शिवसेैनिकांचा विश्वास नसल्यास पदावरून पायउतार होण्यास तयार आहे, अशी भावनिक साद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्धापनदिन मेळाव्यात घातली. त्याआधी पराभव किंवा टीका झाल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनाप्रमुखपद सोडण्याचा इशारा दिला होता पण शिवसैनिकांच्या आगहाखातर माघार घेतली होती.

खासदारांच्या बंडाच्या पाशर्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून पायउतार होण्याची भूमिका मांडली. प्रत्येक वेळी माझ्यावर आरोप केले जातात. बंडाला मला दोष दिला जातो. असे असेल तर मीच पायउतार होतो, अशी गुगली ठाकरे यांनी टाकली. साहजिकच उपस्थित शिवसैनिकांनी ठाकरे यांचा हा प्रस्ताव फेटाळून लावला. उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व आल्यापासून नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे या बड्या नेत्यांनी बंड केले. शिंदे यांच्याबरोबर ४० आमदार सोडून गेले. पण सहा खासदारांच्या बंडामुळे खचलेल्या ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुखपदावरून पायउतार होण्याचा इशारा देत सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनाप्रमुखपद सोडण्याचा इशारा दिला होता. १९७८ मध्ये विधानसभा तसेच महानगरपालिका निवडणुकीतील अपयशानंतर शिवाजी पार्कच्या सभेत ठाकरे यांनी पद सोडण्याची इच्छा व्य्कत केली होती. १९९५ नंतर राज्यात शिवसेना- भाजपची सत्ता असतानाही मंत्र्यांच्या कारभारावरून नाराज झालेल्या शिवसेनाप्रमुखांनी पद सोडण्याचा इशारा दिला होताा. तेव्हा माताश्रीबोहर शिवसैनिकांची बरीच गर्दी झाली होती. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आलेल्या काही मंत्र्यांना शिवसैनिकांना प्रसाद दिला होता. तसेच काही जणांच्या गाड्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. ठाकरे यांची तेव्हाची धमकी बरीच गाजली होती. शेवटी शिवसैनिकांच्या आग्रहाखातर ठाकरे यांनी पद सोडण्याचा विचार सोडून दिला होता.