Shivsena Bharat Gogawale vs Shivsena Snehal Jagtap Assembly Election 2024 : महाडचा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना आणि भरत गोगावले यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आधी प्रभाकर मोरे आणि नंतर भरत गोगावले यांनी या मतदारसंघाचे दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर महाडमध्ये संघटनेतही दोन गट झाले असून लोकसभा निवडणुकीत घटलेल्या मताधिक्याने हा दुभंग निर्णायक ठरू शकतो, हेही दाखवून दिले आहे. महाड, पोलादपूर आणि माणगाव तालुक्यातील काही भाग मिळून महाड विधानसभा मतदारसंघाची रचना होते. १९५२ ते १९८० च्या काळात या मतदारसंघातून सलग चार वेळा काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. मात्र १९८० नंतर मात्र शिवसेनेनी मतदारसंघाचा ताबा घेतला. २००४ चा अपवाद सोडला तर शिवसेनेनी कायमच मतदारसंघावर वर्चस्व टिकून ठेवले आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच संघर्ष पाहायला मिळणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या अनंत गीते यांना १७ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. २०१९ मध्ये हे मताधिक्य घटून सात हजारांवर आले. आता त्यात अजून घट झाली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना अवघे तीन हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे मतदारसंघातील सातत्याने घटणाऱ्या मताधिक्याची चिंता गोगावलेसाठी अडचणीची ठरणार आहे. हेही वाचा >>> सत्तेचा निर्णय महिलांच्या हाती! जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले. संविधान बदलांच्या चर्चांचादेखील परिणाम दिसून आला. मुंबईकर मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे यानिमित्ताने पहिल्यांदाच पाहायला मिळाले. याचा एकत्रित परिणाम महायुतीच्या मताधिक्यावर झाला. लोकसभा निवडणुकीत मताधिक्य घटत असले, तरी विधानसभा निवडणुकीत त्याचा परिणाम दिसणार नाही असा दावा भरत गोगावले यांच्याकडून करत आहेत. पण शिवसेना उबाठा गटाच्या स्नेहल जगताप यांचे मतदारसंघातील वाढता प्रभाव गोगावलेंसाठी अडचणीचा ठरू शकतो. दांडगा जनसंपर्क आणि मतदारसंघातील सक्रियता ही गोगावलेंसाठी जमेची बाजू आहेत. पण पक्षांतर्गत बंडखोरी केल्याचा मुद्दा शिवसेना उबाठा गटाकडून गोगावले यांच्या विरोधात सातत्याने लावून धरला जात आहे. त्यामुळे गोगावले यांना मतदारसंघातील आगामी वाटचाल आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. स्नेहल जगताप यांचे तगडे आव्हान काँग्रेसचे नेते आणि महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांचे करोनाकाळात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारसदार असलेल्या आणि महाड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष असलेल्या स्नेहल जगताप यांनी शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेच्या उबाठा गटाला भरत गोगावलेंची कोंडी करण्यासाठी समर्थ पर्याय उपलब्ध झाला आहे. महाडच्या नगराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळलेल्या स्नेहल जगताप महिला आणि तरुण वर्गात लोकप्रिय आहेत. शिवाय पक्षफुटीनंतर शिवसेनेच्या उबाठा गटासोबत राहिलेल्या निष्ठावंतांची साथ त्यांना मिळणार आहे. तीन हजारांचे मताधिक्य भरत गोगावले हे सलग तीन वेळा या मतदारसंघातून गोगावले चांगल्या मताधिक्याने निवडून आले आहेत. मात्र तरीही या लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात गोगावले यांचा नेहमीचा प्रभाव दिसून आला नाही. मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना ७७ हजार ८७७ मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते ७४ हजार ६२६ मते पडली. म्हणजेच तटकरेंना या मतदारसंघातून जेमतेम ३ हजार २५१ मताधिक्य मिळाले.