आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील युतीची घोषणा होताच शिवसेना ठाकरे गटात जोरदार इनकमिंग सुरू झाली… पक्षातील निष्ठावंतांना उमेदवारी न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार आम्ही करणार असल्याचा इशारा भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांनी दिला… पुणे महानगरपालिकेतील जागावाटपाच्या बैठकीदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे आणि नाना भानगिरे यांच्यात मोठा वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली… पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांबरोबर आघाडी करणे अशक्य असल्याचे सांगत आमदार जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या पक्षाबरोबरच्या युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला… पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळणार असून राष्ट्रवादीला फक्त तीनच जागा मिळणार असल्याचा दावा भाजपाच्या आमदाराने केला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची अधिकृत घोषणा केली. त्यांच्या युतीची घोषणा होताच ठाकरे गटात पक्षप्रवेशांची लगबग दिसून येत आहे. मुंबईतील जोगेश्वरी पश्चिमचे माजी नगरसेवक चंगेज मुलतानी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह ठाकरे गटात प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील मातोश्री या निवास्थानी हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला आहे. मुलतानी यांच्या पक्षप्रवेशामुळे जोगेश्वरी पश्चिम भागात ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मुलतानी यांनी वार्ड क्रमांक ६२ मधून अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. त्यांनी एकसंध शिवसेनेचे उमेदवार राजू श्रीपाद पेडेणेकर यांचा पराभव केला होता. यादरम्यान मशाल हाती घेतल्याने त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाला आमदार हारुन खान, वर्सोवा विधानसभा समन्वयक बाळा आंबेरकर तसेच इतर पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांची उपस्थिती होती.
भाजपात मोठी बंडखोरी होणार?
भाजपातील निष्ठावंतांना उमेदवारी न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार आम्ही करणार, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी दिला आहे. १५ दिवसांपूर्वी पक्षात आलेले लोक आमच्या उमेदवारांच्या मुलाखती घेत असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या विधानामुळे सोलापूरमध्ये भाजपात मोठी बंडखोरी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेकांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे पक्षात जुन्या-नव्यांमधील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान महापालिकेच्या निवडणुकीतही उमेदवारीमध्ये नव्याने आलेल्यांनाच प्राधान्य दिले जाण्याची शक्यता असल्याने भाजपातील जुने कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामधूनच सोलापूरमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुभाष देशमुख यांनी सूचक विधान करत पक्षाला इशारा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर भाजपाचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा : मुंबईची सत्ता मिळाल्यास महापौर कुणाचा? ठाकरे गटाचा की मनसेचा? आदित्य ठाकरेंचं सडेतोड उत्तर
शिंदे गटात वादाची ठिगणी?
पुणे महापालिका निवडणुकीत भाजपाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बाजूला सारून शिंदेंच्या शिवसेनेबरोबर युती केली. परंतु जागावाटपात आग्रही मागणी असूनही भाजपाकडून प्राधान्य दिले जात नसल्याने शिंदे गटात वादाची ठिगणी पडल्याचे दिसून येत आहे. भाजपाबरोबर जागावाटपात तडजोड केल्याचा आरोप करीत शुक्रवारी संतप्त शिवसैनिकांनी नीलम गोऱ्हे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावेळी काहींनी थेट गोऱ्हे यांच्या घरासमोरच ठिय्या मांडला होता. आज या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे, नीलम गोऱ्हे आणि शिंदेसेनेचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्यात बैठक पार पडली. परंतु या बैठकीत मोठा वाद निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या वादानंतर भानगिरे रागारागात बैठकीतून निघून गेल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे शिंदेसेनेत जागांवरून खदखद असल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार- भाजपाने पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला फक्त १५ जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे शिंदे गटातील नेते आणि पदाधिकारी अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान जागावाटपाचा हा तिढा नेमका कसा सोडवला जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार?
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला केवळ तीनच जागा मिळणार असल्याचा दावा भाजपाचे आमदार शंकर जगताप यांनी केला आहे. भाजपा या निवडणुकीत १२५ जागा जिंकणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गेल्यावेळी भाजपाने पिंपरी चिंचवड महापालिकेवर एकहाती सत्तास्थापन केली होती. यंदाही महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाने जोरदार तयारी केली आहे. दुसरीकडे भाजपाच्या हातातून महापालिका खेचण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपली सर्व ताकद पणाला लावून दिली आहे. यादरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे नेते राहुल कलांटे यांनीही भाजपात प्रवेश केल्याने पक्षासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. राहुल कलाटे यांनी पक्षात प्रवेश करण्यापूर्वी आमदार शंकर जगताप यांनी महापालिका निवडणुकीत भाजपा १०० जागा जिंकणार असल्याचे म्हटले होते. आता भाजपाला १२५ जागा मिळणार असून अजित पवार यांना केवळ तीनच जागा जिंकता येतील असा दावा त्यांनी केला आहे.
हेही वाचा : ठाकरे बंधुंच्या युतीनंतर आता काका-पुतण्याही एकत्र येणार? महाविकास आघाडीचे भवितव्य काय?
पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांबरोबर युती नाही : जयंत पाटील
पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांबरोबर आघाडी करणे अशक्य असल्याचे सांगत आमदार जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या पक्षाबरोबरच्या युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुण्यात एकत्र येत असतानाच हाच प्रकार सांगलीत होणार अशी चर्चा सुरू असतानाच तो रद्द झाल्याने याचीही चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील इच्छुकांच्या एकत्रित मुलाखती पार पडल्यानंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) महाविकास आघाडीबरोबर महापालिका निवडणूक लढवणार असून, अन्य कोणाला सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही. जे पक्षच आमचा पक्ष सोडून गेले, ज्यांनी पक्षाला अडचणीत आणले त्यांच्याशी आघाडी कशी शक्य आहे? उलट असे पक्ष बदलूपणा करणारे, गद्दारी करणाऱ्यांचा हिशेब करण्याची हीच वेळ आहे. सांगलीची जनता निष्ठावंतांची कदर करणारी आहे, अशा शब्दांत पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.
