विश्वास पवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाई : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात उतरलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी या लढाईत अन्य सर्वच पक्षांनी सोयीस्कर मौन बाळगल्याचा आरोप करत हा लढा स्वकेंद्री केला आहे. मात्र हे घडत असताना उदयनराजे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक पाहता त्यांच्या या मोहिमेमुळे भाजपसह सर्वच पक्षातील नेते बुचकळ्यात पडले असून त्यांचा ‘बोलविता धनी’ कुणी अन्य आहे का, अशी दबक्या आवाजात सध्या चर्चा सुरू आहे.

हेही वाचा >>>Bharat Jodo Yatra: “मेहनत घेणं चांगलंच, पण त्यात…”; अमित शाहांची राहुल गांधींवर मार्मिक टिप्पणी

राज्यपाल कोश्यारी यांनी मागील आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरून सर्वत्र गदारोळ उडाला होता. मात्र सुरुवातीचे दोन दिवस झाल्यानंतर जवळपास सर्वच पक्षांनी या मुद्यावर मौन बाळगले. मात्र दुसरीकडे या विषयावर गेले काही दिवस रोज पत्रकार परिषद घेणाऱ्या उदयनराजे यांनी मोहीमच उघडली आहे. आता तर अन्य सर्वांनी मौन बाळगले तरी मी एकटा हा लढा सुरूच ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या प्रश्नी सुरुवातीला काही काळ पक्षीय आंदोलन दिसले. मात्र यानंतर काही दिवसातच हा विषय सर्वच पक्षांकडून अडगळीत टाकण्यात आल्याची खंत उदयनराजे यांच्या टीकेतून सध्या व्यक्त होत आहे. उदयनराजे यांनी हा लढा आपल्यासाठी राजकीय नसून तो भाविनक असल्याचे वारंवार जाहीर केले आहे. ते म्हणतात, ‘मी सोडून अन्य कोणीही यावर बोलत नाही. बोलणाऱ्यांवर कारवाई होत नाही. हे निराश करणारे असले तरी मी हतबल झालेलो नाही आणि माझा लढा सुरूच राहणार आहे. कारण मी ‘उदयन भोसले’ हे नाव ‘उदयनराजे’ लावतो आणि स्वत:ला शिवाजी महाराजांचा वंशज समजतो, मग त्यांच्याबद्दल कोणी बोलले तर मी खपवून घेणार नाही.’

हेही वाचा >>>वादग्रस्त ‘उद्योगी’ सुरेश धस !

उदयनराजे हे सध्या भाजपचे खासदार आहेत. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आहेत. यामुळे त्यांनी उघडलेल्या या मोहिमेकडे सर्वच पक्ष सावधपणे पाहात आहेत. त्यांच्या या पवित्र्यामुळे एकूणच अन्य पक्ष, संघटना आणि नेत्यांनी देखील या विषयावर आपली मते व्यक्त करणे सध्या बंद केलेले आहे. उदयनराजे जरी हा मुद्दा आपल्यासाठी भावनिक असे सांगत असले तरी त्यामागचा ‘बोलविता धनी ’ कुणी अन्य आहे का, अशी दबक्या आवाजात सध्या चर्चा सुरू आहे. दुसरीकडे उदयनराजे यांनी हा प्रश्न स्वकेंद्री केल्यामुळे अन्य पक्षातील नेत्यांनी देखील या मुद्द्यापासून स्वत:ला बाजूला केले असल्याचे दिसून येत आहे. एकूणच त्यांच्या या मोहिमेने भाजप आणि अन्य सर्वच पक्षातील नेते बुचकळ्यात पडण्याबरोबरच सावधही झाले आहेत.

हेही वाचा >>>स्वत: भाजपाच्या उमेदवार पण सासरेबुवांकडून काँग्रेसचा प्रचार! रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा म्हणाल्या “माझे सासरे…”

दरम्यान, उदयनराजे यांच्या प्रकाशझोतात राहण्यामागे राज्यपालांच्या विधानावरच्या रोषापेक्षाही आगामी सातारा नगरपालिका निवडणुकीची राजकीय बांधणी असल्याचे त्यांचे विरोधक बोलतात. सातारा शहरात उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले असे दोनच गट सध्या सक्रिय आणि एकमेकांविरोधात कार्यरत आहेत. शहरातील अल्पशा तिसऱ्या गटाशी शिवेंद्रसिंहराजे यांचे तुलनेने सख्य आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही राजांकडून विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली जात आहे. या भूमिकांमधून शहरातील रखडलेले नागरी प्रश्न, दुरवस्थेवरून लक्ष भावनिक मुद्द्यावर आणण्याचे काम सुरू असल्याची टीका काहींकडून केली जात आहे. नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सातारा दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी दोन्ही राजे गटांना आगामी पालिका निवडणूक एकत्र येत पक्ष चिन्हावर लढवण्याचे आदेश दिले आहेत. सध्या सुरू असलेल्या मोहिमेमागे आगामी पालिका निवडणुकीचे आराखडे असल्याचे देखील बोलले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Udayanraje bhosale stance towards chhatrapati shivaji maharaj left the leaders of all parties baffled print politics news amy
First published on: 01-12-2022 at 13:26 IST