आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : राज्यात विधान परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच ठाकरे गटाने तीन प्रभावशाली नेत्यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी केली… भाजपाच्या चार माजी नगरसेवकांसह ठाकरे गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला… शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या पक्षाचा विश्वासघात केल्याची टीका पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली… विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या असल्याचा आरोप काँग्रेसने केला… उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
ठाकरे गटातून तीन बड्या नेत्यांची हकालपट्टी
राज्यात विधान परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाने तीन प्रभावशाली नेत्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला. छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघातून ठाकरे गटाने देवयानी डोनगावकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजपाच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळेच ठाकरे गटाने देवयानी यांच्यासह त्यांचे पती कृष्णा डोनगावकर यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी केली. दुसरीकडे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघातून ठाकरे गटाने बाळ माने यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु त्यांनीही निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावरही मोठी कारवाई केली. या सर्व नेत्यांनी पक्षाचा आदेशाला बगल देत मनमानी केल्यामुळे त्यांना शिवसेनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, असे ठाकरे गटाच्या एका नेत्याने सांगितले.
शिंदेसेनेच्या धक्क्याने भाजपात खळबळ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महायुतीतील प्रमुख मित्रपक्ष असलेल्या भाजपाला मोठा धक्का दिला. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा गड मानल्या जाणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील भाजपाच्या चार माजी नगरसेवकांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्याचबरोबर ठाकरे गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनीही शिंदेसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. या पक्षप्रवेशामुळे डोंबिवलीत शिंदे गटाची संघटनात्मक ताकद वाढणार असून, येणाऱ्या काळासाठी हा प्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी भाजपाचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, श्रीकर चौधरी आणि प्रमिला चौधरी यांनी धनुष्यबाण हाती घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. तसेच ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख योगेंद्र भोईर, केडीएमसीच्या निवृत्त सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधले. या पक्षप्रवेशामुळे भाजपात मोठी खळबळ उडाल्याचे सांगितले जाते.
शरद पवार यांच्या पक्षावर गंभीर आरोप
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या पक्षाचा विश्वासघात केला, अशी टीका पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली. विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे येथील महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात आहे. या राजकीय घडामोडीनंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधताना उघडपणे नाराजी बोलून दाखवली. “आमच्या सोबत धोका झाला असून शरद पवार गटाने काँग्रेसचा विश्वासघात केला आहे. पुणे विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीची लढण्याची तयारी होती, काँग्रेस पक्षाचा आकडा सगळ्यात मोठा होता, मात्र या जागेसाठी शरद पवार साहेबांच्या पक्षाने दावा केला होता, पक्षाने मोठ्या मनाने ही जागा साहेबांच्या पक्षाला सोडली होती. मात्र, त्यांनी माघार घेऊन आमचा विश्वासघात केला,” असा आरोप जगताप यांनी केला.
हर्षवर्धन सपकाळ यांची महायुतीवर टीका
विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षांच्या उमेदवारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. भाजपाची सर्वत्र सत्ता असतानाही आणखी सत्ता हवी या सत्तेच्या हव्यासापोटी ते लोकशाही मुल्ये पायदळी तुडवत असल्याची टीकाही त्यांनी केली. बुलढाणा येथे माध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभापाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीतही सत्ताधारी महायुतीकडून ‘पैसा फेक तमाशा देख’ असा खेळ खुलेआमपणे सुरू आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घ्यावेत यासाठी सत्ताधारी भाजपाने सत्ता पैसा या सर्व तंत्राचा गैरवापर केला आहे. घातपात, विश्वासघात, पैशाचे प्रचंड वाटप करण्यात आले आहे. हे चित्र लोकशाहीसाठी अजिबात चांगले नाही, अशी खंतही सपकाळ यांनी व्यक्त केली.
नवनीत राणा यांना राज्यसभेची लॉटरी?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र या चर्चेला अद्याप भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अद्याप कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत राज्यसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान राणा दाम्पत्य पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेची जागा कोणाला मिळणार? राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याची या पदावर वर्णी लागणार याची उत्सुकता अनेकांना लागून असतानाच नवीन राणा यांचेही नाव समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे या जागेबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि भाजपाची भूमिका काय असणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
