आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : सचिन अहिर यांच्यानंतर विधानपरिषदेतील ठाकरे गटाचा आणखी एक आमदार शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करताच सचिन अहिर यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली… राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीवर टीकेचा भडिमार केला… सचिन अहिर यांचा राजकीय प्रवास कलंकित असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून केली… विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणावरून काँग्रेसने मुख्यमंत्री फडणवीसांना महत्वाचे प्रश्न विचारले… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
ठाकरे गटाचा दुसरा आमदारही फुटणार?
राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज बांधणे कठीण असते. दोन आठवड्यांपूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटाची कास धरली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय व विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. या धक्क्यातून ठाकरे गट सावरत असतानाच पक्षातील आणखी एक आमदार सुनील शिंदे हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सुनील शिंदे हे वरळी विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे प्रभावशाली नेते आहेत. त्यांच्याबरोबर ठाकरे गटाचे ११ आमदारही शिंदेसेने प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे- सुनील शिंदे यांनी मात्र या वृत्तांचे खंडन केले असून आपले हितशत्रू जाणीवपूर्वक अशा वावड्या उठवत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या चर्चा सध्यातरी हवेतच विरल्या आहेत.
शिंदेसेनेत प्रवेश करताच अहिरांना लॉटरी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करताच सचिन अहिर यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची लॉटरी लागली आहे. या निवडणुकीत भाजपाप्रणीत महायुतीने सचिन अहिर यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाने जगन्नाथ अभ्यंकर यांना मैदानात उतरवले होते. विधानपरिषदेतील संख्याबळ लक्षात घेता महायुतीचा एकतर्फी विजय निश्चित होता. मात्र, तरीही भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी जगन्नाथ अभ्यंकर यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन अभ्यंकर यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यातच उपसभापतींची निवड सर्वानुमते आणि बिनविरोध व्हावी, अशी सगळ्यांची इच्छा असल्याचे ठाकरे गटाचे अनिल परब यांनी सांगितले. त्यामुळे सचिन अहिर यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचे आभार मानले.
राज ठाकरे यांची भाजपावर टीका
राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर टीकेचा भडिमार केला. “महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचे गलिच्छ राजकारण सुरू आहे. उद्या सत्ता गेल्यावर अशाच प्रकारच्या गोष्टींचा भाजपालाही त्रास होईल. त्यावेळी काय कराल? आपण काय करतोय, कुठपर्यंत जातोय याला काही मर्यादा आहे की नाही? असा प्रश्न राज यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेतून उपस्थित केला. प्रश्न (आमदार-खासदारांना) विकत घेणाऱ्यांचा नाही, तर विकले जाणाऱ्यांचा आहे. आता देहविक्रीला हे तयारच असतील, तर गिऱ्हाईक आहेतच. हे घाणेरडे राजकारण सुरू आहे. लोकांमध्ये या गोष्टीचा संताप आहे. आपण पत्त्याचा बंगला करायचो तसा हा उलटा आहे. त्यांच्या खालचा पत्ता मोदींचा आहे. तो एकदा सटकला हे सगळे कोसळणार आहे. जे काही आज टिकून आहे ते मोदींवर टिकून आहे. अशा गोष्टींमध्ये तुम्ही जे भयानक राजकारण खेळता हे त्यांनाही अंगाशी येणार आहे, असा इशाराही राज यांनी भाजपाला दिला.
संजय राऊत यांची अहिरांवर टीका
सचिन अहिर यांचा राजकीय प्रवास कलंकित असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेतून केली. शरद पवार यांना बेसावध ठेवून सचिन अहिर हे एकसंध शिवसेनेत दाखल झाले होते. आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी त्यांनी शरद पवार यांचीही साथ सोडली होती. त्यामुळे जे शरद पवाराचे झाले नाही ते आमचे कसे होतील, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला. शिवसेनेत आल्यानंतर सचिन अहिर यांचे राजकीय भविष्य घडवण्याचे काम आदित्य ठाकरे यांनी केले. त्यांना भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष केले. संपूर्ण पुणे जिल्हा त्यांच्या ताब्यात देण्यात आला होता. अजून एखाद्याला काय द्यायला पाहिजे? असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला. सचिन अहिर यांच्यावर आम्ही सगळ्यांनीच प्रेम केले. पण तेच आमच्या डोक्यात दगड टाकून निघून गेले, असा संतापही संजय राऊत यांनी व्यक्त केला.
फडणवीसांना काँग्रेसचे महत्वाचे प्रश्न
नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणावरून काँग्रेसने मुख्यमंत्री फडणवीस यांना काही महत्वाचे प्रश्न विचारले. काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, अखिल भारतीय सेवा (आचार) नियम, १९६८ मधील विविध नियमांचा उल्लेख करत, नांगरे पाटील यांनी संबंधित कार्यक्रमासाठी राज्य सरकारची पूर्वपरवानगी घेतली होती का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्याशिवाय सेवा नियमांनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजकीय तटस्थता आणि पदाची प्रतिष्ठा जपणे अपेक्षित असताना, एका विशिष्ट वैचारिक संघटनेच्या मंचावर जाऊन तिचे सार्वजनिक कौतुक करणे हे त्या तत्त्वांशी सुसंगत आहे का, असा प्रश्नही विचारण्यात आला. पोलीस अधिकारी हा कायद्याचा रक्षक असून कोणत्याही विचारधारेचा प्रचारक नसल्याचे भान सरकारला आहे का, अशी टीकाही काँग्रेसकडून करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
