उद्धव ठाकरे यांची दोन आघाड्यांवर लढाई सुरू, विधिमंडळ पक्षाबरोबरच पक्ष संघटनाही फुटू नये यासाठी बैठकांना जोर

शिवसेना पक्षप्रमुख म्हणून शिवसेना संघटनेत फूट टाळण्यासाठी किंवा किमान राहील यासाठी जिल्हाप्रमुख, विभागप्रमुखांच्या बैठका घेऊन पक्षसंघटना फुटीर आमदारांसह जाणार नाही यासाठी बैठकांना जोर आला आहे.

Uddhav Thackeray fighting on two front
उद्धव ठाकरे यांची दोन आघाड्यांवर लढाई सुरू

सौरभ कुलश्रेष्ठ

मुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना विधिमंडळ पक्षात मोठी फूट पडून सध्या ५५ पैकी ३७ म्हणजे दोन तृतीयांश आमदार हे गुवाहाटीत शिंदे यांच्यासोबत असल्याचे चित्र असल्याने मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांच्यासाठी दोन आघाड्यांवर लढाई सुरू झाली आहे. मुख्यमंत्री म्हणून गुवाहाटीत गेलेल्या आमदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत शिवसेना विधिमंडळ पक्षावर आपलीच पकड राहावी यासाठी कायदेशीर आयुधे वापरण्या येत आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून शिवसेना संघटनेत फूट टाळण्यासाठी किंवा किमान राहील यासाठी जिल्हाप्रमुख, विभागप्रमुखांच्या बैठका घेऊन पक्षसंघटना फुटीर आमदारांसह जाणार नाही यासाठी बैठकांना जोर आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री वर्षा या मुख्यमंत्री निवासस्थानावरून मातोश्री या आपल्या वांद्रे येथील निवासस्थानी मुक्काम हलवला. त्यानंतर विधिमंडळातील आमदारांच्या फुटीचे लोण शिवसेना पक्ष संघटनेत पसरू नये यासाठी गुरुवारपासून वेग आला. शिवसेना भवन हे पक्षाचे मुख्यालय असलेला दादरमधील भाग माहीम विधानसभा मतदारसंघात येतो. तेथील आमदार सदा सरवणकर हे बुधवारी बंडखोरांच्या विरोधात निदर्शने करत होते. पण गुरुवारी ते गुवाहाटीत शिंदे यांच्या गोटात दाखल झाल्याचे दिसताच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सरवणकर यांचा फलकावरील छायाचित्राला काळे फासले. त्यानंतर लगेचच त्या भागातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात शिवसेना पक्षसंघटना सरवणकर यांच्याबरोबर फुटणार नाही यादृष्टीने प्रयत्न करण्यात आले.

महाराष्ट्रातील ठिकठिकाणचे शिवसेनेचे आमदार गुवाहाटील शिंदे यांच्यासोबत आहेत. प्रत्येक ठिकाणी सर्वसाधारणपणे आमदारांच्या मर्जीतील स्थानिक नेते पक्षसंघटनेवर पदाधिकारी म्हणून असतात. शाखाप्रमुख, विभागप्रमुख, जिल्हाप्रमुखपदावरील नेते आमदारांसोबत गेल्यास शिवसेना पक्षसंघटनेतही मोठी फूट पडू शकते. त्यामुळे आमदार गेले तरी पक्षसंघटना आपल्यासोबत राहावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी विविध पातळीवर पक्षसंघटनेच्या बैठका लावण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी जिल्हाप्रमुखांची आणि मुंबईतील नगरसेवकांचीही बैठक घेण्यात येत आहे.

शिवसेनेतील या बैठकांबाबत विचारले असता, मुळात काही आमदार गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्यासोबत असले तरी त्यातील अनेक आमदार मुंबईत आल्यावर पुन्हा शिवसेनेत परत येतील असा आम्हाला विश्वास आहे. त्याचबरोबर शिवसेनेत पक्षसंघटनेच्या बैठका सुरूच असतात. आताही पक्षसंघटना फुटीर आमदारांसोबत नाही तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याने ना पुरेसे आमदार पाठिशी राहतील ना शिवसेना पक्षसंघटना सोबत येईल आणि ना घर का ना घाट का अशी अवस्था एकनाथ शिंदे यांची होईल, अशी प्रतिक्रिया शिवेसना जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी दिली.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uddhav thackeray fighting on two front assembly front and shiv sena party side print politics news asj

Next Story
पक्ष बैठकीला गैरहजेरीसाठी आमदाराला अपात्र ठरविता येणार नाही
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी