महाराष्ट्रातील आजच्या राजकीय बातम्या : शिवसेना ठाकरे गटाचे प्रभावशाली नेते शरद कोळी यांना पोलिसांनी अटक करून थेट येरवडा कारागृहात एका वर्षासाठी स्थानबद्ध केले… अकोला महापालिकेतील शिंदेसेनेचे गटनेते सागर भारुका यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली… शेतकऱ्यांने कर्ज वसुलीच्या तगाद्याने स्वत:ला संपवून घेतल्यास संबंधित बँकांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला… अजितदादांचे नाव वापरणे बंद करा आणि स्वतःच्या नावावर निवडणूक लढवून विजयी होऊन दाखवा, असे आव्हान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विरोधकांना दिले… भाजप सरकारने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना तातडीने हटवून तिथे दुसऱ्याला नियुक्त करावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

ठाकरे गटातील प्रभावशाली नेत्याला अटक

शिवसेना ठाकरे गटाचे प्रभावशाली नेते शरद कोळी यांना सोलापूर पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. त्यांना एका वर्षासाठी थेट येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शरद कोळी यांच्याविरोधात वाळू तस्करी, खंडणीची मागणी आणि प्रक्षोभक वक्तव्यांसह विविध गुन्ह्यांची नोंद आहे. आठवडाभरापूर्वीच त्यांच्यावर MPDA कायद्यानुसार कारवाईचे आदेश जाहीर करण्यात आले होते. एखाद्या सराईत गुन्हेगाराला किंवा समाजासाठी घातक ठरणाऱ्या व्यक्तीला विना-जमीन थेट तुरुंगात स्थानबद्ध करण्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो. हा आदेश निघाल्यापासून शरद कोळी फरार झाले असल्याचे सांगितले जात होते. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली होती. अखेर त्यांना सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक करून येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे. यादरम्यान ही कारवाई राजकीय सुडबुद्धीने केल्याचा आरोप शरद कोळी यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे. तसेच कोळी यांच्यावरील सर्व गुन्हे खोटे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर खंडणीचा गुन्हा

अकोला महापालिकेतील शिंदेसेनेचे गटनेते सागर भारुका यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी त्यांना अटकही केली. या घटनेमुळे अकोल्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. अकोल्यातील बसस्थानक परिसरातील एका हॉटेल मालकाकडे १५ लाख रुपये खंडणी मागितल्याचा आरोप भारुका यांच्यावर आहे. शनिवारी रात्री त्यांनी संबंधित हॉटेलमध्ये जाऊन गोंधळ घातल्याचा व्हिडीओही समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानंतर हॉटेल मालकाने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी भारुका यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच लवकरच त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. यादरम्यान अटक झाल्यानंतर भारुका यांनी राजकीय षड्यंत्राचा आरोप केला आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी मला या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात भाजपा विरुद्ध शिंदेसेना असा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

“शेतकऱ्याने आयुष्य संपवल्यास बँका जबाबदार”

कर्ज वसुलीच्या तगाद्याने शेतकऱ्यांने स्वत:ला संपवून घेतल्यास संबंधित बँकांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळ पडला असल्याने सरकारने पीक कर्जवसुलीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे कोणत्याही बँकेने, पतसंस्थने आणि फायनान्सने शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये, असेही ते म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील दुष्काळाचा आढावा घेतला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथक प्रयत्न करत असून शेतकऱ्यांना दिवाळीपू्र्वी मदत दिली जाईल. तसेच दुष्काळात शेतात पिक नसेल किंवा शेतकऱ्यांनी ते काढून टाकले असेल, तरी पंचनामे केले जातील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या आश्वासनामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विरोधकांना सुनावले

अजितदादांचे नाव वापरणे बंद करा आणि स्वतःच्या नावावर निवडणूक लढवून विजयी होऊन दाखवा, असे आव्हान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विरोधकांना दिले. बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी हजारो शेतकरी सभासद उपस्थित होते. त्यांना संबोधित करताना अजितदादांनी सोमेश्वरच्या सभासदांचा विश्वास जपला. त्यांच्या पश्चात त्यांचे काम पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे. जिथे दादा, तिथे वाहिनी असणारच, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. अजितदादांनंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने प्रत्येकाला संधी देणे शक्य नाही. त्यामुळे जुन्या-नव्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असेल, तर अजितदादांचे नाव वापरणे बंद करा. पवार कुटुंबावर नाराज होऊन बाहेर पडला असाल, तर स्वतःच्या नावावर निवडणूक लढवा, असे आव्हानही सुनेत्रा पवार यांनी विरोधकांना दिले.

“भाजपाने ज्ञानेश कुमार यांना तातडीने हटवावे”

भाजप सरकारने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना तातडीने हटवून तिथे दुसऱ्याला नियुक्त करावे, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली. सरकार आणि ज्ञानेश कुमार यांची मिलीभगत आहे का, असा संशय बळावत आहे. गुंडगिरी आणि दहशत आता लोकांना सहन होत नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला. जर जनतेला नको असेल तर सरकार कसली वाट पाहत आहे? लोकशाही धोक्यात असताना सरकार एवढा विचार का करत आहे? भाजपाचे नेते ज्ञानेश कुमारचे प्रवत्ते आहेत का? तुम्हाला त्याने नोकरीवर ठेवले का? अशा प्रश्नांची सरबत्तीही जरांगे यांनी केली. यादरम्यान ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सोमवारी सुनावणी झाली. यावेळी जगातील सर्वात मोठी लोकशाही धोक्यात आली आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला. तसेच ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्यासंदर्भात अंतरीम आदेश देण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली; परंतु न्यायालयाने तसा अंतरीम आदेश देण्यास नकार दिला. मात्र, प्रतिवादी असलेले ज्ञानेश कुमार तसेच इतर दोन निवडणूक आयुक्तांना नोटीस बजावली आहे.