माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील सहा खासदार फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या खासदारांनी संसदेत आपला वेगळा गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्याचे सांगितले जात आहे. खासदारांचा गट फोडण्यासाठी आखलेले ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याचा दावा शिंदेसेनेतील काही नेत्यांकडून केला जात आहे. गुरुवारी दिल्लीत झालेल्या ठाकरे गटाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत नऊ पैकी केवळ तीनच खासदार उपस्थित होते. त्यामुळे पक्षफुटीच्या संकटकाळातही ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या या तीन खासदारांवर सर्वांचेच लक्ष केंद्रित झाले, त्याविषयी…

ठाकरे गटातील तब्बल सहा खासदारांनी बंड पुकारत संसदेत आपला वेगळा गट स्थापन केल्याचे समजते. या फुटीर खासदारांमध्ये धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर, वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. यादरम्यान बंडखोर गटाकडून नाशिक खासदार राजाभाऊ वाजे यांनाही आपल्या गोटात सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. गुरुवारी मात्र राजाभाऊ यांनी ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीला उपस्थिती लावली होती. त्या बैठकीत खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि संजय राऊत हेदेखील उपस्थित होते.

कोण आहेत खासदार राजाभाऊ वाजे?

नाशिक लोकसभा मतदारसंघातून प्रथमच निवडून आलेले खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट केले आहे. ५९ वर्षीय राजाभाऊ वाजे यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द शिवसेनेतच घडली आहे. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि १४ खासदारांना घेऊन एकसंध शिवसेनेतून बंड केल्यानंतरही वाजे यांनी ठाकरेंची साथ सोडली नाही. सध्या ठाकरे गटात फुटीची चर्चा सुरू असतानाच वाजे यांनी मात्र गुरुवारी पक्षाच्या संसदीय बैठकीला हजेरी लावून आपली निष्ठा दाखवून दिली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे घराण्याशी असलेल्या आपल्या निष्ठेचा त्यांनी पुनरुच्चार केला. “ज्या दिवशी मी पक्ष सोडेन, त्या दिवशी राजकारणही सोडून देईन,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. राजाभाऊ वाजे हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे रहिवासी असून त्यांचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक राजकारणात सक्रिय आहे. २०१४ मध्ये त्यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून आपल्या राजकीय कारकीर्दीची यशस्वी सुरुवात केली होती, मात्र पाच वर्षांनंतर २०१९ मध्ये त्यांना या जागेवर पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी नाशिक मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत राजाभाऊ यांनी शिंदेसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला होता.

Anil Desai
ठाकरे गटाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे

अरविंद सावंत ठाकरेंचे विश्वासू सहकारी

मुंबई दक्षिण मतदारसंघातून सलग तीन वेळा खासदार झालेले ७२ वर्षीय अरविंद सावंत हे शिवसेना ठाकरे गटातील अत्यंत ज्येष्ठ नेत्यांपैकी एक मानले जातात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून ते पक्षाशी कायमच एकनिष्ठ राहिलेले आहेत. गेल्या अनेक वर्षांत शिवसेनेच्या विविध कामगार संघटना आणि स्थानिक लोकाधिकार समितीमध्ये सावंत यांनी अत्यंत सक्रिय भूमिका बजावली आहे. लोकसभेत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी विधान परिषदेचे आमदार म्हणूनही काम पाहिले होते. सक्रिय राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी अरविंद सावंत हे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड’ (MTNL) मध्ये कार्यरत होते. १९६७ मध्ये बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१४ मध्ये एकसंध शिवसेनेने अरविंद सावंत यांना मुंबई दक्षिण मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली. उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत त्यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी देवरा यांना याच मतदारसंघातून दुसऱ्यांदा पराभूत केले.

Arvind Sawant
ठाकरेंचे निष्ठावंत खासदार अरविंद सावंत

ठाकरेंच्या शब्दावर मंत्रिपदाचा राजीनामा

२०१९ मध्ये एकसंध शिवसेनेने भाजपाशी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. त्यापूर्वी सावंत हे केंद्रातील मोदी सरकारमध्ये मंत्री होते, पण उद्धव ठाकरे यांनी आदेश देताच त्यांनी पक्षासाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही ठाकरे गटाने अरविंद सावंत यांना पुन्हा मुंबई दक्षिणमधून रिंगणात उतरवले. या निवडणुकीत त्यांनी शिंदेसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांचा दारुण पराभव केला होता. सध्या अरविंद सावंत हे लोकसभेतील ठाकरे गटाच्या संसदीय पक्षाचे नेते आहेत. पक्षातील संभाव्य फुटीच्या चर्चांदरम्यान त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. कोणत्याही खासदाराने पक्ष सोडण्याचा निर्णय अधिकृतपणे कळवलेला नाही, असे त्यांनी या पत्रात नमूद केले. तसेच, पक्षांतर किंवा विलीनीकरणासंदर्भात संविधानातील तरतुदींनुसारच कारवाई व्हायला हवी, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये सावंत हे ठाकरेंची निष्ठा बाळगून आपल्या पक्षाची भूमिका मांडली आहेत.

अनिल देसाई ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनिल देसाई हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महत्त्वाचे रणनीतीकार आणि कायदेशीर बाबींमध्ये पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडणारे नेते म्हणून ओळखले जातात. ६९ वर्षीय देसाई यांनी शिवसेनेत अनेक वर्षे संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. लोकसभेत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी सलग दोन वेळा राज्यसभा खासदार म्हणूनही काम पाहिले आहे. सक्रिय राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ते न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीमध्ये कार्यरत होते. तसेच, त्यांचा स्थानिक लोकाधिकार समितीशीही जवळचा संबंध होता. शिवसेनेतील सुरुवातीच्या काळात देसाई यांनी सेना भवनात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही केले. त्यामुळे संघटनात्मक कामाबरोबरच कार्यकर्त्यांमध्ये त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. २०२२ मध्ये एकसंध शिवसेनेत फूट पडल्यानंतर देसाई यांनी अनेक महत्त्वाच्या कायदेशीर लढायांमध्ये पक्षाला साथ दिली.

बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक अनिल देसाई

अनेकांकडून देसाई यांच्या निष्ठेचे कौतुक

बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणे, तसेच पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह यावरील वाद अशा अनेक मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोर त्यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबई दक्षिण मतदारसंघासाठी देसाई नावाची चर्चा होती. मात्र, अखेर पक्षाने त्यांना मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांनी शिंदेसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. सध्या सुरू असलेल्या पक्षफुटीच्या चर्चांदरम्यान अनिल देसाई यांनी अरविंद सावंत यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना जर सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या याचिकेवर आधीच निर्णय दिला असता, तर आज कदाचित ही परिस्थिती निर्माण झाली नसती, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ठाकरे गटातील राजकीय आणि कायदेशीर आव्हानांच्या काळात देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना भक्कमपणे साथ दिली. आजही ते पक्षाची बाजू ठामपणे मांडताना दिसून येत आहे. अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे यांच्या निष्ठेचे आज संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे.