आघाडीवर यानिमित्ताने आघात करण्याचा एनडीएचा प्रयत्न होता.

मात्र २००४ च्या निवडणुकीत एनडीएला यश मिळू शकले नाही. तरीही भारतातील इतर राज्यांमध्ये भाजपाने आपला ठसा उमटविला होता. केंद्र सरकारमध्ये सत्तेत येण्यासाठी भाजपाला २०१४ पर्यंत दहा वर्षांची वाट पाहावी लागली. २०१४ साली नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व पुढे करून भाजपाने एकहाती २८२ जागा जिंकल्या आणि एनडीएचे नेतृत्व पुन्हा स्वतःच्या ताब्यात ठेवले. या वेळी बहुमताचा आकडा भाजपाकडे असल्यामुळे त्यांना मित्रपक्ष गमाविण्याची आणि सत्ता डळमळीत होण्याची कोणतीही भीती नव्हती.

हे वाचा >> अटल बिहारी वाजपेयी जनसंघाच्या वेशातले ‘नेहरूवादी’; वाजपेयींना नेहरूंचे वावडे नव्हते? नव्या पुस्तकातून अनेक गोष्टींचा उलगडा

२०१९ साली, मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने पुन्हा सत्ता काबीज केली. या वेळी त्यांनी ३०३ जागा जिंकल्या. यामुळे त्यांना आता मित्रपक्षांची गरज उरली नव्हती. मोदींच्या कार्यकाळात भाजपाने विविध राज्यांमध्येही स्वबळावर सत्ता मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार राज्यांमध्ये सत्ता मिळवण्याचे प्रयत्न करीत असताना एनडीएमधील जुने मित्र जसे की, तेलगू देसम, शिवसेना आणि जेडीयूसमोरच आव्हान उभे राहिले. शिवसेना पक्षात फूट पडल्यामुळे आता शिंदे गट एनडीएमध्ये परतला आहे. तर अकाली दल जो १९९६ पासून भाजपासोबत होता, त्यांनी २०२१ साली कृषी कायद्याच्या विरोधात बेबनाव झाल्यानंतर एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Twenty five years of nda how bjp has made the alliance redundant kvg

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×