चंद्रपूर : भाजपने राजुरा मतदारसंघातून देवराव भोंगळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, पार्सल उमेदवार नको, अशी भूमिका घेत भाजपच्याच दोन माजी आमदारांनी भोंगळे यांना विरोध दर्शविला आहे.
कुणबीबहुल राजुरा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे, शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे माजी आमदार ॲड. वामनराव चटप आणि भाजपचे देवराव भोंगळे यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. तेलंगणा व मराठवाडा या दोन प्रांताच्या सीमेवर वसलेल्या या मतदारसंघात राजुरा, गोंडपिपरी, कोरपना व जिवती या चार तालुक्यांचा समावेश आहे. एकूण ३ लाख २४ हजार २०९ मतदार असलेल्या या मतदारसंघात कुणबी समाजाचे प्राबल्य आहे. त्यानंतर आदिवासी समाजाची सर्वाधिक मते येथे आहेत. काँग्रेसने खैरे कुणबी समाजातून येणारे धोटे यांना तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. शेतकरी संघटनेचे वामनराव चटप सहाव्यांदा विधानसभेच्या रिंगणात आहेत. भाजपने यावेळी नव्या दमाचा युवा चेहरा भोंगळे यांना उमेदवारी दिली आहे. चटप व भोंगळे धनोजे कुणबी समाजातून येतात. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघाचे चटप यांनी १९९०, १९९५ व २००४ असे तीन वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले. मात्र त्यांनी दोन लोकसभा व तीन विधानसभा निवडणुकीत पराभवदेखील बघितला आहे. लोकांसाठी धावून जाणारा नेता सुख-दुःखात पाठीशी उभा राहणारा नेता, अशी चटप यांची ओळख आहे. शेतकरी आंदोलन, स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी वेळोवेळी आंदोलने करून चटप सातत्याने लोकांच्या संपर्कात आहेत.
हेही वाचा >>>रावसाहेब दानवे यांचे पुत्र भाजप तर मुलगी शिवसेनेकडून लढणार
या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे आमदार धोटे यांच्याही पाठीशी विजय व पराजय असे दोन्ही अनुभव आहेत. धोटे लोकप्रिय आहेत. त्यांनी मागील पाच वर्षात बरीच विकासकामे केलीत. ते कार्यकर्त्यांच्या सतत संपर्कात असतात. मात्र त्यांचा फटकळ स्वभाव हा सर्वात मोठा दोष आहे. त्या तुलनेत भाजपचे भोंगळे या मतदारसंघासाठी नवखे आहेत. मतदारसंघाच्या बाहेरचा चेहरा म्हणूनही मतदार त्यांच्याकडे बघतात व स्थानिक पातळीवर पक्षातून त्यांना विरोध आहे. जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, भाजपचे जिल्हाध्यक्ष, अशी प्रमुख पदे भूषविणाऱ्या भोंगळे यांना स्थानिक मतदार स्वीकारतील का, हा प्रश्र्नच आहे.
आदिवासी नेते गोदरू पाटील जुमनके यांचा मुलगा गजानन गोदरू पाटील जुमनाके हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आदिवासी मतदारांनी त्यांना साथ दिली तर काँग्रेसच्या धोटे यांच्यासाठी अडचणीचे ठरणार आहे. धोटे व चटप या दोन्ही उमेदवारांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडली असल्याने, तुम्हाला आणखी किती संधी द्यायची, असा प्रश्न मतदारच विचारत आहेत, तर या दोघांकडून ही आमची शेवटची निवडणूक, असे आवाहन केले जात आहे. या दोन्ही उमेदवारांच्या तुलनेत भाजपचे भोंगळे युवा आहेत. मात्र बाहेरचा उमेदवार, असा शिक्का त्यांच्यावर पहिल्या दिवसापासून लागला आहे.
हेही वाचा >>>आमगावात विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; अर्जुनी मोरगावमध्ये माजी आमदाराला संधी
भोंगळे यांना ॲड. संजय धोटे व सुदर्शन निमकर या भाजपच्या दोन्ही माजी आमदारांनी तसेच माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे समर्थक खुशाल बोंडे यांनी विरोध दर्शवला आहे.
ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आतापर्यंतचे विजयी उमेदवार
१९६२ – विठ्ठलराव धोटे
१९६७ – श्रीहरी जीवतोडे
१९७२ – विठ्ठलराव धोटे
१९७७ – बाबुराव मुसळे
१९८० – प्रभाकर मामुलकर
१९८५ – प्रभाकर मामुलकर
१९९० – ॲड. वामनराव चटप
१९९५ – ॲड. वामनराव चटप
१९९० – सुदर्शन निमकर
२००४ – ॲड. वामनराव चटप
२००९ – सुभाष धोटे
२०१४ – ॲड. संजय धोटे
२०१९ – सुभाष धोटे