आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : उद्धव ठाकरे यांची राजकीय शून्यता व निष्क्रियतेमुळे त्यांचे काही खासदार व आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटातील नेत्याने केला… केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धर्मनिरपेक्षतेवरील वक्तव्यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटले… जालना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपा-शिंदे गटातील नगरसेवकांमध्ये टोकाचा वाद झाला… बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीनंतर काँग्रेसला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशी टीका भाजपा नेत्याने केली… काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्यास सर्व सत्य समोर आणून पर्दाफाश करेन, असा थेट इशारा नाना पटोले यांनी दिला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
ठाकरेंचे अनेक नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत?
उद्धव ठाकरे यांची राजकीय शून्यता व निष्क्रियतेमुळे त्यांचे काही खासदार व आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेतून केला. ठाकरे गटाचे मुंबईतील दोन-तीन खासदार वगळता इतर सर्व खासदार आणि बहुतांशी आमदार आमच्या संपर्कात असून ते योग्य वेळी ते निर्णय घेतील, असे त्यांनी नमुद केले. उद्धव ठाकरे यांनी २०२० मध्ये भाजपाबरोबरची युती तोडून मुख्यमंत्री होण्यासाठी हिंदुत्वाशी दगा केला. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी उठाव केला. राजकीय पक्षात फूट पडल्यानंतर नेत्यांना जपण्यासाठी पक्षाचे प्रमुख धडपड करतात. उद्धव ठाकरे यांनी तसे प्रयत्न केले नसल्याने एकेक जण त्यांना सोडून जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्येक निवडणुकीत राज्यभर फिरत असताना उद्धव ठाकरे कुठेच गेले नाही, असेही निरुपम म्हणाले.
नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावरून वाद
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धर्मनिरपेक्षतेवरील वक्तव्यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटले. सेक्युलर म्हणजे सर्वधर्म समभाव असे म्हणत व्यक्ती पूर्णपणे धर्मनिरपेक्ष राहू शकत नाही, असे विधान गडकरी यांनी केले. त्यांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या अंत्यविधींचा दाखला देत धार्मिक विधीला ब्राह्मणांना बोलवण्यात आले होते, असे सांगितले. त्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी व्यक्तीला कोणत्या धर्मात जगायचे हा त्याचा अधिकार आहे, असे सांगत त्यांनी गडकरी धर्मनिरपेक्षतेचा चुकीचा अर्थ लावत असल्याचा आरोप केला. पटोले यांनी संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्या जीवनातील संघर्षांचा उल्लेख करत तत्कालीन सामाजिक व्यवस्थेवर टीका केली. त्या काळात ब्राह्मण व्यवस्थेमुळे संतांना छळ सहन करावा लागला, असे ते म्हणाले. ही व्यवस्था आजही पूर्णतः संपलेली नसल्याचा दावा करत त्यांनी गडकरींनी पुढाकार घेऊन सामाजिक विषमता दूर करण्यासाठी भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. या विधानामुळे धार्मिक आणि सामाजिक इतिहासावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
आणखी वाचा : राघव चड्ढा यांच्या खासदारकीचे काय? जाणार की राहणार? नियम काय सांगतो?
भाजपा-शिंदेंच्या नगरसेवकांमध्ये टोकाचे वाद
आमच्या कोणतेही भांडण नसून सर्व मतभेद दूर झाले आहे, असे स्पष्ट करत शहराचा विकास एकत्र साधण्याची ग्वाही भाजपाचे नेते रावसाहेब दानवे व शिंदेसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी नुकतीच दिली. त्यांनी मैत्रीचा दाखला देऊन चोवीस तास उलटत नाही तोच जालना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिंदे गटाचे नगरसेवक कमलेश खरे आणि भाजपाचे अक्षय गोरंट्याल यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. दोघेही आपापल्या जागेवरून एकमेकांकडे हात करून तावातावाने बोलत होते. यादरम्यान वाद चिघळणार हे लक्षात येताच इतर नगरसेवकांनी धाव घेत दोघांनाही शांत केले. दोन्ही पक्षाचे नगरसेवक एकमेकांकडे धावून आल्याने सभागृहातील वातावरण तापले होते. या वादाची संपूर्ण शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंची काँग्रेसवर टीका
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अर्ज दाखल करणार असून त्यासाठी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी बारामतीकडे कूच केली आहे. या नेत्यांमध्ये भाजपाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचाही सहभाग आहे. त्यापूर्वी पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेसने संस्कृती आणि संस्कार दाखवून निवडणुकीत उमेदवार देऊ नये अशी भूमिका मांडली. अजित पवार यांचे सर्व पक्षांबरोबर चांगली राजकीय संबंध होते. त्यामुळे बहुतांश पक्षांनी निवडणुकीत उमेदवार न देता सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेसने बारामतीत आपला उमेदवार देऊ नये. निवडणूक लढवल्यास त्यांना तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.
हेही वाचा : शिंदे गटात लवकरच मोठी फूट? बुवाबाजीत ३९ आमदार अडकल्याचा आरोप; काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…
पटोले यांची ठाकरे सेनेवर अप्रत्यक्ष टीका
काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्यास सर्व सत्य समोर आणून पर्दाफाश करेन, असा अप्रत्यक्ष इशारा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी दिला. शिवसेनेच्या ठाकरे या मुखपत्रातून होणाऱ्या टीकेवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, मला यावर भाष्य करायचे नव्हते; पण वारंवार काँग्रेसची बदनामी केली जात आहे. महाविकास आघाडीच्या काळात काँग्रेसचा अध्यक्ष कुणाच्या दबावाखाली होऊ दिला नाही, याचे उत्तर त्यांनी द्यावे. आम्ही सहकाऱ्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो; पण आता पाणी डोक्यावरून जात आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींची परवानगी घेऊन मी त्या सर्व घडामोडींचा पर्दाफाश करेन. माझ्यावर ती वेळ येऊ देऊ नका, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात आगामी काळात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळेल, असे सूचक विधानही त्यांनी केले आहे.
