मालेगाव : उपनेते अद्वय हिरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत नुकताच भाजपमध्ये पुनर्प्रवेश केला. चार महिन्यापूर्वी त्यांचे थोरले बंधू आणि माजी आमदार अपूर्व हिरे हे भाजपमध्ये दाखल झाले होते. या दोन्ही बंधूंनी अनेकवेळा पक्षांतर केले आहे. अद्वय हिरे यांचे ताजे पक्षांतर त्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहे.
हिरे कुटुंबीयांच्या शैक्षणिक संस्थांवर सध्या चौकशींचे बालंट आले आहे. त्यांच्याच अधिपत्याखाली असलेल्या सहकारी बँकांमधील कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी यापूर्वी गुन्हे दाखल झाले असल्याने उद्भवलेल्या अडचणींचे निराकरण व्हावे तसेच त्यासाठी राजाश्रय मिळावा म्हणून अद्वय यांनी भाजपमध्ये जाण्याचा मार्ग स्वीकारला का,असा प्रश्न निर्माण होत आहे.
एकेकाळी राज्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या मालेगावमधील हिरे घराण्याचा जनाधार घसरला आहे. २००४ मध्ये नवख्या दादा भुसे यांनी बलाढ्य प्रशांत हिरे यांना पराभूत केल्यानंतर हिरे घराण्याच्या राजकारणाला उतरती कळा लागली. त्यामुळे राजकीय अस्तित्वासाठी हिरे कुटुंबीयांना सातत्याने या पक्षातून त्या पक्षात कोलांटउड्या माराव्या लागत आहेत. अद्वय हिरे यांची भाजपमध्ये प्रवेश करण्याची ही तिसरी वेळ.
मालेगावचे हिरे घराणे हे मुळचे काँग्रेसी. या घराण्यातील वारसदार असलेले अद्वय यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना ठाकरे गट आणि आता भाजप असे पक्षांतर केले आहे. नाशिकमध्ये स्थायिक होऊन राजकारण करणारे त्यांचे थोरले बंधू व माजी आमदार अपूर्व हिरे यांनी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या दीड वर्षातील त्यांचे देखील हे चौथे पक्षांतर ठरले.
शिवसेनेत फूट पडल्यावर अद्वय हिरे यांनी भाजपचा त्याग करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर हिरे कुटुंबीयांच्या शैक्षणिक व सहकारी संस्थांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लागले. तसेच हिरे कुटुंबीयांविरोधात पोलीस दप्तरी गुन्हे दाखल होण्याची मालिका अचानक सुरू झाली. याच अनुषंगाने जिल्हा बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी अद्वय हिरे यांना नऊ महिने तुरुंगात काढावे लागले.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांची जामीनावर सुटका झाली. तेव्हा त्या निवडणुकीत मालेगाव बाह्य मतदार संघात ठाकरे गटाकडून लढताना दादा भुसे यांच्यासमोर त्यांनी दंड थोपटले. परंतु, त्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला. या लढतीत अपक्ष बंडूकाका बच्छाव हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर, हिरे हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले.
हिरे कुटुंबीयांच्या अधिपत्याखालील दोन्ही शैक्षणिक संस्थाच्या विरोधात वेगवेगळ्या चौकशी सुरू आहेत. या संस्थांच्या संदर्भात फसवणूक झाल्याचे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये काही गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. तसेच मालेगाव येथील व्यंकटेश बँकेत कर्ज घोटाळा झाल्याप्रकरणी मध्यंतरी प्रशांत हिरे,अपूर्व आणि अद्वय यांच्या विरोधात कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
स्थानिक न्यायालयाने या प्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने हिरे पिता-पुत्रांना मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. जामिनासाठीचा उच्च न्यायालयातील त्यांचा अर्ज अद्याप प्रलंबित आहे. विशेष म्हणजे मालेगावात ज्या दिवशी हा गुन्हा दाखल झाला,त्याच्या दुसऱ्याच दिवशी अपूर्व हिरे यांचा मुंबईत भाजप प्रवेश झाला.
अलीकडे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात हिरे कुटुंबीयांच्या विरोधात महिला बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी नव्याने गुन्हा दाखल झाला आहे. हिरे कुटुंबीयांच्या अधिपत्याखाली असलेल्या महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती या संस्थांना शासनाने काही वर्षांपूर्वी जमिनी दिल्या होत्या. या संस्थांकडून अटी-शर्तींचा भंग झाल्याचा ठपका ठेवत मालेगावातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या २१ हेक्टरवरील जमिनी सरकार जमा करण्याची कारवाई अलीकडेच करण्यात आली.
दादा भुसे लक्ष्य
शिक्षण संस्था आणि बँकांच्या विरोधात ज्या तक्रारी झाल्या, त्यामागे शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा हात असल्याचा आरोप हिरे कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. राजकीय आकसापोटी भुसे हे खोट्या गुन्ह्यांमध्ये आम्हाला अडकवत आहेत,असा दावा देखील हिरे कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. अद्वय हिरे हे ठाकरे गटात असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून संजय राऊत यांच्यापर्यंतच्या नेत्यांकडून हिरे यांचा बचाव करताना भुसे हे त्यांना मुद्दाम त्रास देत असल्याची टीका केली गेली होती. हिरेंचा बचाव करणाऱ्या ठाकरे व राऊत यांच्यावर भाजपचे नेते याआधी तुटून पडत असत. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. थोरले बंधू अपूर्व यांच्यानंतर अद्वय हेही पक्षात आल्याने भाजपवरच त्यांचा बचाव करण्याची वेळ येते की,काय असा रागरंग दिसत आहे.
