मुंबई : महाराष्ट्राला लागलेला कलंक धुवून काढण्यासाठी राज्यातील महायुती सरकार उलथण्यासाठी एकत्र या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचाऱ्यांना केले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यातील सरपंचांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.
अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने बुधवारी आझाद मैदान येथे आंदोलन आयोजित केले होते. या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकत्र हजेरी लावली.
हेही वाचा : “ठाकरे गटाचे आंदोलन म्हणजे राजकीय गिधाडवृत्ती”, आमदार ॲड. आशीष शेलार यांची टीका
यावेळी ठाकरे म्हणाले की, निवडणुका आल्याने सरकारी पोपट बोलायला लागले आहेत. ते इथे येऊन ‘लाडका सरपंच’ अशी घोषणा करतील. राज्याच्या तिजोरीकडे लक्ष न देता सध्या घोषणा होत आहेत. योजनांचे पैसे मतांसाठी फिरवले जात आहेत. तुम्ही गावचे मुख्यमंत्री आहात. तुम्ही न्यायाने वागता, पण राज्याचे मुख्यमंत्री तसे वागत नाहीत, असा टोला ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला. तुमच्या व्यथा, वेदना कागदावरती, मैदानावरती न राहता त्यांची अंमलबजावणी होण्यासाठी हे सरकार उलथवून टाकू या, असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा : “पुतळ्याच्या घटनेचे राजकारण नको”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
संगणक परिचालक कमी पैशात काम करतात. अनुभवी संगणक परिचालकांना काढून दुसऱ्याची नेमणूक करण्याचा सरकारचा घाट आहे. सरकार ग्रामपंचायतींना पैसे देत नाही. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर तुम्हाला न्याय देऊ, असा शब्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. विकासकामांचे अधिकार ग्रामपंचायतींना द्या, अशी मागणी शरद पवार यांनी केली.