नाशिक – सुमारे ३० वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आणि पक्ष दुभंगल्यानंतरही उध्दव ठाकरे यांच्याशी निष्ठावान राहिलेले माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महानगरप्रमुख म्हणून जीवतोड मेहनत करुनही पक्षाकडून कामगिरीची दखल घेतली न गेल्याची खंत व्यक्त करुन विलास शिंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी आधीच नाशिकमध्ये शिंदे गटात स्थानिक नेत्यांची भलीमोठी फौज असताना त्यात अजून एकाची भर इतकेच सध्यातरी म्हणता येईल.
ठाकरे गटातून स्थानिक पातळीवर एकेक पदाधिकारी, माजी नगरसेवक यांना पध्दतशीरपणे गळाला लावण्याचे काम शिंदे गटाकडून केले जात आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक जसजशी जवळ येईल, त्याप्रमाणे ही प्रक्रिया अधिक वेगवान होत जाईल. ठाकरे गटाकडून महानगरप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळलेले विलास शिंदे हे जिल्हाप्रमुख म्हणून पदोन्नती न मिळाल्याने गप्प होते. शिंदे यांच्यापेक्षा कमी अनुभव असलेल्या डी. जी. सूर्यवंशी यांच्यावर जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आल्यावर जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करणे शिंदे यांनी टाळले होते.
परंतु, सुधाकर बडगुजर यांनी भाजप प्रवेशाआधी विलास शिंदे यांच्यासह अनेक माजी नगरसेवक नाराज असल्याचे जाहीर केल्यापासून बडगुजर यांच्याप्रमाणेच शिंदे हेही ठाकरे गटातून बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळाले होते. अशा नाराजवंतांना आपल्या बाजूने कसे वळवायचे, याविषयी शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी आता चांगलेच पटाईत झाले आहेत. त्यामुळे पडद्यामागे घडामोडी होत राहिल्या. बडगुजर यांची हकालपट्टी झाल्यानंतर दत्ता गायकवाड यांच्यासारख्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यास उपनेतेपदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांच्यासमवेत जी मंडळी मातोश्रीवर गेली, त्यात शिंदे हे नव्हते.
विलास शिंदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावून शिंदे हे शिंदेंकडेच जाणार, असे विधान केले होते. त्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदे यांचे नाशिकमध्ये आगमन झाल्यावर विलास शिंदे यांनी खास त्यांच्या स्वागतासाठी जाणे, तेव्हांच खरे तर त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानंतर खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन आपण ठाकरे गटातच राहणार असल्याचे सांगणे वगैरे वगैरे, बाहेर पडणाऱ्या इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्गाने जाण्यासारखेच होते.
आणि झालेही तसेच. गुरुवारी स्वत:च्या वाढदिवसानिमित्ताने शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मिसळ पार्टी दिली. यावेळी प्रथमच त्यांनी उघडपणे मनातील सल व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न देणे, जिल्हाप्रमुखपदी डावलणे, संजय राऊत यांच्यासमोर हे सर्व मांडूनही पुढे कोणतीच कार्यवाही न होणे, असे मुद्दे त्यांनी मांडले. या पार्टीनंतर शिंदे हे आता पक्षात राहत नाही, हे लक्षात आल्यावर बडगुजर यांच्याप्रमाणे त्यांची ठाकरे गटाने महानगरप्रमुख पदावरुन हकालपट्टी केली. त्यामुळे शिंदे यांच्यापुढील मार्ग मोकळा झाला.
शिंदे गटात प्रवेशासाठी ठाण्याकडे जाताना त्यांनी एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटात शोभावे, याप्रमाणे गाड्यांचा ताफा नेत शक्तीप्रदर्शन केले. शिंदे गटात रितसर प्रवेश करणारे विलास शिंदे यांची त्या गटातही पदोन्नतीसाठी वाट सोपी नसणार. आधीच त्या पक्षात एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गेलेले निष्ठावान आणि त्यानंतर प्रवेश केलेले, यांच्यातील गटबाजीच्या कक्षा रुंदावत आहेत.
विलास शिंदे यांच्यापेक्षा कितीतरी अनुभवी मंडळींची फौज शिंदे गटात आधीच वेगवेगळ्या पदांच्या प्रतिक्षेत आहेत. असे असताना विलास शिंदे यांची पक्षात येताच कोणत्या पदावर स्थापना होईल, हे बघणे महत्वाचे ठरेल. कारण, आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला यश मिळाले तर निर्माण होणाऱ्या पदांवर सर्वांचा डोळा आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाला आता एखादा पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी पक्ष सोडण्याची सवय झाली आहे. त्यामुळे हादरा, धक्का, खिंडार असे शब्द त्यांच्यासाठी किरकोळच झाले आहेत.