आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : परभणीत ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली असून पक्षातील ८२ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला लवकरच मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली… महायुतीतील अंतर्गत मतभेदातून भाजपाने गोकुळ दूध संघावर प्रशासक लादल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला… पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालांवर भाष्य करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांची पाठराखण केली… उपमुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात भाजपाने संघटनात्मक बैठका घेण्यास सुरुवात केल्याने तर्कवितर्कांना उधाण आले… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

ठाकरे गटातून ८२ जणांचे राजीनामे

परभणीत शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली असून पक्षातील ८२ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे तडकाफडकी राजीनामे दिले. खासदार संजय जाधव हे ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. हीच बाब लक्षात घेता पक्षाने जाधव यांचे समर्थक असलेले गंगाप्रसाद आणेराव यांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी केली. या प्रकारावरून खासदार जाधव यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्ष नेतृत्वाकडे पाठवण्याचे सत्र सुरू केले आहे. येत्या आठ दिवसात पक्षश्रेष्ठींनी आपला निर्णय मागे न घेतल्यास आम्ही पक्षाच्या सदस्यपदाचाही राजीनामा देणार असल्याचा इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्याचवेळी काही पदाधिकाऱ्यांनी मात्र राजीनाम्याबाबत संयमाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता यावर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ऑपरेशन टायगर आधीच शिंदेंना धक्का?

काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. ठाकरे गटातील आमदार-खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून केला जात आहे. मात्र, ऑपरेशन टायगरआधीच शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्या आणि प्रवक्त्या शायना एन.सी. लवकरच शिंदे गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराज असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान शायना यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने या चर्चांना आणखीनच हवा मिळाली आहे. लवकरच त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार कयास अनेकांनी बांधले आहे. मात्र, याबाबत शायना यांनी कुठलेही अधिकृत विधान केलेले नाही. जर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यास शिंदे गटासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो.

ठाकरे गटाकडून ममतांची पाठराखण

पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालांवर भाष्य करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांची पाठराखण केली. मुंबईत घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेतून त्यांनी भाजपाच्या नेत्यांवर टीकेची तोफ डागली. ममता बॅनर्जी यांचा पराभव झालेला नाही, तर त्यांचा पराभव करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व यंत्रणांचा गैरवापर केला, असे संजय राऊत म्हणाले. बंगालमध्ये मोदी आणि अमित शहा यांनी इराण-इस्रायल युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली होती. सैन्य, आर्थिक दहशतवाद आणि अफवांच्या जोरावर, तसेच मतदार यादीतून नावे वगळून ममता बॅनर्जींना रोखण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी राजीनामा न देण्याचा घेतलेला निर्णय हा निवडणूक आयोग आणि सरकारच्या हुकूमशाही कृत्यांविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनाचाच एक भाग आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांच्यासह राहुल गांधी आणि देशातील सर्व प्रमुख नेत्यांनी ममता बॅनर्जींना फोन करून पाठिंबा दर्शवला आहे. आम्ही सर्वजण या लढाईत तुमच्यासोबत असल्याची ग्वाही या नेत्यांनी ममतांना दिली आहे, असेही राऊत म्हणाले.

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाच्या बैठका

ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदर शहरात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्यस्तरीय संघटनात्मक बैठका घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिंदे गटानंतर आता भाजपाचे महत्त्वाचे निर्णयही ठाण्यातूनच घेतले जात असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले. मिरा भाईंदर महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असून ९५ पैकी तब्बल ७८ नगरसेवक पक्षाचे आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्ष संघटना मजबूत झाल्याने शहराला पक्षामध्ये विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता जिल्हास्तरीय बैठकींसाठीही मिरा भाईंदरची निवड केली जात आहे. मंगळवारी मिरा रोड येथील एका खासगी हॉटेलमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संघटनात्मक बैठक पार पडली. विशेष म्हणजे, प्रदेशाध्यक्ष शहरात येऊन बैठक घेत असतानाही याबाबतची माहिती अत्यंत मर्यादित कार्यकर्त्यांनाच देण्यात आल्याचे समोर आले आहे. ठाणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे जिल्ह्यात भाजपाकडून अशा बैठका घेतल्या जात असल्याने त्याची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

सतेज पाटील यांची महायुतीला विचारणा

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख सत्ता केंद्र असलेल्या गोकुळ दूध संघावर अखेर प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. सातारचे उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासक समितीने कार्यभारदेखील स्वीकारला. गोकुळवर प्रशासक नियुक्त होऊ नये यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. हाच धागा पकडत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सरकारला विचारणा केली. महायुतीतील अंतर्गत मतभेदातून भाजपाने गोकुळ दूध संघावर प्रशासक लादल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला. महायुतीचा अध्यक्ष असलेल्या गोकुळवर प्रशासक येतोच कसा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कोणत्याही स्थितीत गोकुळ दूध संघ टिकला पाहिजे. महायुतीचा अध्यक्ष असताना या दूध संघावर प्रशासक येणे दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले.