छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील लोकसभेच्या आठ जागांपैकी तीन जागांवर उद्धव ठाकरे यांचे ‘निष्ठावान’ शिवसैनिक निवडून आले. ओम राजे निंबाळकर, संजय उर्फ बंडू जाधव, नागेश पाटील आष्टीकर यांना धाराशिव, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातून यश मिळाले. त्यामुळे ठाकरे गटाची मशाल मराठवाड्यात धगधगत राहिली. तर दुसरीकडे शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक संदीपान भुमरे यांना यश मिळाले. नेते महायुतीच्या बाजूला असताना शिवसैनिकांनी ठाकरेंच्या मागेच राहणे पसंत केले. त्याचे कारण प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची ताकद ज्यांच्यामध्ये असते त्यांच्या मागे मराठवाडा उभा ठाकताना दिसत आहे.

बलाढ्य प्रस्थापित शक्तीला आव्हान देणे म्हणजे शिवसेना. ही मराठवाड्यातील शिवसैनिकांची व्याख्या. पूर्वी ‘बलाढ शक्ती’ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती. त्यांच्यासमोर आव्हान उभे करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी पुढाकार घेतला. ‘जय भवानी जय शिवाजी’ असे म्हणत मराठवाडा त्यांच्या पाठिशी उभा राहिला. निजामी राजवटीमुळे भाजपच्या हिंदुत्वाला अधिक धार देत बाळासाहेबांनी मराठवाड्याची बांधणी केली. ‘शिवसेना’ अशी अक्षरे असणारा एक फलक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काढला. त्याचा कमालीचा राग तेव्हा शिवसैनिकांमध्ये होता. तावातावाने काही शिवसैनिक विश्रामगृहात बसलेल्या काँग्रेसच्या नेत्याकडे गेले आणि त्यांच्या तोंडावर थुंकले. फलक काढण्याच्या घटनेचा निषेध केला. बीड जिल्ह्यातील या आक्रमक शिवसैनिकास पुढे राज्यमंत्रीपद मिळाले. पण बीड जिल्ह्यात शिवसेना तशी वाढली नाही. पण सर्वसामान्य माणसाला नेता बनता येते ही जाणीव मराठवाड्यात निर्माण झाली ती शिवसेनेमुळे. धाराशिवच्या दयानंद कांबळे हे रॉकेल विक्रेते होते. बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी दिली. ते निवडून आले. कल्पना नरहिरे, चंद्रकांत खैरे असे मतदारसंघात जातीचे मतदार कमी असणारी मंडळी निवडून आली. तेव्हा शिवसेनेत कमालीची धग होती. ती धग आता भाजपासारख्या बड्या सत्ताधारी पक्षासमोरही वापरता येते हे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिल्याने मराठवाड्याने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना साथ दिल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – प्रियांकांसाठी राहुल गांधींनी वायनाड का सोडलं? काय आहे कारण?

शिवसेना ही अपघातानंतर मदत करणारी, रक्तदानात पुढाकार घेणारी, दंगलीच्या वेळी संरक्षणार्थ उभारणारी अशी प्रतिमा होती. त्यात बदल होऊ लागले. शिवसेना आता बड्या गाड्यामधून फिरणाऱ्या पुढाऱ्यांची, योजनांमध्ये कार्यकर्ते घुसवून टेंडरमध्ये लक्ष घालणारी असे बदलते रुपही सर्वसामान्य माणसांनी पाहिलेले. संस्थात्मक पातळीवर फारसे काही उभे न करू शकणाऱ्या शिवसेनेवरचे मराठवाड्याचे प्रेम कायम राहिले आहे.

हेही वाचा – नव्या लोकसभेचे नवे चेहेरे: नशीबवान; डॉ. शोभा बच्छाव ,धुळे, काँग्रेस

फूट झाल्यानंतर संदीपान भुमरे वगळता मराठवाड्यातील शिवसैनिकांनी सत्ताधाऱ्यांबरोबर हातमिळवणी करणाऱ्या धनुष्यबाणाची मात्र साथ सोडल्याचे दिसून येत आहे. खरे तर फुटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर बरेच नेते मंडळी आली. एकट्या संभाजीनगर जिल्ह्यातील संदीपान भुमरे, संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल, रमेश बोरनारे, अब्दुल सत्तार पाच आमदार गेले. उस्मानाबाद जिल्ह्यातून तानाजी सावंत, ज्ञानराज चौगुले, हिंगोलीमधून संतोष बांगर, नांदेडमधून बालाजी कल्याणकर असे आमदार गेले. मात्र, एवढे नेते असूनही लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फारसे यश मिळू शकले नाही. ‘व्यवस्थापान’ चांगले झाल्याने एक जागा निवडून आली. सारी मंडळी आता धनुष्यबाण पुढे नेण्यात यशस्वी ठरतील का, या प्रश्नाचे उत्तर विधानसभा निवडणुकीत मिळणार असल्याने सारी तयारी वर्धापन दिनाच्या निमित्ताने केली जाईल, असे सांगण्यात येत आहेत. मात्र, प्रस्थापितांविरोधाचा आवाज असणारी शिवसेना उद्धव ठाकरे यांची असा कौल मराठवाड्याने लोकसभा निवडणुकीतून दिला असल्याचे दिसून येत आहे.