Uddhav Thackeray Stand on Hindutva : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये भाजपाशी फारकत घेतली, तेव्हापासून त्यांचे राजकारण हिंदुत्वापासून दुरावल्याचे दिसत होते. पण, रविवारी हे चित्र बदलल्याचे दिसून आले. यामुळे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आणला आहे, असे मानले जाते.
रविवारी दादरच्या हनुमान मंदिराबाहेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने राम रक्षा स्तोत्राचे पठण केले. यावेळी ठाकरेंनी राम जन्मभूमी आंदोलनाची आठवण करून दिली, तसेच या आंदोलनातील बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. या आंदोलनातून अयोध्येतील राम मंदिराची देणगी हाताळणाऱ्यांनी भक्तांचा विश्वासघात केला, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आहे.
आंदोलनातून राजकीय संदेश?
राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे या आंदोलनाची ठिणगी पडली आहे. पण, हे आंदोलन गैरव्यवहारांच्या मुद्द्यापुरता मर्यादित नसून, त्यामागे व्यापक राजकीय संदेश असल्याचे मानले जात आहे.
पक्षातील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकीय लढाईचा केंद्रबिंदू बदलण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभेतील सहा खासदार आणि आमदार सचिन अहिर यांनी पक्षांतर केल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला, त्यामुळे त्यांनी पक्षांतराऐवजी ‘हिंदुत्व’ आणि विचारसरणीचा मुद्दा पुढे केला आहे आणि ‘राम रक्षा आंदोलना’वर लक्ष केंद्रित केले आहे.
खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघांत दौरा केला. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. या घडामोडीनंतर राज्यभर राबविण्यात आलेले ‘राम रक्षा आंदोलन’ हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पहिले मोठे राजकीय अभियान ठरले आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला नवी उभारी देण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसते.
दादरमधील हनुमान मंदिरात महाआरती, रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसा आणि मारुती स्तोत्राचे पठण करण्यात आले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांसमोर भाषण केले. पक्षांतरांच्या मुद्द्यावर भाष्य करण्याऐवजी त्यांनी अयोध्या आणि राम जन्मभूमी आंदोलनाच्या मुद्द्यांवर अधिक भर दिला. यावेळी ते म्हणाले, ‘आम्ही हिंदू भोळे आहोत, पण मूर्ख नाही. आमच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत मंदिराची लूट करणाऱ्यांना हिंदू आता माफ करणार नाही.’
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘शिवसैनिकांनी शिलापूजन, रथयात्रा आणि कारसेवेत सक्रिय सहभाग घेतला होता. या आंदोलनात अनेक शिवसैनिकांनी रक्त सांडले आणि बलिदान दिले.’ तसेच, ‘१२ वर्षांपूर्वी आम्हाला वाटले होते की, ‘आता हिंदू मरणार नाही, पण आज हिंदूंच्याच श्रद्धेची लूट होत आहे,’ असे ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.
‘आम्ही भक्तांच्या देणग्या हाताळणाऱ्यांना प्रश्न विचारत आहोत, प्रभू रामांना नाही,’ अशा शब्दांत ठाकरेंनी मंदिर ट्रस्टला सुनावले आहे. तर यावेळी उद्धव ठाकरे यांनी ‘जपावं हृदयात राम, मुखात जय श्रीराम’ असे नवे घोषवाक्यदेखील जाहीर केले आहे.
ठाकरेंची रणनिती काय?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, ‘राम रक्षा आंदोलन’ हे पक्षाचे राजकीय आंदोलन नाही. हिंदुत्वाच्या मूळ विचारसरणीची आठवण करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे नेते नमूद करतात. पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, ‘आमचे राजकारण बदलण्याचा प्रयत्न नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही हिंदुत्वाचा वापर केवळ निवडणुकीचा मुद्दा म्हणून केला नाही. हिंदुत्व ही शिवसेनेची विचारसरणी होती. राम जन्मभूमी आंदोलनात शिवसेनेने बजावलेल्या भूमिकेची जनतेला आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.’
दुसऱ्या एका नेत्याने सांगितले की, ‘पक्षाने जाणीवपूर्वक मंदिराऐवजी भक्तांच्या श्रद्धेच्या मुद्द्यावर भर दिला आहे. मुद्दा रामाचा नाही भक्तांच्या श्रद्धेचा विश्वासघात झाला आहे का, त्याचा आहे.’
राम जन्मभूमी आंदोलन आणि शिवसेनेचा संबंध
राम जन्मभूमी आंदोलन हा शिवसेनेच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. १९६६ मध्ये मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेनेची स्थापना झाली. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने राजकारणाचा विस्तार केला, यावेळी हिंदुत्व केंद्रस्थानी ठेवले. ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ ही घोषणा त्याच काळात प्रसिद्ध झाली.
राम जन्मभूमी आंदोलनामुळे शिवसेनेचा प्रभाव मुंबईबाहेर वाढला आणि भाजपा-शिवसेना युती महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय शक्ती म्हणून उदयास आली. १९९५ मध्ये या युतीने प्रथमच राज्यात सत्ता स्थापन केली. या आंदोलनामुळे बाळासाहेब ठाकरे यांची ‘हिंदूहृदयसम्राट’ ही प्रतिमाही अधिक दृढ झाली.
पक्षफुटीनंतर आंदोलनाची आठवण ताजी झाली?
२०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर राम जन्मभूमी आंदोलनाच्या इतिहासावर पुन्हा राजकीय चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडे पक्षाचे अधिकृत नाव, ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह आणि बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दावा आहे की, बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय आणि वैचारिक वारसा उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. पक्षातील सूत्रांच्या मते, पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गमावल्यानंतर आता खरी लढाई बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय वारशावर दावा सांगण्याची आहे.’
पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, ‘संघटना, आमदार आणि निवडणूक चिन्ह शिंदे गटाकडे गेले असले तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय वारशाचा खरा वारसदार कोण हा प्रश्न अद्याप कायम आहे, त्यामुळे ‘राम रक्षा आंदोलन’ हे केवळ अयोध्येच्या मुद्द्यावर नाही, तर त्या राजकीय वारशावर दावा मजबूत करण्याचाही ठाकरेंचा प्रयत्न आहे.’
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दृष्टीने राम मंदिरातील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा हा भाजपाला घेरण्याची संधी म्हणून पाहिला जात आहे. भाजपाने मात्र या आंदोलनाकडे वेगळ्या नजरेने पाहिले आहे. २०१९ मध्ये भाजपाशी फारकत घेतल्यानंतर गमावलेला हिंदुत्वाचा अजेंडा पुन्हा आपल्या बाजूने वळवण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे, असा भाजपाचा दावा आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरमधील सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर सध्या दुहेरी आव्हान आहे. एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा खरा वारसा उद्धव ठाकरे यांच्याकडेच असल्याचा विश्वास हिंदुत्ववादी मतदारांमध्ये निर्माण करायचा आहे; तर दुसरीकडे हिंदुत्वाचे राजकारणामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष अस्वस्थ होणार नाहीत याचीही काळजी पक्षाला घ्यावी लागणार आहे.
