आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : पुण्यात शिंदेसेनेच्या आढावा बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अंतर्गत गटबाजीवरून पक्षातील पदाधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली… मराठा आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी भूमिका आजवर कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही, असा दावा मंत्री विखे पाटील यांनी केला… कोल्हापुरातील भाजपाच्या आजी-माजी आमदारांमधील वाद टोकाला गेला असून, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले… विद्यार्थ्यांचा देश असलेल्या भारतात बलात्काऱ्यांचे समर्थन करणाऱ्याकडे शिक्षण मंत्रालयाचे नेतृत्व का? असा सवाल अभिजीत दिपकेंनी उपस्थित केला… नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि नागरिकांचे जाणारे जीव, यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मंत्र्यांकडून खरडपट्टी

पुण्यात शिंदेसेनेच्या आढावा बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अंतर्गत गटबाजीवरून पक्षातील पदाधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. शहरात शिवसेनेचे अस्तित्वच दिसत नाही. अंतर्गत गटबाजी सुरू असल्यामुळे त्याचा पक्षाला मोठा फटका बसतो आहे. शिवसेनेचे अस्तित्व टिकवून पक्षाला पुनरुज्जीवित करायचे असेल, तर तातडीने अंतर्गत गटबाजी थांबवा‚ अशा शब्दांत सामंत यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली. तसेच पक्षातील गटबाजी थांबली नाही, तर ऑगस्ट महिन्याच्या अखेर नवी कार्यकारिणी जाहीर केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, या बैठकीत पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चारही लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या २१ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. बैठकीला जिल्ह्यातील सर्व नेत्यांची तसेच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

“मनोज जरांगे यांना आंदोलनाची गरज पडणार नाही”

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या येत्या २८ ऑगस्टपर्यंत पूर्ण न झाल्यास सर्वात मोठे आंदोलन करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. त्यांच्या या भूमिकेनंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच, हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीसाठी सातत्याने आढावा सुरू असून कोणालाही अडचण येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती विखे यांनी दिली. याबाबत मनोज जरांगे यांना सविस्तर अहवाल पाठविण्यात येणार असून त्यांचे समाधान होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्याने घेतली नव्हती. सरकार अतिशय सकारात्मक आहे. जरांगे यांची भावना योग्य असली, तरी आंदोलनाची वेळ येणार नाही. ओबीसी समाज अथवा त्यांच्या नेत्यांचा सरकारवर कोणताही दबाव नाही, असेही विखे यांनी स्पष्ट केले.

भाजपाच्या आजी-माजी आमदारांमध्ये टोकाचे वाद

कोल्हापुरातील भाजपाच्या आजी-माजी आमदारांमधील वाद टोकाला गेला असून, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. इचलकरंजीत भाजपामध्ये जुन्या-नव्यांचा संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. बाहेरून पक्षात आलेल्या आमदार आवाडे गटाच्या विरोधात माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचा गट आक्रमक झाला आहे. या अंतर्गत वादामुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. गुरुवारी हातळणकर गटाच्या नगरसेवकांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची कोल्हापुरात भेट घेतली. यावेळी त्यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत वाद आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत चुकांचा पाढा वाचला. आयुक्तांच्या मनमानी कारभाराबाबत तक्रारी मांडत त्यांच्या बदलीची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान हा विषय पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक आयोजित केली जाईल, अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली. या वादाची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

अभिजीत दिपके यांचा केंद्र सरकारला सवाल

विद्यार्थ्यांचा देश असलेल्या भारतात बलात्काऱ्यांचे समर्थन करणाऱ्याकडे शिक्षण मंत्रालयाचे नेतृत्व का? असा सवाल अभिजीत दिपकेंनी उपस्थित केला. छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना दिपके म्हणाले की, नीटसह सर्व परीक्षांमध्ये सर्वात जास्त विद्यार्थिनी उत्तीर्ण होतात. अशा काळात एका अशा बलात्काऱ्यांचे समर्थन करणाऱ्याला शिक्षण मंत्री केले, तर त्या विद्यार्थिनीवर काय परिणाम होईल. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबरोबर शिक्षण मंत्रालयातील दोन वरिष्ठ सचिवांच्याही बदल्या करण्यात आल्या. नवीन सचिवांवर आधीच भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. एका अधिकाऱ्याला हटवून दुसऱ्याला नेमणे, हा दिखावा करण्यासारखेच आहे. हे भारतासाठी नाही, तर संपूर्ण जगात भारताच्या प्रतिमेला मलीन करणारे आहे, असेही दिपके यांनी नमूद केले. त्यांच्या या भूमिकेमुळे नवीन शिक्षणमंत्रीही कॉक्रोच जनता पार्टीच्या रडारवर येत असल्याची चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे.

मंत्री छगन भुजबळ यांचा सरकारविरोधात संताप

नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि नागरिकांचे जाणारे जीव, यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली. नाशिक एवढे बेकार कधीच नव्हते. सध्याची परिस्थिती पाहता शहर वाऱ्यावर सोडले आहे का? असा प्रश्न त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना उपस्थित केला. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा आपले प्राण गमावावे लागले आहे. तरीही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. त्यावर बोलताना मंत्री भुजबळ यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्थानिक नगरसेवक वैतागले आहेत आणि महापौरही काही करू शकत नाहीत. कुंभमेळ्यासाठी रस्ते खोदले असतील, तर पर्यायी रस्त्यांची सोय करणे प्रशासनाचे काम आहे. पाऊस ओसरताच तातडीने खड्डे बुजवा. एकाच खड्ड्यावर दुप्पट काम करावे लागले तरी हरकत नाही, पण निष्पाप नागरिकांचे बळी जाता कामा नयेत, असा सल्ला त्यांनी आपल्याच सरकारला दिला आहे.