आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवले जात असल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला… उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे तडकाफडकी राजीनामे दिले… विधानपरिषद उपसभापतीपदासाठी विरोधकांच्या महाविकास आघाडीने आपल्या अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा केली… भाजपाचे फोडाफोडी आणि गद्दारीचे राजकारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य आहे का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

ठाकरेंचा विश्वासू आमदार शिंदे गटात

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी आज विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिंदेसेनेकडून अर्ज दाखल केला. लवकरच ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण- आठवडाभरापूर्वीच ठाकरे सेनेच्या ६ खासदारांनी शिंदेंसेनेत प्रवेश केला होता. दरम्यान, सचिन अहिर यांनी शिंदेसेनेशी केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत जाहीर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. दुसरीकडे- सचिन अहिर यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू, असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे या घडामोडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्यासाठीच शिंदेसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवले जात असल्याचा दावा ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिंदेसेनेकडून अर्ज भरल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सचिन अहिर यांच्यावर टीकेचा भडिमार केला. तसेच एखादी मराठी व्यक्ती पंतप्रधान बनत असेल तर त्यांचे पंख छाटण्याचे काम सुरू आहे. २०२९ मध्ये भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचेही नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत आहे. त्यामुळे सध्या हे ऑपरेशन सुरू आहे. फडणवीस यांचा मुख्यमंत्रि‍पदाचा अखेरचा कार्यकाळ असू शकतो. यानंतर कदाचित त्यांना केंद्रीय मंत्रि‍पदावर घेतले जाऊ शकते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

ठाकरे गटात सामूहिक राजीनामे

ठाकरे गटातून सहा खासदार फुटल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डीमध्ये खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याविरोधात शिवसैनिकांचा मेळावा घेतला. मात्र, या मेळाव्यानंतर ठाकरे यांनाच धक्का बसला असून पक्षाचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे कट्टर शिवसैनिक समजले जातात. ठाकरे गटाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वाकचौरे यांच्या विजयाला त्यांचा हातभार लागलेला आहे. गेली १८ वर्षे ते जिल्हाप्रमुख (उत्तर विभाग) जबाबदारी सांभाळत होते. तत्पूर्वी १० वर्षे तालुकाप्रमुख होते. नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली. ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील होते. दरम्यान ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर खेवरे हे शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच शिर्डीच्या दौऱ्यावर येत असून त्यावेळी हा पक्षप्रवेश होईल, असे खेवरे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.

उपसभापतीपदासाठी मविआचा उमेदवार ठरला

विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी १ जुलै (बुधवारी) रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात आहे. मात्र, संख्याबळ कमी असल्याची जाणीव असूनही विरोधकांच्या महाविकास आघाडीने आपला उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार आणि शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक जग्गनाथ मोतीराम अभ्यंकर (जमू अभ्यंकर) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ही घोषणा करत त्यांच्या उमेदवारीचा अर्ज आज दाखल केला जाणार असल्याची माहिती दिली आहे. निवडणूक लढवणे ही लोकशाहीची गरज असल्यामुळे उमेदवार उभा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरेंचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रश्न

भाजपाचे फोडाफोडी आणि गद्दारीचे राजकारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य आहे का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.पूर्वी संघ ठरवेल तोच भाजपाचा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री व्हायचा. सध्या संघाची पकड भाजपावर राहिली की नाही हे कळत नाही. हे फोडाफोडीचे व गद्दारीचे राजकारण संघाला मान्य आहे का? हे त्यांनी एकदा जाहीर करावे, असेही ठाकरे म्हणाले. मी देवेंद्र फडणवीसांचा शत्रू नसून हितचिंतक असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. भाजपापेक्षा राज्यात शहासेनेची ताकद वाढली. त्यामध्ये मिंधे ‘गद्दार सुपारी किंग’ आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीचा पत्ता कापला जाणार आहे, असा दावा करताना मी कुणाचा वाईट चिंतणारा माणूस नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.