scorecardresearch

प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विरोधात विदर्भातील काँग्रेसच्या दोन माजी मंत्र्यांची उघड भूमिका

विदर्भातील सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार या दोन माजी मंत्र्यांनी थेट वैदर्भीय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध उघड भूमिका घेतली आहे.

Congress , Vijay Wadettiwar, Sunil Kedar, Nana Patole
प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विरोधात विदर्भातील काँग्रेसच्या दोन माजी मंत्र्यांची उघड भूमिका ( Image – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

चंद्रशेखर बोबडे

नागपूर : विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने विदर्भातील दोन्ही जागा जिंकून भाजपला त्यांच्याच बालेकिल्ल्यात धुळ चारली. त्यांचा आनंदोत्सव साजरा करण्याऐवजी पक्षात तांबे प्रकरणावरून थोरात विरुद्ध पटोले वाद उफाळून आला आहे. यात विदर्भातील सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार या दोन माजी मंत्र्यांनी थेट वैदर्भीय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध उघड भूमिका घेतली आहे.

कधीकाळी काँग्रेसचाबालेकिल्ला असलेला विदर्भ पक्षातील नेत्यांच्या आपसातील वादामुळे भाजपकडे गेला. मात्र अनेक वर्षानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांच्या प्रयत्नांमुळे काँग्रेसला अमरावती पदवीधर व नागपूर शिक्षक या दोन्ही भाजपकडे असलेल्या मतदारसंघात विजय मिळवता आला. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर दोनच दिवसात तांबे प्रकरणावरून काँग्रेसमध्ये थोरात विरुद्ध पटोले वाद उफाळला. यात केदार- वडेट्टीवार यांनी उघडपणे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात भूमिका घेतली. वडेट्टीवार म्हणाले, सत्यजित तांबेंच्या रक्तात आणि विचारात काँग्रेस आहे. ते कोणत्याही पक्षाचे चिन्ह घेऊन लढले नाही. त्यांना सोबत घ्यावं अशी माझी इच्छा आहे. मी स्वतः हाय कमांडला याबाबत विनंती करणार आहे. सुनील केदार म्हणाले, सत्यजित तांबेंच्या संदर्भात जे झाले ते चुकीचेच झाले, त्यामुळे पक्ष कमजोर झाला. या प्रकरणात तोडगा काढायला हवा होता. पक्ष अडचणीच्या काळातून जात असताना नेत्यांनी अशा गोष्टी टाळायला हव्या.

हेही वाचा… शिवसेनेच्या ‘ मराठी मुस्लिम ‘ ला तोंड देण्यासाठी भाजपचे व्यापारी व कष्टकरी मुस्लिम हे ‘ लक्ष्य ‘

यापूर्वीही या दोन्ही नेत्यांनी पटोले यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतले होते. नागपूरमध्ये अडबोले यांना पाठिंबा देण्यास पटोले यांनी विलंब लावत असल्याचे दिसताच या नेत्यांनी पाठिंबा जाहीर केला. ही एक प्रकारची कुरघोडी होती. त्यामुळेच की काय पटोले अडबाले यांच्या प्रचारासाठी आले नाही. आता थोरात प्रकरणातही दोन्ही नेत्यांची भूमिका पटोलेंच्या विरोधात आहे. विशेष म्हणजे विकासाच्या मुद्यावर विदर्भातील नेते पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांवर टीका करतात. मात्र काँग्रेसमध्ये पटोले हे विदर्भातील असताना या भागातील पक्षाचे नेते त्यांच्या ऐवजी पश्चिम महाराष्ट्रांतील थोरात यांच्या बाजूने उभे राहिल्याचे चित्र आहे.

हेही वाचा… आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यातील गोंधळावरून शिंदे गटाच्या आमदारावर फुटले खापर

दरम्यान यापूर्वी काटोलचे माजी आमदार आशीष देशमुख यांनी नाना पटोले यांना त्यांच्या पदावरून दूर करावे, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. तांबे प्रकरणातही देशमुख यांनी पटोलेंना लक्ष्य केले आहे.

हेही वाचा… विधिमंडळ नेता आणि प्रदेशाध्यक्षांच्या वादाची राज्यात परंपराच

“ सत्यजित तांबेबाबत जे झाले ते चुकीचेच होते. यावर तोडगा काढता आला असता. यामुळे पक्ष कमजोर झाला” – सुनील केदार, माजी मंत्री काँग्रेस नेते

“सत्यजित तांबें काँग्रेसचेच आहेत. ते अपक्ष लढले असले तरी आमच्या बरोबर राहातील. तांबेंना सोबत घेण्याबाबत हाय कमांडशी चर्चा करणार” – विजय वडेट्टीवार,काँग्रेस नेते ,माजी मंत्री

“ नेत्यांचे गैरसमज दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. १५ फेब्रुवारी रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि इतर राजकीय विषयांबाबत चर्चा होईल” – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 13:05 IST
ताज्या बातम्या