पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षातील लोकसभेच्या २० खासदारांनी भाजपाप्रणित एनडीएला समर्थन देण्याची तयारी दर्शवली आहे. तृणमूल काँग्रेसच्या पराभवानंतर ममता बॅनर्जींच्या पक्षात मोठी फूट पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची आज (रविवार, १४ जून) बैठक बोलावली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांमध्ये नाराजी असून ते बंड करण्याच्या तयारीत आहेत, असा आरोप राज्याच्या राजकीय वर्तुळात मागील काही महिन्यांपासून सातत्याने होत आहे.
“अमित शाहांनी १०० वेळा ऑपरेशन केलं” – संजय राऊत
‘ऑपरेशन टायगर’बाबत शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, “उद्या शिवसेनेच्या खासदारांची बैठक मातोश्रीवर आहे. अशी बैठक म्हणजे कोणत्याही पक्षात सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे. अशा बैठका मातोश्रीवर सातत्याने होत असतात. पुढच्या महिन्यात लोकसभेचे अधिवेशन होणार आहे. त्यामुळे उद्या सगळ्या नऊ खासदारांना बोलावून उद्धव ठाकरे त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. ‘ऑपरेशन टायगर’ करणार असं जे म्हणतात त्यांचं ऑपरेशन अमित शाह यांनी शंभरवेळा केलं आहे. माणसं फोडणं ही एक प्रकारची विकृती आहे. जेव्हा पासून या देशात मोदी-शाहांचं राज्य आलंय तेव्हापासून या विकृतीने कळस गाठला आहे. महाराष्ट्रासारखं राज्यसुद्धा त्यांनी नासवलं आहे. योग्यवेळी राज्यात आणि देशात या विकृतीविरोधात जनता बंड करून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.”
‘ऑपरेशन टायगर’बाबत चर्चा का आहे?
ठाकरेंचे खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याची व काही दिवसांत ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. मागील काही महिन्यांत ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदारांनी एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. मागील काही महिन्यांत संजय दीना पाटील हे शिंदे यांच्यासोबत एकाच कारने प्रवास करताना आढळून आले होते. खासदार राजाभाऊ वाजे हे तर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत एका मंचावर दिसले होते. तर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
नागेश पाटील आष्टीकर काय म्हणाले होते?
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर म्हणाले होते, मी एकट्याने भेट घेतली की खासदारांचे पक्षांतर होणार आहे का? मी निवडून आल्यानंतर दुसऱ्या महिन्यापासून ऑपरेशन टायगर सुरू आहे. त्यामुळे त्याचे नाव बदलून स्लो ऑपरेशन ठेवा. जे लोक ऑपरेशन टायगर म्हणतात, त्यांनाच हे कधी संपणार ते विचारा. मी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. रोजच्या रोज दैनंदिन जीवनात लोकांच्या अडचणी असतात, त्यासाठी भेटी घ्याव्या लागतात. मी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तेव्हा आमचे नेते उद्धव ठाकरे हे कधीच काहीही बोलले नाहीत, असेही स्पष्टीकरण नागेश पाटील आष्टीकर यांनी दिले.
खासदार ओमराजे निंबाळकर व खासदार संजय जाधव शिवसेनेच्या वाटेवर?
शिवसेनेचे नेते व राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या राजकीय हालचालींबाबत बोलताना ‘आगे आगे देखो होता है क्या ’ असे हिंदीमध्ये म्हणत ‘ऑपरेशन टायगर’ च्या चर्चेस ९ एप्रिल रोजी गती दिली होती. धाराशिव जिल्ह्यात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले , “शिवसेनेमध्ये येणाऱ्यांचे ‘इनकमिंग’ मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सध्या कोणतीही निवडणूक नसली तरी, सामान्य कार्यकर्त्यांपासून ते आमदार, खासदार आणि माजी मंत्र्यांपर्यंत अनेकांचा ओढा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाकडे आहे.”
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशाबाबत विचारले असता, आबिटकर यांनी थेट नाव घेणे टाळले होते. मुख्यमंत्री शिंदेंच्या कामावर विश्वास ठेवून अनेक लोक सोबतीला येत आहेत आणि ही प्रक्रिया अशीच सुरू राहील, असे म्हणत त्यांनी ओम राजेनिंबाळकर यांच्या पक्ष बदला विषयी संशय वाढवला होता. या अनुषंगाने निंबाळकर यांच्या समर्थकांनी हे दावे खोडून काढले होते. तर ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. “काळाचे भान ठेवून निर्णय घ्यावे लागतील”, असे परभणीचे खासदार जाधव एका मुस्लिम कार्यकर्त्याशी संवाद साधतानाची ध्वनीफित समाजमाध्यमांमध्ये प्रसारित झाली होती. यामुळे संजय जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू होती.
