मुंबई : राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत. महायुतीचे आठ तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार संख्याबळानुसार निवडून येऊ शकतो.

माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा निवडणूक न लढविणाऱ्यावर ठाम आहेत. त्याऐवजी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली जाणार आहे. भाजपकडून उमेदवारी देताना नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे संकेत आहेत. उपसभापती निलम गोऱ्हे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का, याचीही उत्सुकता आहे.

विधान परिषदेच्या नऊ जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार १२ मे रोजी निवडणूक होणार असून, २३ ते ३० एप्रिल या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे पाच, शिवसेना शिंदे गटाचे दोन, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महाविकास आघाडीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. राज्यसभेची निवडणूक गेल्या महिन्यात बिनविरोध पार पडली होती. विधान परिषदेची निवडणूकही याच धर्तीवर बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत.

उद्धव ठाकरे लढणार का?

महायुतीचे आठ उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. ४६ आमदार असलेल्या महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येण्यात काहीच अडचण येणार नाही. महाविकास आघाडीकडे १६ मते अतिरिक्त असली तरी दुसरा उमेदवार उभा करण्याचा धोका पत्करला जाणार नाही. माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे निवडणूक न लढविण्यावर ठाम आहेत. पण ठाकरे यांनीच पुन्हा निवडणूक लढवावी, असा दबाव वाढू लागला आहे.

उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास त्यांना पाठिंबा देऊ, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी स्पष्ट केले. ठाकरे निवडणूक लढणार नसल्यास महाविकासआ आघाडीत कोणत्या पक्षाला उमेदवारी द्यायची याची चर्चा झाली पाहिजे, अशी भूमिका सपकाळ यांनी मांडली. शिवसेना ठाकरे गटाकडून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे नाव निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने शरद पवारांना पाठिंबा दिला होता. यंदा शिवसेना ठाकरे गटाने या जागेवर दावा केला आहे.

निलम गोऱ्हे प्रयत्नशील

शिवसेना शिंदे गटाचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. विद्यमान उपसभापती निलम गोऱ्हे यांची मुदत संपत असल्याने त्यांना पुन्हा आमदारकी व उपसभापतीपद कायम राहावे, अशी इ्च्छा आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सातापा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश दिल्याने गोऱ्हे या वादग्रस्त ठरल्या होत्या. भाजपच्या धुरिणांना गोऱ्हे यांची कृती अजिबात पसंत पडली नव्हती. राज्यसभेप्रमाणेच शिंदे हे पक्षाला फायदेशीर ठरू शकतील अशा नेत्यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटात अनेक जण आमदारकीसाठी इच्छूक आहेत.

भाजपामध्ये नवीन चेहरे

भाजपाच्या निवृत्त होणाऱ्या आमदारांपैकी संदीप जोशी यांनी पुन्हा निवडणूक लढणार नाही, असे आधीच जाहीर केले आहे. रणजितसिंह मोहिते- पाटील यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही.

लोकसभेच्या माढा मतदारसंघातील भूमिकेवरून नेतृत्वाची त्यांच्यावर खप्पामर्जी झाली होती. दादाराव केचे यांना विधानसभेला उमेदवारी नाकारण्यात आल्याने गेल्या वर्षी विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती. त्यांना पुन्हा संधी मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. संभाजीनगरचे संजय केनेकर यांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल, असे बोलले जाते. भाजपमधून एका महिलेला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

निवृत्त होणारे नऊ सदस्य

उद्धव ठाकरे (शिवसेना), डॉ. निलम गोऱ्हे (शिवसेना शिंदे), रणजितसिंह मोहिते-पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर (भाजप), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी शरद पवार), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी अजित पवार गट), राजेश राठोड (काँग्रेस)

निवडून येण्यासाठी किती मते आवश्यक?

निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या २९ मतांची आवश्यकता आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे पाच, शिवसेना शिंदे गटाचे दोन, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो.