Uddhav Thackeray on Alliance with Raj Thackeray मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. मनसे आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) एकत्र आल्याने शिवसेना आणि भाजपासारख्या इतर प्रमुख पक्षांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा मुख्य नरेटीव्ह मराठी माणूस असणार आहे. याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी ‘साम टीव्ही’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. तसेच निवडणूक आयोगाची भूमिका, भविष्यात ठाकरे बंधू एकत्र राहतील का, शिवसेनेचा पुढचा चेहरा कोण असेल, अशा विविध ते मुद्द्यांवर बोलले आहेत. उद्धव ठाकरे नक्की काय म्हणाले? जाणून घेऊयात…

ठाकरे बंधूंचा मुख्य नरेटीव्ह मराठी माणूस

उद्धव ठाकरे म्हणाले, “मराठी माणसाचा माझ्याविषयी चुकीचा संभ्रम आहे, असे मला वाटत नाही. कारण- मी जिथे जातो तिथे तुफान गर्दी असते. हा संभ्रम जे निर्माण करतात त्यांना सर्कस बघायची असते. कारण त्यांच्यात स्वतः मैदानात उतरण्याची ताकद नाही.” उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबईने केलेली प्रगती आणि भाजपाच्या ताब्यात असलेल्या अहमदाबादबरोबर सर्व शहरांची प्रगती तराजूत तोलून बघा. शिक्षण क्षेत्रात महापालिका शाळांमध्ये विनामुल्य आठ ते नऊ भाषांमध्ये शिक्षण देणारी मुंबई ही एकमेव महापालिका आहे. शाळा गणवेश, एसडी कार्डमध्ये अभ्यासक्रम देणारी ही एकमेव महापालिका आहे,” असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी पुढे म्हटले, “मुंबईतला फिल्टरेशन प्लांट जगातल्या सर्वोत्तम फिल्टरेशन प्लांटपैकी एक आहे. आज उपनगरांपासून मुख्य शहरांपर्यंत सर्व रस्ते खोदलेले आहेत. याचा परिणाम आता मुंबईकरांच्या आरोग्यावर होत आहे. ही विनाशाची गती असल्याने यांची महायुती आहे, ” अशी टीका त्यांनी केली. “भाजपा म्हणजे जगातला सर्वात मोठा पक्ष आहे असे म्हटले जाते. पण मी म्हणेण हा पक्ष वांझोटा आहे. भाजपा म्हणजे नेते पळवणारी टोळी आहे,” अशीही टीका त्यांनी केली.

ते म्हणाले, “देशामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरचा एकही मराठी माणूस नाही, जो तेथील रहिवाश्यांवर दादागिरी करत असेल. बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या मनगटात आत्मविश्वासाची ताकद दिली. त्या ताकदीची जाणीव शिवसेना आहे आणि तीच जाणीव आम्ही परत करून देत आहोत. त्यामुळे हा शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही, ” असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूक आयोगावरही टीका

निवडणूक आयोगाने एक निकाल दिला, ज्यात असे सांगण्यात आले की निवडणूक आयोगाच्या गीतामध्ये ‘भगवा’ शब्दाचा वापर करता येणार नाही. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “हा आदेश देणाऱ्याला जोड्याने मारलं जावं. कारण त्यांनी माझ्या लोकसभा गीतामधूनही हिंदू हा तुझा धर्म काढायला लावले, जय भवानी जय शिवाजी काढायला सांगितले होते, पण मी काढले नाही आणि मी काढणार नाही. माझ्या कोरोनाकाळातील पुस्तकावरही बंदी आणली आहे, पण मी ती मानत नाही. निवडणूक आयोगाने त्यांच्या चौकटीत राहायला हवे. मोदी आणि शाह यांनी लोकसभेच्या वेळी अयोध्या आणि रामाच्या नावाने प्रचार केला, त्यावेळी त्यांना शिक्षा का झाली नाही,” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

राज ठाकरेंबरोबर युतीचं भवितव्य काय?

राज ठाकरे भविष्यात तुमच्या बरोबर राहतील की नाही, या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “या प्रश्नाला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. उद्या काय होईल, त्यापेक्षा आज काय होतंय हे बघणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा प्रश्न निरर्थक आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना ही पूर्णपणे संपेल आणि ठाकरेंचं अस्तित्व राहणार नाही, असे सत्ताधारी पक्षातील नेते बोलताना दिसत आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “अशा भविष्यवाण्या करणारे खूप आहेत. काहींनी असेही म्हटले की विलासराव देशमुख यांची आठवण लातूर मधून पुसून टाकणार. त्यांची काय कुवत आहे. मनरेगातून गांधीजींचे नाव काढले गेले, सरदार वल्लभाई पटेलांना चोरले, सुभाषचंद्र बोस यांना चोरायला निघाले.” ही सगळी चोर कंपनी असल्याची टीका ठाकरेंनी केली आहे. ते पुढे म्हणाले, ” दुर्दैवाने चोरांच्या हातात राज्य गेले आहे.”

शिवसेनेचा पुढचा चेहरा कोण?

भविष्यात शिवसेना पेलण्याची ताकद असणारे नेतृत्व कोण असेल, असा प्रश्न त्यांना करण्यात आला. ‘आता कशाला उद्याची बात, सरून चालली रात’ या गाण्याचा उल्लेख त्यांनी केला. “आता रात्र थोडी आणि सोंगं जास्त झाली आहेत. त्यामुळे त्या रात्रीचा विचार करावा लागेल. आता जे शत्रू आले आहेत, ते उद्या राहतील का? हा विचार करण्याऐवजी आता जे परिस्थिती समोर आहे त्याला तोंड देणे महत्त्वाचे आहे,” असे म्हणत त्यांनी उत्तर देणे टाळले.

उध्दव ठाकरे बिनविरोध निवडून आले आणि त्यांनी राजीनाम द्यावा ही मागणी सातत्याने होत आहे. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “देवेंद्र फडणवीससुद्धा वरून लादलेले मुख्यमंत्री आहेत.” ते पुढे म्हणाले, ” राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष आहेत. विधानसभा अध्यक्ष असा पक्षपाती व्यक्ती राहू शकत नाही. त्यांना बडतर्फ केले जावे, ” असेही ते म्हणाले. राहुल नार्वेकरांना पदच्युत केलं जावं, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणीही त्यांनी केली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी दाखल करतेवेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यात शा‍ब्दिक चकमक झाली होती.  काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि अपक्ष उमेदवारांसह विरोधी पक्षांनी निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप करीत राज्य निवडणूक आयोगाकडे नार्वेकरांविरुद्ध तक्रार दाखल केली.