आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : सर्वोच्च न्यायालय धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच देणार आणि जर नाही मिळाल्यास ते गोठवले जाणार, असा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाच्या कथित ट्रोलिंग संस्कृतीवर जोरदार टीका केली… काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अकोला जिल्ह्यातील प्रभावशाली नेता लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली… जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाच्या गुंडांकडूनच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, असा गंभीर आरोप अभिजीत दिपके यांनी केला… भाजपाला एकापाठोपाठ एक दोन धक्के बसले असून शहजाद पुनावाला यांच्यानंतर पक्षातील आणखी एका आमदाराने तडकाफडकी राजीनामा दिला… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
ठाकरेंच्या दाव्याने शिंदे गटात खळबळ
सर्वोच्च न्यायालय धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच देणार आणि जर नाही मिळाल्यास ते गोठवले जाणार, असा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना केला. त्यांच्या या दाव्यामुळे शिंदे गटात मोठी खळबळ उडाल्याची चर्चा असून सगळ्यांचेच लक्ष शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या न्यायालयीन खटल्याकडे लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या पक्षातील जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि विधानसभा प्रमुखांची ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत संघटनात्मक विषयांसह सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील प्रकरणावरही चर्चा करण्यात आल्याचे समजते. बैठकीदरम्यान ठाकरे यांनीही सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाबाबत न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला. तसेच, कोणत्याही परिस्थितीत हे चिन्ह दुसऱ्या गटाकडे जाणार नाही, गरज पडल्यास ते गोठवले जाऊ शकते, असेही त्यांनी बैठकीत सांगितल्याचे समजते. दरम्यान, शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर २०२२ पासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाची नुकतीच सुनावणी पार पडली असून, अंतिम निर्णयाकडे ठाकरे आणि शिंदे गटासह सगळ्यांचेच लक्ष लागून आहे.
“मोदीजी, दुसऱ्यांनाही आई असते…”
जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या वादावरून महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनादरम्यान स्वतःविषयी आणि त्यांच्या आईविषयी वापरण्यात आलेल्या आक्षेपार्ह भाषेवर प्रतिक्रिया दिली. त्यावर भाष्य करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विषयावर सविस्तर भूमिका मांडली. जंतर-मंतर आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वापरण्यात आलेली भाषा पूर्णपणे अयोग्य होती आणि अशा प्रकारच्या भाषेचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही, असे राज म्हणाले. पंतप्रधानांनी त्यांच्या आईबद्दल झालेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली, ते योग्यच आहे. पण दुसऱ्यांनाही आई असते. त्यामुळे राजकीय मतभेद असले तरी कोणाच्याही कुटुंबीयांविषयी अपमानास्पद भाषा वापरली जाऊ नये. ही शिकवण सर्वांना लागू झाली पाहिजे. तुम्ही आंदोलक विद्यार्थ्यांना जशी समज देता, तशीच तुमच्या पक्षातील ट्रोलर्सनाही द्या, असे आवाहनही राज यांनी पंतप्रधान मोदींना केले.
अभिजीत दिपकेंचा भाजपावर गंभीर आरोप
जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाच्या गुंडांकडूनच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, असा गंभीर आरोप कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी केला. दिल्लीतील आंदोलनात जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांनी आज जाहीर पत्रकार परिषद घेतली होती. एका पोलिसाच्या मुलीने आपल्या वडिलांच्या डोक्याला पाच टाके पडल्याचे त्यात सांगितले. याबाबत प्रसारमाध्यमांनी दिपके यांची प्रतिक्रिया जाणून घेतली तेव्हा आंदोलनात मारामारी करणारे भाजपाचे गुंड होते, असा आरोप त्यांनी केला. पोलिसांसोबत जे झाले ते वाईटच झाले, पण दगड कोणी आणून ठेवले होते? दगडांनी भरलेला ट्रक तिथे कसा आला? हे सगळे भाजपाच्या लोकांनी केले, असे दिपके म्हणाले. दगडफेक केली त्यांच्यावर कारवाई करू शकता; पण ज्या विद्यार्थ्यांनी काहीच केले नाही त्यांना का त्रास दिला जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेसचा प्रभावशाली नेता शिंदे गटात?
अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रभावशाली नेते डॉ. अभय पाटील हे लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. आज डॉ. अभय यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या बैठकीला एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय ॲड. निलेश देशमुख हे देखील उपस्थित होते. ही भेट नेमकी राजकीय होती की खासगी, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. डॉ. अभय पाटील यांनी २०२४ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे यांना कडवी झुंज दिली. मात्र, या अटीतटीच्या लढतीत धोत्रे यांनी २० हजार मतांनी विजय मिळवला. त्यावेळी वंचितचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यानंतर २०२५ मध्ये अभय पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत पक्षातील सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आज झालेल्या बैठकीमुळे ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
भाजपाला सलग दोन मोठे धक्के
जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्त शहजाद पुनावाला यांनी तडकाफडकी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या सर्व घडामोडीनंतर भाजपाला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. बिहारमधील भाजपाचे विधान परिषदेचे आमदार देवेश कुमार यांनीही आपल्या सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती अवधेश नारायण सिंह यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. देवेश यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे भाजपात मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, देवेश हे आज मागच्या दारातून विधान परिषद अध्यक्षांच्या दालनात गेले. त्यांनी अध्यक्ष अवधेश नारायण सिंह यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आणि तिथून निघून गेले. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी आणि इतर नेतेही अध्यक्षांच्या भेटीसाठी पोहोचले. राजीनामा सादर केल्यानंतर देवेश कुमार तिथून तात्काळ निघून गेले. दरम्यान, या रिक्त झालेल्या जागेवर भाजपाचे प्रभावशाली नेते दीपक प्रकाश यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे.
