छत्रपती संभाजीनगर : फुटीर खासदारांच्या मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या संभामध्ये भाषण करण्यास दोन महिला आणि ऐकण्यास वीस जणी असे चित्र दिसून आले. विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी ‘ महिला मतपेढी ’तून मात केल्यानंतरही त्याकडे विरोधी पक्ष म्हणून अजूनही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत शिवसैनिक पाठिशी ठेवायचा कसा, असे ठाकरे गटासमोर आव्हान बनले आहे. फुटीर खासदारांच्या मतदारसंघातील दौरे हे शिवसैनिक पाठिशी ठेवण्याची कसरत मानली जात आहे.

आहे ते ‘ सैनिक ’ आपल्या बाजूने रहावे म्हणून आखलेल्या या दौऱ्यात परभणी आणि धाराशिव या दोन्ही मतदारसंघात ठाकरेंची भाषणे ऐकण्यासाठी गर्दी होती. हे दोन्ही जिल्हे अनेक वर्षापासून ‘ठाकरे ब्रॅन्ड’च्या पाठिशी उभे राहणारे आहेत. परभणीमध्ये खासदाराची फूट ‘ नेहमी’ ची असली तरी यंदाची स्थिती निराळी आहे. धाराशिवमध्ये मात्र अशी खासदाराची पहिलीच फूट होती. या पार्श्वभूमीवर पुढील निवडणुकांपर्यत शिवसैनिक व पदाधिकारी टिकवून ठेवणे हे शिवसेनेच्या ठाकरे गटासमोर अव्हान असणार आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटात मराठवाड्यात मोठी फूट पडली. हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे संजय जाधव आणि धाराशिवचे ओम राजेनिंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. त्यानंतर ‘ तुडवा ’ असे आदेश देण्यात आले. मात्र, धाराशिव आणि परभणीमध्ये खासदारांच्या भोवताली कार्यकर्त्यांचा गराडा कायम होता. सभेच्या दिवशी धाराशिव शहरात आवर्जून आलेले ओम राजेनिंबाळकर म्हणाले, ‘ मला नेहमी बेरीज करावी लागणार आहे. आम्ही नेहमी पैशात कमी पडायचो. आता सत्ता सर्वसामांन्य माणसाच्या कल्याणासाठी वापरता येईल. ’

सत्तेमध्ये राहून विरोधी पक्षाची भूमिका

धाराशिवमधील राजकारण हे भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या भोवती केंद्रीत हाेते. आजही ते आहे. या सत्ताकेंद्रात आता खासदार ओम राजेनिंबाळकर यांचा प्रवेश झाला आहे. ते जरी सत्तेत गेले तरी स्थानिक पातळीवर ओम राजेनिंबाळकर हे राणा जगजीतसिंह पाटील यांच्या निर्णयाला विरोध करतील. याला पाठिंबा देणारी यंत्रणाही आता धाराशिव जिल्ह्यात तयार होत आहे. ओम राजेनिंबाळकर, तानाजी सावंत यांच्याबरोबर पालकमंत्री प्रताप सरनाईक असल्यामुळे जिल्हा पातळीवरील अनेक निर्णय शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बाजूने होऊ शकतील. याला ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील, प्रवीण स्वामी सोयीनुसार विरोध किंवा समर्थन करतील. भाजपच्या राणाजगजीतसिंह पाटील यांच्या विरोधातील राजकीय पट अधिक मजबूत होताना दिसत आहे. त्यामुळे सत्तेत राहून विरोधी पक्षात अशी शिवसेनेची स्थिती असेल. या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते टिकवण्याची स्वतंत्र यंत्रणा उभी करणे ठाकरे गटासमोरील आव्हान असणार आहे. अशीच स्थिती आता परभणी आणि हिंगोलीमध्ये असेल. फुटलेल्या मराठवाड्यातील तिन्ही जिल्ह्यात सत्ता वर्चस्वाच्या लढ्यात शिवसेना ‘ विरोधी ’ पक्षात असे चित्र दिसून येईल असे मानले जात आहे.

कार्यकर्ते टिकवणे आव्हान कसे ?

एकनाथ शिंदे यांनी पहिल्यावेळी आमदारांचा गट फाेडला होता तेव्हाही उद्धव ठाकरे यांनी बंडखोराच्या मतदारसंघात दौरे केले होते. त्या वेळी वापरण्यात आलेले ‘ गद्दार – खुद्दार ’ शब्द या वेळी भाषणांमध्ये सर्रास वापरण्यात आले. मात्र, शिवसेनेचा ठाकरे गट सोडणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळाले. शिवसेनेच्या शिंदे गटात तेव्हा गेलेल्यांपैकी उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांचा पराभव वगळता बहुतेकजण विजयी झाले. यानंतर मराठवाड्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटात जिल्हा पातळीवर सतत फूट पडत राहिली. अगदी जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत ती कायम होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तर कार्यकर्ते टिकवून ठेवणे आव्हान बनले होते. अन्य जिल्ह्यातही पक्षांतर कायम सुरू आहेत. त्यामुळे बंडखोरांच्या मतदारसंघात कार्यकर्ते टिकवून ठेवणे हे शिवसेनेच्या ठाकरे गटासमोर मोठे आव्हान असणार आहे.