आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : आगामी काळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र दिसतील, असा सनसनाटी दावा बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केला… मंत्री गिरीश महाजन यांच्या आशीर्वादाने नाशिक महापालिकेत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे सुरू असल्याचा गंभीर आरोप शिंदेसेनेच्या नगरसेविकेने केला… शिवसेनेच्या (उबाठा) वतीने नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या रामरक्षा आंदोलनावरून भाजपा आणि ठाकरे गटात राजकीय संघर्ष पेटला… अजित पवार यांच्या निधनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली होती, असा खुलासा खासदार सुनील तटकरेंनी केला… नागपुरात चाललेच आहात, तर संघभूमीवर नाक रगडून आतापर्यंत केलेल्या पापांची माफी मागा, अशी घणाघाती टीका मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे गटावर केली… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

“भविष्यात ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र दिसतील”

आगामी काळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र दिसतील, असा सनसनाटी दावा अमरावतीच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी केला. येत्या १५ दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गटही (अजित पवार-शरद पवार) एकत्र येतील, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. माध्यमांशी संवाद साधताना रवी राणा म्हणाले की, राजकारणात जे अशक्य वाटते, ते अनेकदा शक्य झालेले आहे. पुढील १५ दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील. सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री होतील तर सुनेत्रा पवार या राज्य सांभाळतील. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसा वाचनाला विरोध केला होता, त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद आणि सरकार गेले. आता मात्र ते रामरक्षा, हनुमान चालिसा वाचत आहेत. १८ जुलै रोजी ते नागपुरात येत आहेत. त्यामुळे माझे त्यांना आवाहन आहे की, त्यांनी नागपूरमधील रेशम बागेत येऊन हेडगेवारांच्या स्मारकाला वंदन करावे. तसेच अमरावतीच्या बजरंग गढीला येऊन हनुमान चालिसाचे वाचन करावे. पुढील काही महिन्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसतील, असे भाकितही रवी राणा यांनी केले आहे.

भाजपाच्या मंत्र्यावर शिंदेसेनेचा गंभीर आरोप

मंत्री गिरीश महाजन यांच्या आशीर्वादाने नाशिक महापालिकेत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे सुरू असल्याचा गंभीर आरोप शिंदेसेनेच्या नगरसेविका किरण गामणे-दराडे यांनी केला. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून जिल्ह्याच्या राजकारणात उलट सूलट चर्चा सुरू झाली आहे. नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी पार पडली. या सभेवेळी नगरसेविका किरण यांनी इंदिरानगर येथील राजसारथी सोसायटीच्या जागेचा टीडीआर घोटाळा हा मंत्री गिरीश महाजन यांच्या आशीर्वादाने झाल्याचा आरोप केला. या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली. यादरम्यान समितीद्वारे चौकशी करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या आहेत. हा प्रस्ताव रीतसर मंजूर करण्यात आल्याचे नगररचना उपसंचालक रितेश चव्हाण यांनी सांगितले आहे. यादरम्यान ‘महाजन हे कुंभमेळा मंत्री असून त्यांच्यावर केलेले आरोप तातडीने मागे घ्या, असा आक्रमक पवित्रा भाजपाच्या नगरसेवकांनी घेतला आहे. या घडामोडीकडे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

‘रामरक्षा’वरून भाजपा-ठाकरे गटात संघर्ष

अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या चोरीच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाकडून १८ जुलै रोजी नागपुरात रामरक्षा आंदोलन केले आहे. या आंदोलनावरून भाजपा आणि ठाकरे गटात संघर्ष सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय माजी आमदार संदीप जोशी यांनी खासदार संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतल्यानंतर मत्सव्यवसायमंत्री नितेश राणे यांनी पत्रातून संघभूमीत जाऊन नाक रगडून माफी मागा अशी टीका केली आहे. त्यातच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. द्धव ठाकरेंचे रामरक्षा पठण हा ढोंगीपणा आहे. जनाधार कमी झाल्यानंतर प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन मतांची बँक निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे बावनकुळे म्हणाले. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण असतानाही उद्धव ठाकरे गेले नाहीत. त्याउलट देवेंद्र फडणवीस यांनी आयुष्यभर हिंदुत्वाचे संस्कार जपले आहेत. बाबरी आंदोलनाच्या काळात ते कारसेवेत सहभागी होते, असे बावनकुळे यांनी नमुद केले. दुसरीकडे- रामरक्षा आंदोलनात कितीही अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही हा कार्यक्रम तडीस नेऊ, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले आहे.

नितेश राणे यांची ठाकरे गटावर टीका

अयोध्यातील राम मंदिरातील चोरी प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंनी ‘रामरक्षा’ आंदोलनाची घोषणा केली आहे. उद्या (१८ जुलै) नागपुरात हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याआधी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. खरे हिंदुत्ववादी असाल तर आंदोलनात सहभागी व्हा, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यावरून भाजपाचे मंत्री नितेश राणे ठाकरे गटावर घणाघाती टीका केली. आधी काही करायचे असेल तर रामाच्या नावाने राजकारण बंद करा. अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी आंदोलनात तुमचा कवडीचाही सहभाग नवहता. ज्या कार्यकर्त्यांनी लाठी, गोळ्या खावून तुमच्या आजच्या सहकारी काँग्रेस पक्षाविरोधात आंदोलने केली आणि हा ऐतिहासिक लढा जिंकला, त्या अनेक पिढ्यांपैकी एक देवेंद्रजी आहेत. रामाच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या नेत्यांच्या मांडीवर बसून पुळका दाखवू नका. किमान रामाच्या नावाने राजकारण करु नका. नागपुरात चाललेच आहात, तर संघभूमीवर नाक रगडून आतापर्यंत कलेल्या पापांची माफी मागा, असे नितेश राऊत यांनी समाजमाध्यमांवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

खासदार सुनील तटकरे यांचा मोठा खुलासा

अजित पवार यांच्या निधनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली होती, असा खुलासा खासदार सुनील तटकरे यांनी केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्थखाते मिळू नये म्हणून एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले, अशी चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावरही तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्रीपद उत्तम पद्धतीने भूषवले आहे. ते इतर पक्षाला विशिष्ट खाते देऊ नये, असे बोलतील हे मला वाटत नाही,” असे तटकरे म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादीच्याविलीनीकरणाच्या चर्चा करायच्या असतील, तर त्या वर्षा बंगल्यावर जाऊन का होतील. अजित पवार यांच्या निधनापूर्वी दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली होती, असा दावाही तटकरे यांनी केला. त्यांच्या या विधानानंतर अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले नसते, तर आतापर्यंत दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते, अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे.