Maharashtra Top Political News Today : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील तीन बंडखोर नगरसेवकांना शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अपात्रतेसाठी अंतिम इशारा नोटीस बजावण्यात आली… ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देताच माजी खासदार उन्मेश पाटील यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिंदेसेनेत प्रवेश केला… कोणत्याही बँकेचा शेतकरी कर्जदार असला तरीही त्याला कर्जमाफीचा लाभ मिळणारच असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली… ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून वैश्विक शांततेसाठी पुढाकार घेण्याची विनंती केली…शिखर बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील दोषमुक्ततेसाठी आमदार रोहित पवार यांनी विशेष सत्र न्यायालयात अर्ज केला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
ठाकरे गटाच्या नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मशाल चिन्हावर निवडून येऊनही पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या तीन नगरसेवकांना शिवसेना ठाकरे गटाकडून पात्रतेची नोटीस बजावण्यात आली. पुढील ४८ तासांत न दिल्यास अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागणार, असा स्पष्ट इशारा या नोटीसीतून देण्यात आला आहे. कल्याण पूर्वेतील ठाकरे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे, पश्चिमेतील स्वप्नाली केणे आणि राहुल कोट यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. पालिकेत ठाकरे गटाचे एकूण ११ नगरसेवक निवडून आले असून त्यापैकी तीन नगरसेवकांनी शिंदे गटाला छुपा पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. या तिन्ही नगरसेवकांची नगरसेवक विजयाची प्रमाणपत्रे शिवसेना शिंदे गटाच्या एका वजनदार नेत्याच्या तिजोरीत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच ठाकरे गटाने या नगरसेवकांना अपात्रतेसाठी नोटीस बजावल्याची माहिती आहे.
शिंदेंच्या शिवसेनेतील इनकमिंग वाढले
शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देताच जळगावचे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिंदेसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. उन्मेश पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी शिंदे यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उन्मेश पाटील पुन्हा जळगावचे खासदार होतील असे वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केले आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात भाजपाच्या स्मिता वाघ व रक्षा खडसे या दोन्ही खासदार आहेत. त्यातच उन्मेश पाटील पुन्हा खासदार होणार असे विधान शिंदेंनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून स्थानिक भाजपमध्ये कुजबुज सुरू झाली आहे.
आणखी वाचा : भाजपाच्या आमदाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; कोण होते गोविंद परमार? त्यांची कारकीर्द कशी राहिली?
कर्जमाफीबाबत फडणवीसांची माहिती
कोणत्याही बँकेचा शेतकरी कर्जदार असला तरीही त्याला कर्जमाफीचा लाभ मिळणारच असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना दिली. राष्ट्रीयकृत बँक असो की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, पीक कर्ज देणाऱ्या प्रत्येक संस्थेचे थकीत कर्ज सरकारच्या वतीने माफ केले जाणार असल्याचे फडणवीस म्हणाले. अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कर्जमाफीवरून सुरू असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत मुख्यमंत्र्यांनी नागपुरातील कार्यक्रमातून शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करण्याच प्रयत्न केला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबतही त्यांनी सविस्तर भाष्य केले. ३० जूनपूर्वी ही शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यासाठी विशेष समिती काम करत असून लवकरच सविस्तर नियमावली जाहीर केली जाणार असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले.
अण्णा हजारे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र
अमेरिका-इराण-इस्रायल यांच्यात युद्धाचा वणवा पेटला असून त्याची धग जगभरातील अनेक देशांना बसत आहे. या युद्धात शेकडो निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. यापार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून वैश्विक शांततसेसाठी पुढाकार घेण्याची विनंती केली आहे. आज जगाला शस्त्रांची नाही तर विश्वास आणि संवादाची गरज आहे. युद्ध केवळ विनाशाकडे नेत असते; तर संवादामुळे तोडगा आणि स्थिरतेचा मार्ग मोकळा होतो. म्हणून, मी नम्रपणे विनंती करतो की, भारताने तटस्थ आणि जबाबदार भूमिका बजावत जागतिक स्तरावर शांतता आणि संवादाला चालना देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे अण्णा हजारे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
हेही वाचा : बिहारमध्ये भाजपाचे ऑपरेशन लोटस? नितीश कुमार यांचे समर्थक आक्रमक का झाले?
आमदार रोहित पवार यांची न्यायालयात धाव
शिखर बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विशेष सत्र न्यायालयात धाव घेतली असून दोषमुक्ततेसाठी अर्ज केला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला मूळ गुन्ह्याचा तपास बंद झाला आहे.त्यामुळे या गुन्ह्याच्या आधारे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या प्रकरणी दाखल केलेले प्रकरण कायम राहू शकत नाही, असा दावा रोहित यांनी दोषमुक्तीची मागणी करताना केला. आपल्याविरुद्ध ईडीने केलेले आरोप हे खोटे असून त्याबाबत खटला दाखल केला जाऊ शकत नाही, असेही रोहित पवार यांनी अर्जात नमूद केले. त्यांच्या या अर्जाची दखल घेऊन न्यायालयाने ईडीला १७ मार्चपर्यंत लेखी उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
