आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कल्याण न्यायालयाने समन्स पाठवले असून सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले… मला भाजपाकडून अनेक ऑफर आल्या, असा सनसनाटी दावा कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला… पुलवामा आणि पहलगाम दहशतवादील हल्ल्यानंतरच अमित शाह यांना पदावरून हटवायला पाहिजे होते, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली… भारताला आतून कमकुवत करण्यासाठी तरुणांना ड्रग्ज पुरवले जातात आणि यामागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला… शरद पवार हे पंतप्रधान मोदींना भेटले, म्हणजे आम्ही लगेच एनडीएसोबत जाणार असा निष्कर्ष काढू नका, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

ठाकरे-शिंदेंना न्यायालयाचे समन्स

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कल्याण न्यायालयाने समन्स बजावले आहे. एकाच प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले असले तरी दोन्ही नेत्यांना वेगवेगळ्या तारखेला सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे यांना येत्या ५ ऑगस्ट रोजी, तर एकनाथ शिंदे यांना ६ ऑगस्टला न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहावे लागणार आहे. २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघात एकसंध राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे विरुद्ध शिवसेनेचे आनंद परांजपे अशी थेट लढत झाली होती. त्यावेळी ठाकरे यांनी घेतलेल्या प्रचारसभेत डावखरे यांचा एक व्हिडिओ दाखवला होता. या प्रकरणी ठाकरे, शिंदे, पराजंपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात डावखरे यांनी खटला दाखल केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यादरम्यान ठाकरे आणि शिंदे यांना न्यायालयाने समन्स बजावले असून हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे ते नेमकी काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

अभिजीत दिपके यांचा सनसनाटी दावा

जंतर मंतरवर आंदोलन सुरू असताना मला भाजपाकडून अनेक ऑफर आल्या होत्या, असा सनसनाटी दावा कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला. भाजपामध्ये प्रवेशासाठी आपल्याला धमक्याही मिळाल्या असल्याचे दिपके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून अनेकांनी तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर दिपके यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेले आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या घरी परतले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिपके यांनी मला भाजपा प्रवेशाच्या अनेक ऑफर आल्याचा दावा केला. दरम्यान, त्यांचा हा दावा भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेटाळून लावला आहे. भाजपामध्ये प्रवेशासाठी कोणालाही धमक्या देण्याची गरज नसते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

संजय राऊत यांचा भाजपावर हल्लाबोल

पुलवामा आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरच अमित शाह यांना केंद्रीय गृहमंत्री पदावरून हटवायला पाहिजे होते, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये आम्ही जनरल डायर पाहिला होता. जंतर मंतरला आम्ही जनरल कायर बघितला. दोन मुद्दे समोर येत आहेत. एक तर त्यांनी हे आदेश दिले का किंवा त्यांच्या पश्चात त्यांना न सांगता हे सगळे घडले का? काहीही असले तरी त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. जर त्यांना न विचारता गोळीबार झाले असेल, तरीही गृहमंत्री म्हणून जबाबदारी त्यांचीच आहे. दोन्ही बाजूंनी जर आपण पाहिले, तर अमित शाह हे अपराधी आहेत आणि त्यांचा राजीनामा मागणे हे राष्ट्राचे कर्तव्य असल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली. त्यांच्या या टीकेला भाजपा काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

भारताला आतून कमकुवत करण्यासाठी तरुणांना ड्रग्ज पुरवले जातात आणि यामागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्य सरकारच्या वतीने व्यसनमुक्तीसाठी ‘नशामुक्त मुंबई’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वरळीत झाला. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम डोम वरळी येथे फडणवीसांनी हजारो शालेय विद्यार्थ्यांना नशामुक्त समाजाची दिली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नशामुक्त भारताच संकल्प केला आहे, त्यासाठी आपल्याला देखील ड्रग्स फ्री मुंबई आणि महाराष्ट्र करणे गरजेचे आहे. जगातील आपण चौथी अर्थ व्यवस्था, स्पेस क्षेत्रात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा आपण विक्रम केला. अमेरिकेनंतर आपण हे सगळ केलं आहे, असे फडणवीस म्हणाले. भारताला आतून कमकुवत करण्यासाठी तरुणांना ड्रग्ज पुरवले जातात आणि यामागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला.

जयंत पाटील यांचा माध्यमांना सल्ला

ज्येष्ठ नेते शरद पवार हे पंतप्रधान मोदींना भेटले, म्हणजे आम्ही लगेच भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर जाणार असा निष्कर्ष काढू नका, असे आवाहन राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते जयंत पाटील यांनी माध्यमांना केले. ते सांगलीत जिल्हा परिषदेत पत्रकारांसोबत बोलत होते. मोदी आणि पवार यांच्या भेटीवर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, या भेटीसंदर्भात स्वत: पवार यांनीच खुलासा केला आहे. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाबाबत त्यांनी मोदी यांना तरुणांशी सवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचा सल्ला दिला होता. एनडीएसोबत जाण्याविषयी कोणतीही चर्चा झाली असेल, असे वाटत नाही. आंदोलनासंदर्भात मीदेखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून, मुंबईतील आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नका, अशी विनंती केली आहे. विद्यार्थी आंदोलकांचे नेते अभिजीत दिपके यांना केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार प्रत्येक राज्याने गुन्हे मागे घ्यायला हवेत, असा सल्लाही जयंत पाटील यांनी दिला.