आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : भविष्यात दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र यायला हव्यात, अशी इच्छा ठाकरे गटाचे प्रभावशाली नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली… पंतप्रधान मोदींचा विकासाचा मुद्दा मला कुणी समजावून सांगितल्यास मीदेखील भाजपात जाईन, असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले… भाजपाने महापालिका-जिल्हा परिषदांमधून आम्हाला हद्दपार केले असून मोठा भाऊ आम्हाला संपवतोय, अशी खंत शिंदेसेनेच्या आमदाराने व्यक्त केली… काँग्रेसमुक्त भारतचा नारा देणारा भाजपा आता स्वतःच काँग्रेसयुक्त झाला आहे, असा सणसणीत टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला… ‘खान हवा की बाण’ असा आजवर प्रचार करणाऱ्या शिंदेसेनेने परभणी-हिंगोली विधान परिषदेसाठी सईद खान यांना उमेदवारी दिली. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येणार?
विधान परिषदेच्या निवडणुका तोंडावर असतानाच ठाकरे गटाचे प्रभावशाली नेते अंबादास दानवे यांनी एक मोठे विधान केले. एकसंध शिवसेनेत फूट पडल्याची खंत व्यक्त करताना, भविष्यात दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र यायला हव्यात, अशी इच्छा दानवे यांनी बोलून दाखवली. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असून त्याबाबत अनेकांकडून कयास बांधले जात आहे. माध्यमांशी संवाद साधताना दानवे म्हणाले की, भाजपाकडून शिंदे गट संपवण्याचे काम सुरू आहे. मात्र, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला कोणीही संपवू शकत नाही. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकत्र यावे, असे मला बऱ्याचदा वाटते. परंतु ते मला एकट्याला वाटून काहीही फायदा नाही, असेही दानवे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानावर शिंदे गट काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
…तर मी भाजपात जाईन, राऊतांचे विधान
मतदारसंघाच्या विकासकामांसाठी आम्ही सत्ताधारी पक्षात प्रवेश करतोय, हे राजकीय नेत्यांचे ढोंग आता राज्यातील जनतेसमोर उघड झाले आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. पंतप्रधान मोदींचा विकासाचा मुद्दा मला कुणी समजावून सांगितल्यास मीदेखील भाजपात जाईन, असे मोठे विधानही त्यांनी केले. खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला. त्यावर प्रतिक्रिया देताना तनपुरे हे विधानसभा निवडणूक भाजपाच्या विरोधात लढले होते, पण आता अचानक भाजप त्यांच्यासाठी पायघड्या घालत आहे. ते भाजपामध्ये का गेले? तर म्हणे त्यांना मतदारसंघाची विकासकामे करायची आहेत! मग विकास फक्त सत्ताधाऱ्यांच्या पक्षात गेल्यावरच होतो का? मला मोदींचा विकासाचा मुद्दा मला कुणी समजावून सांगितल्यास मीदेखील भाजपात जाईन, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
शिंदेसेनेच्या आमदाराचा भाजपावर गंभीर आरोप
भाजपाने महापालिका-जिल्हा परिषदांमधून आम्हाला हद्दपार केले असून मोठा भाऊ आम्हाला संपवतो आहे, अशी खंत शिंदेसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने शिंदेसेना आणि भाजपातील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून भाजपाने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिल्याने शिंदेसेनेचे नेते नाराज झाले. या निर्णयाविरोधात आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलाने बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सत्तार यांनी भाजपावर गंभीर आरोप केले. शिवसेना संपवण्याचे काम भाजपा करत आहे. आधी हात तोडायचा, मग पाय तोडायचा. हळूहळू सगळे सुरू आहे, असे सत्तार यांनी म्हटले आहे. त्यांच्या या आरोपांवर भाजपाचे नेते काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विजय वडेट्टीवार यांचा भाजपाला टोला
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारी वाटपावर आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका केली. “भाजपा धनदांडग्या उद्योगपतींना आणि आयारामांना जवळ करून निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विश्वासघात करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपाला वर्षानुवर्षे सतरंज्या उचलणारे आणि तळागाळात काम करणारे स्थानिक कार्यकर्ते महत्त्वाचे वाटत नाहीत. त्यांना कार्यकर्त्यांपेक्षा धनदांडगे उद्योगपती अधिक जवळचे वाटू लागले आहेत. त्यामुळे पक्षासाठी रक्त-घाम गाळणाऱ्या निष्ठावंतांवर मोठा अन्याय होत असून त्यांच्यात तीव्र नाराजी आहे. एकेकाळी काँग्रेसमुक्त भारतचा नारा देणाऱ्या भाजपाची परिस्थिती आता पूर्णपणे उलटी झाली आहे. आज भाजपा स्वतःच ‘काँग्रेसयुक्त’ झाला आहे. राज्यातील अनेक आमदार आणि आता विधान परिषदेचे उमेदवारही काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले आहेत. त्यामुळे भाजपाची मूळ वैचारिक ओळखच आता पूर्णपणे पुसली गेली आहे”, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
शिंदेसेनेत ‘बाण आणि खान’ एकत्रच!
ठाकरे गटाने परभणीत मुस्लीम महापौर दिल्यानंतर टीका करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आता परभणी हिंगोली विधान परिषदेसाठी सईद खान यांना उमेदवारी दिली. ‘खान हवा की बाण’ असा आजवर प्रचार करणाऱ्या शिंदेसेनेने आता खान आणि बाण सोबतच आहेत हे यानिमित्ताने स्पष्ट झाले. सईद खान हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असून पाथरी विधानसभा निवडणुकीत धनुष्यबाणाच्या चिन्हावर त्यांचा पराभव झाला होता. “२०१९ मध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले होते. आता परभणीत त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला”, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदेंनी केली होती. त्यांच्या या टीकेला आमचे अनेक पदाधिकारी मुस्लीम असून ते वर्षानुवर्ष काम करत आहेत. ते मुस्लीम आहेत, म्हणून त्यांना पदापासून दूर ठेवणार का? तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावान मुसलमान परवडला, असे प्रत्युत्तर खासदार संजय राऊत यांनी दिले होते. यादरम्यान शिंदेसेनेने सईद खान यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिल्याने त्यावर ठाकरे गट काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
