सतीश कामत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रत्नागिरी : एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेतील मोजक्या निर्विवाद नावांमध्ये रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांचे नाव आघाडीवर होते आणि अपेक्षेनुसार मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे.

सलग चार वेळा विधानसभा निवडणुकीत वाढत्या मताधिक्याने जिंकत आलेल्या सामंतांची कौटुंबिक पार्श्वभूमी बांधकाम व्यवसायाची. ती आघाडी सांभाळणारे वडील रवींद्र उर्फ अण्णा सामंत आणि बंधू किरण उर्फ भय्या सामंत यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे उदय सामंत ही मजल मारु शकले. त्याचबरोबर, संघटनात्मक कौशल्य आणि आर्थिक ताकद, या दोन्ही त्यांच्या महत्त्वाच्या जमेच्या बाजू आहेत. या बळावर २००४ ते २०१४ ही सलग १० वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, युवक प्रदेशाध्यक्ष आणि काही काळ मंत्री राहिल्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सामंतांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि ते आरामात निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बांधलेली कार्यकर्त्यांची फौज घेऊन ते शिवसेनेत आले. त्यामुळे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचा तंबू बऱ्यापैकी रिकामा झाला. या सगळ्या वाटचालीतून आलेल्या आत्मविश्वासामुळेच सामंतांनी शेवटच्या दोन दिवसात गुवाहाटीचे विमान पकडले आणि पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळवले.

हेही वाचा… रवींद्र चव्हाण : देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि पडद्यामागील कारवायांचे शिलेदार

हेही वाचा… महाराष्ट्रात ‘शतप्रतिशत’चा भाजपाचा प्रयत्न, शिंदे गटाशी युती करून डोळे २०२४च्या निवडणुकीवर!

या राजकीय कारकिर्दीबरोबरच नाट्य क्षेत्र आणि क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळाच्या संघटनेचे सामंत जिल्हाध्यक्ष आहेत. युवकांसाठी ‘बहर’ हा सांस्कृतिक महोत्सव, ‘रत्नागिरीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’, कोकण मराठी साहित्य परिषद अशा माध्यमांमधून रत्नागिरी शहरातील अराजकीय क्षेत्रातही त्यांनी आपले बस्तान यशस्वीपणे बसवले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बळ फारसे नाही आणि तसाच दुबळा असलेला भाजपा बंडखोर गटाचा मित्र पक्ष झाला आहे. त्यामुळे सामंतांबरोबर बंडखोरीत सहभागी न झालेले शिवसेनेचे नेते- कार्यकर्ते कितपत आव्हान उभे करतात, एवढीच आता कुतुहलाची बाब राहिली आहे. पण राजकारणाच्या वाऱ्याचा अचूक अंदाज घेत राजकीय वाटचाल करण्याचे सामंत यांचे कौशल्य आणि संघटनात्मक बांधणी लक्षात घेता सध्या तरी त्यांना जिल्ह्याच्या राजकारणात तगडे आव्हान दिसत नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uday samant is successful due to accurate forecast of political nerve print politics news asj
First published on: 09-08-2022 at 19:14 IST