आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणावरून भाजपाला घेरण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आंदोलनाची घोषणा केली… ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधानपरिषदेत ‘शिंदे गट’ असा उल्लेख करताच नीलम गोऱ्हे यांनी संताप व्यक्त केला… श्रीराम जन्मभूमी मंदिरातील दानपेट्यांमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली… शरद पवार यांची राष्ट्रवादी हा पक्ष नसून टोळी आहे आणि त्यांच्यापासून सावध राहा, असा सल्ला सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला… ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला असून पक्षातील प्रभावशाली महिला नेत्याने शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
भाजपाला घेरण्याची ठाकरेंची रणनीती
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देगणीत अपहार झाल्याचे समोर येताच देशभरात संतापाची लाट उसळली. या मुद्द्यावरून भाजपाला घेरण्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट रामरक्षा आंदोलन करण्याची घोषणा मुंबईतील पत्रकार परिषदेतून केली. भाजपाच्या काळात थेट प्रभू श्रीरामाच्या मंदिरातच दरोडा टाकला जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. हिंदुत्वाचा बुरखा घालून राम मंदिर लुटणाऱ्यांचा पैसा इतर राजकीय पक्ष आणि आमदार-खासदार फोडण्यासाठी वापरला जात असल्याची टीकाही त्यांनी केली. राज्यातील रामभक्तांनी रविवारी ५ जुलै रोजी दादर येथील कबुतरखाना येथे असलेल्या मारुती मंदिराजवळ आंदोलनासाठी यावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. मुंबईतील मातोश्री निवासस्थानी झालेल्या या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचीही उपस्थिती होती.
शिंदे गट म्हणताच नीलम गोऱ्हे संतापल्या
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधानपरिषदेतील चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा शिंदे गट असा उल्लेख करताच पक्षाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आमच्या पक्षाला शिंदे गट नव्हे तर शिवसेना म्हणा, असे गोऱ्हे यांनी सभागृहात सांगितले. त्यावर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचे प्रकरण अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याची आठवण परब यांनी करून दिली. तरीदेखील नीलम गोऱ्हे काहीही ऐकण्यास तयार नसल्याने अखेर परब यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना असा उल्लेख करत या वादावर पडदा टाकला. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर एकसंध शिवसेनेत दोन गट पडले. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह शिंदे गटाला दिले. त्याविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावरील सुनावणी अद्याप प्रलंबित आहे.
आरएसएसकडून भाजपाची कानउघडणी
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगीत अपहार झाल्याचे उघडकीस येताच देशात संतापाची लाट उसळली. या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू असून आतापर्यंत काहीजणांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राम मंदिरातील या देणगी घोटाळ्याविरोधात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्यानंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही सत्ताधारी भाजपाची चांगलीच कानउघाडणी केली आहे. राम मंदिरातील देणगी चोरीची घटना दुर्दैवी आहे. यामुळे संपूर्ण हिंदू समाज आणि रामभक्तांच्या भावना आणि श्रद्धेला ठेच पोहोचली आहे, असे संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी म्हटले आहे. श्रीराम जन्मभूमीवर उभारलेले भव्य मंदिर पिढ्यानपिढ्यांचा संघर्ष आणि कोट्यवधी रामभक्तांचे बलिदान आणि त्यागामुळे संपूर्ण हिंदू समाजासाठी श्रद्धा, आस्था आणि भक्तीचे केंद्र बनले आहे. मंदिरातील दानपेटीत जमा झालेल्या रकमेच्या चोरीची घटना दुर्दैवी असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
सदाभाऊ खोत यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका
शरद पवार यांची राष्ट्रवादी हा पक्ष नसून टोळी आहे आणि त्यांच्यापासून सावध राहा, असा सल्ला विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला. विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना आमदार खोत यांनी सांगली जिल्हा बँकेतील भ्रष्टाचार आणि नोकरभरती घोटाळ्यावरही बोट ठेवले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही नेते महायुतीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न विचारला असता, “राष्ट्रवादी हा काही पक्ष नसून ती टोळी आहे. सध्या ही टोळी फुटायला लागली आहे. या टोळीला आता अलिबाबाची गुंफा मिळेल का यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या टोळीचे मार्गक्रमण कशापद्धतीने सुरू आहे हे थोड्याच दिवसांत लक्षात येईल. महायुतीच्या नेत्यांना माझे सांगणे आहे या टोळीपासून सावध राहा, याच टोळीच्या विरुद्ध महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का
सहा खासदार आणि विधानपरिषदेतील एक आमदार फुटल्यानंतर ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. धुळे जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या प्रभावशाली नेत्या शुभांगी पाटील आपल्या शेकडो समर्थकांसह लवकरच शिंदेसेनेत प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वी शुभांगी पाटील यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर आज त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शुभांची पाटील यांनी शिंदे गटातील प्रवेशाबाबत सावध प्रतिक्रिया दिली होती. प्रवेशाबाबत अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही, तो निर्णय झाल्यावर मी स्वतः सगळ्यांना सांगेन, असे त्या म्हणाल्या होत्या. त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर आणि अंतर्गत राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
