आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : कारवाईचा कोणताही कलंक न लागताच कल्याण पूर्वेतील शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक मधूर म्हात्रे यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केला… छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या सत्तेतून भाजपाला दूर ठेवण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांची जोरदार तयारी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली… गडचिरोली जिल्ह्यातील एका बड्या तांदूळ व्यापाऱ्याने मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाखाली कोट्यवधींची वसुली केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला… शिवसेना शिंदे गटाचे ‘हाय कमांड’ मुंबईत नसून दिल्लीत असल्याची खोचक ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली… पंतप्रधान मोदी यांना एपस्टिन प्रकरणावरून अमेरिका ‘ब्लॅकमेल’ करत असल्याचा खळबळजनक दावा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

ठाकरेंचा नगरसेवक अखेर शिंदे गटात

शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण पूर्वेतील नवनिर्वाचित नगरसेवक मधूर म्हात्रे यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केला. कारवाईचा कोणताही कलंक न लागताच म्हात्रे हे शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. म्हात्रे यांच्यावर कारवाई न झाल्याने यापुढे ठाकरे गटातून निवडून यायचे आणि तात्काळ सोयीप्रमाणे अन्य पक्षात दाखल व्हायचे अशी सवय काही राजकीय मंडळींना लागू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. यादरम्यान मधुर म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची चर्चाही स्थानिक राजकारणात रंगली आहे. दुसरीकडे म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरीही आम्ही त्यांच्याविरुद्ध कोकण विभागीय आयुक्तांकडे कायदेशीर दावा दाखल करून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी करणार आहोत, असे ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील यांनी सांगितले आहे.

भाजपाला धक्का देण्याची दोन्ही शिवसेनेची तयारी?

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना जिल्ह्याच्या राजकारणात नवे राजकीय समीकरण आकार घेत असल्याची चर्चा रंगली आहे. भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषदेच्या सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी (ठाकरे-शिंदे) एकत्रित येण्याची तयारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या शिंदे आणि ठाकरे सेनेचे नवनिर्वाचित सदस्य एकत्रित सहलीवर गेल्याचे सांगितले जात आहे. फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली जात असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचे २३ तर शिंदे गटाने २१ सदस्य निवडून आले आहेत. त्याशिवाय शिवसेना ठाकरे गटाला नऊ जागा मिळाल्या आहेत. यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपाने जिल्ह्यात सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. तरीदेखील पक्षाला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले होते. काँग्रेसचे तत्कालीन आमदार अब्दुल सत्ता यांनी ऐनवेळी शिवसेना-काँग्रेस युती घडवून आणत भाजपाला सत्तेपासून दूर टेवले होते. यावेळीही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा : महाआघाडीचे चार आमदार बेपत्ता? भाजपाने राज्यसभेच्या अतिरिक्त जागा कशा जिंकल्या? निवडणुकीत काय घडले?

भुजबळांच्या नावाने कोट्यवधींची वसुली?

गडचिरोली जिल्ह्यातील एका बड्या तांदूळ व्यापाऱ्याने मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाखाली राईस मिलर्सकडून कोट्यवधींची वसुली केल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत केला.आकाश अग्रवाल या व्यापाऱ्याने पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून संपूर्ण जिल्ह्याला वेठीस धरले असून शासकीय धानाचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू असल्याचा दावा पटोले यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात केला. गोंदियाचे जिल्हा पुरवठा अधिकारी आगळे यांच्या भ्रष्टाचाराबाबत तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी त्यांच्या बदलीचे आदेश दिले होते. मात्र, मंत्रालयातील काही बड्या अधिकाऱ्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत आगळे यांना त्याच ठिकाणी दुसरी जबाबदारी दिली आणि त्यांच्या जागी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आघाव पाटील यांची नियुक्ती केली. अजित पवार आता हयात नाहीत; पण त्यांनी सभागृहात दिलेला शब्द सरकार पाळणार का? असा प्रश्नही पटोले यांनी उपस्थित केला.

संजय राऊतांची शिंदे गटावर खोचक टीका

शिवसेना शिंदे गटाचे ‘हाय कमांड’ मुंबईत नसून दिल्लीत असल्याची खोचक ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना केली. एकनाथ शिंदे जरी ‘शिवसेना’ हे नाव वापरत असले तरी, त्यांच्या पक्षाची स्थापना प्रत्यक्षात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. अमित शाह हेच त्यांचे बॉस असून ते दिल्लीत बसतात आणि शिंदे त्यांच्याकडून आदेश घेण्यासाठीच भेटायला जातात, असा टोलाही राऊत यांनी लगावला. राज्यसभा निवडणुकीतील निकालांवर बोलताना राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. क्रॉस व्होटिंग ही नेहमीच होत असते, पण आता ती पैशाच्या जोरावर होत आहे. भाजपने पैशाच्या आधारे मतं विकत घेतली. बिहार, ओडिशा आणि हरियाणामध्येही असे प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला. अशा राजकारणामुळे देशाला फटका बसतो. मात्र, विरोधक एकत्र असून विविध राज्यांमध्ये एकजुटीने लढत असल्याचे राऊत म्हणाले.

हेही वाचा : ठाकरेंच्या आणखी एका शिलेदाराचा राजीनामा; शिंदे गटाच्या नेत्यासह १० जणांवर गुन्हा, वाचा ५ घडामोडी…

प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर सनसनाटी आरोप

संपूर्ण जगभरात गाजत असलेल्या एपस्टीन फाइल प्रकरणांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातील काही मंत्री तसेच बडे उद्योगपती यांची नावे आहे. एपस्टिन प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका ‘ब्लॅकमेल’ करत आहे, असा सनसनाटी आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते आज यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. भारताच्या सार्वभौमतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदासाठी योग्य व्यक्ती नाही, त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नरेंद्र मोदी यांना पदावरून खाली खेचावे, यासाठी वंचित बहुजन आघाडी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक मुख्यालयाच्यासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती, प्रकाश आंबेडकर यांनी दिली. सर्वसामान्य जनतेने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.