आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : शिवसेना ठाकरे गटाने आपल्या पक्षातील खासदाराला दणका देत प्रभावशाली नेत्याची जिल्हाप्रमुख पदावरून तडकाफडकी हकालपट्टी केली… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला शिंदे गटातील आमदाराने तीव्र विरोध केला… उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विक्रमी मताधिक्य मिळवत अजित पवार यांचा विक्रम मोडला… पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या विजयाचा ठाण्यात विजयोत्सव साजरा करण्यात आला… गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या जनतेने पश्चिम बंगालमध्ये खऱ्या लोकशाहीची स्थापना केली, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
ठाकरे गटाने बड्या नेत्याला पदावरून हटवलं
शिवसेना ठाकरे गटाने खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांना दणका देत त्यांचे समर्थक असलेले परभणीचे जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांची पदावरून तडकाफडकी हकालपट्टी केली. त्यांच्याऐवजी विष्णू मुरकुटे यांची परभणीच्या नव्या जिल्हा प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या उचलबांगडीमागे २५ एप्रिल रोजी मुंबईतील शिवसेना भवन येथे झालेली बैठक कारणीभूत मानली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीकडे खासदार संजय जाधव यांच्यासह जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव आणि त्यांचे काही समर्थक अनुपस्थित होते. पक्षाने या अनुपस्थितीची गंभीर दखल घेतली आणि लगेचच गंगाप्रसाद आनेराव यांची जिल्हा प्रमुखपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान विष्णू मुरकुटे यांना केवळ जिल्हा प्रमुखपदच नव्हे तर परभणी आणि गंगाखेड या दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारीही देण्यात आली आहे. या बदलामुळे खासदार जाधव यांना मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.
फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला शिंदेसेनेचा विरोध?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून होणारा विरोध वाढतच चालला आहे. या विरोधामुळे महायुती सरकारला सातत्याने शक्तीपीठ महामार्गाचे रूपरेषा बदलावी लागत आहे. नव्या निर्णयानुसार, शक्तीपीठ महामार्ग हा करवीर विधानसभा मतदारसंघातून जाणार आहे. त्याला आता शिंदेसेनेचे स्थानिक आमदार चंद्रदीप नरके यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. हा महामार्ग माझ्या मतदारसंघातून नेऊ नये, अशी मागणी आमदार नरके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक ठिकाणी भूसंपादन होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांकडे कसायला जमिनी राहणार नाहीत, असे नरके यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे त्यांच्या निवेदनाबाबत काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सुनेत्रा पवार यांनी मोडला अजित पवारांचा विक्रम
सगळ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी २ लाख १४ हजार ९३ इतके विक्रमी मताधिक्य मिळवत अजित पवार यांचा विक्रम मोडला, तर त्यांच्याविरोधात असलेल्या २२ उमेदवार आणि ‘नोटा’ यांना ४८३७ मतांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत निधनानंतर ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, २२ उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतदान घ्यावे लागले. या निकालाची औपचारिकता बाकी होती. या पोटनिवडणुकीसाठी मतदारांमध्ये निरुत्साह राहिल्याने सुमारे ५८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात तीन लाख ८४ हजार ५७९ मतदार असून, त्यापैकी दोन लाख २४ हजार ८७ मतदारांनी मतदान केले. बारामतीतील मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर होता. अजित पवार यांनी २०१९ मध्ये भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा एक लाख ६५ हजार २६५ मताधिक्याने पराभव केला होता.
भाजपचा ठाण्यात पेढे वाटत जल्लोष
पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाने विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे. या विजयानंतर भाजपाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानल्या जाणाऱ्या ठाणे शहरातही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जिल्हाध्यक्ष संदीप सुरेश लेले यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी एकमेकांना पेढे भरवून आणि घोषणाबाजी करत विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. त्यानंतर ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ समोर दुपारी १२.३० वाजता दुसरा विजयोत्सव आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ नगरसेवक संजय संतु वाघुले यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमात प्रवासी आणि नागरिकांनाही पेढे भरविण्यात आले. या विजयोत्सवात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मोदी-शाहांचे अभिनंदन
गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या जनतेने पश्चिम बंगालमध्ये खऱ्या लोकशाहीची स्थापना केली, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. भारतीय जनता पक्षासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलले आहे. आपले लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने ममता दीदींना पराभवाची ‘झालमुडी’ दिली आहे, असेही ते म्हणाले. राज्यातील जनतेने विकास, प्रगती, स्थैर्य आणि शांततेसाठी मतदान केले आहे. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आहे. या शताब्दी वर्षात पूजनीय श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जन्मभूमीत भाजपाचा विजय हा सर्वार्थाने ऐतिहासिक आहे, असेही शिंदे यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृ्वाखाली बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
