आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : शिवसेना ठाकरे गटाचे ७ खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा रंगताच संजय राऊत यांनी अमित शाहांचे नाव घेत तीव्र संताप व्यक्त केला… भाजपाच्या बंडखोर उमेदवाराने नाशिक विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्यास नकार दिल्यामुळे शिंदे गटात मोठी खळबळ उडाली… पंतप्रधान मोदींमुळे भारत जागतिक महासत्तेकडे जात असून महाराष्ट्राच्या विकासातही त्यांचे मोठे योगदान आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काढले… मी कोणत्याही महिलेला अशोक खरातकडे घेऊन गेले नाही आणि माझ्याकडे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ नव्हते, असे स्पष्टीकरण रुपाली चाकणकर यांनी दिले… जवाहरलाल नेहरू यांच्या कर्तृत्वाची आणि त्यांनी देशासाठी केलेल्या त्यागाची बरोबरी इतर कोणाशीही होऊ शकत नाही, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
ठाकरे गटाचे ७ खासदार फुटीच्या उंबरठ्यावर?
शिवसेना ठाकरे गटाचे ७ खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७ जून रोजी या खासदारांबरोबर दिल्लीत बैठक घेतल्याचा दावाही काही वृत्तांमधून करण्यात आला. या संभाव्य फुटीच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “आमचे सर्व खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षासोबत ठामपणे उभे आहेत. पक्षात फूट पडल्याच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. एखादी राजकीय वावटळ निर्माण करून जाणीवपूर्वक संभ्रमाचे वातावरण तयार केले जात आहे. या चर्चांमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ठरवून आखलेली रणनीती आहे,” असा आरोप राऊत यांनी केला. तसेच, राजकारणात संवाद सुरू असतो. कुणी संपर्क साधला म्हणजे पक्षांतर होते असे नाही. आमचे सर्व सहकारी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत यांनीही ठाकरेंच्या खासदारांशी उपमुख्यमंत्री शिंदे यांची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ठाकरे गटातील फुटीच्या चर्चा हवेतच विरल्या आहेत.
नाशिकमधील बंडखोरीमुळे शिंदेसेनेत खळबळ
भाजपाचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांनी नाशिक विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्यास नकार दिल्यामुळे शिंदे गटात मोठी खळबळ उडाली. काहीही झाले तरी भाजपाच्या नेत्यांनी गिते यांची मनधरणी करून त्यांना माघार घेण्यास भाग पाडावे, असा आग्रह शिंदे गटातील नेत्यांनी धरला आहे. यादरम्यान गिते यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर करावा, यासाठी अखेरचा उपाय म्हणून त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घालून देण्याचे डावपेच आखण्यात आले. त्यानुसार गोकुळ गिते हे बुधवारी मुंबईकडे रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचा पुनरुच्चार केला. तसेच महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे आणि दराडे कुटुंबावर टीका केली. गोकुळ गिते हे भाजपाचे नाशिक महापालिकेतील माजी स्थायी सभापती गणेश गिते यांचे बंधू आहेत. त्यांच्या बंडखोरीमुळे भाजपासह शिंदे गटात तीव्र नाराजी पसरल्याचे दिसून येत आहे.
शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १२ वर्षांत भारताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली असून आपला देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासालाही अभूतपूर्व गती मिळाली आहे, असे तोंडभरून कौतुकही त्यांनी केले. नवी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, इतिहासात सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी ४ हजार ३९८ दिवसांचा विक्रम प्रस्थापित केला आहे. मात्र त्यांनी केवळ विक्रमच केला नाही, तर भारताचा डंका जगभरात वाजवण्याचे काम केले आहे. त्यांनी देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आणली असून ती तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा त्यांचा संकल्प आहे. भारत आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असल्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाला वाटत आहे. महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांनाही मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला, असेही शिंदे यांनी नमूद केले.
“मी कोणत्याही महिलेला खरातकडे नेले नाही”
मी कोणत्याही महिलेला भोंदू अशोक खरातकडे घेऊन गेले नाही आणि माझ्याकडे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ नव्हते, असे स्पष्टीकरण महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये चाकणकर म्हणाल्या की, कोणताही ठोस पुरावा नसताना गेल्या दोन महिन्यांपासून माझ्यावर गंभीर आरोप करण्यात आले. काहींनी अतिशय खालच्या पातळीवरील टीकाही केली. त्याचबरोबर माझ्या कुटुंबीयांनाही लक्ष्य करण्यात आले. हे सर्व आमच्यासाठी अत्यंत वेदनादायक होते. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी आपण स्वतःहून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे चाकणकर यांनी स्पष्ट केले. हा छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ आणि सावित्रीबाईंचा महाराष्ट्र आहे, जिथे संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न या विकृत लोकांनी केला आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
“नेहरूंशी कुणाची तुलना होऊ शकत नाही”
जवाहरलाल नेहरू यांच्या कर्तृत्वाची आणि त्यांनी देशासाठी केलेल्या त्यागाची बरोबरी इतर कोणाशीही होऊ शकत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये आयोजित केलेल्या पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते. उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, मोदींना अधिक काळ पंतप्रधानपद मिळाले ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या चाहत्यांची ती इच्छा असू शकते; पण ही स्पर्धा नेहरूंशी होऊ शकते का? पंतप्रधान होण्यापूर्वी नेहरूंनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली दीर्घ काळ संघर्ष केला. अनेक वर्षे तुरुंगवास भोगला आणि इंग्रजांना देशातून बाहेर काढण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे, हा इतिहासाचा भाग कोणीही विसरू शकत नाही. काँग्रेसच्या लोकांनी शिखांवर हल्ला केला, असे एक मंत्री (गिरीश महाजन) पंजाबमध्ये जाऊन बोलले. त्यांनी लक्षात घ्यावे की, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे नेहरू कुटुंबियांची तुलना कोणासोबत होऊ शकत नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
