आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात शिंदेसेनेला फटका देण्यासाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली… भाजपाचे चार प्रभावशाली नेते लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली… शेतकऱ्यांनी भाजपाला मतदान करू नये, असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केले… विधान परिषद निवडणुकीतून महाविकास आघाडीच्या उमेदवाराने अचानक माघार घेताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली…. आगामी काळात लाडकी बहीण योजनेतून आणखी ५० ते ६० लाख महिलांची नावे कमी केली जाऊ शकतात, असा दावा जयंत पाटील यांनी केला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

शिंदे गटाला फटका देण्याची ठाकरेंची तयारी?

विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात शिंदेसेनेला फटका देण्यासाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला रोखण्यासाठी ठाकरे गट भाजपाच्या बंडखोर उमेदवारांना बळ देणार असल्याची राजकीय वर्तुळात रंगली. भाजपाच्या मदतीने हा डाव रचला गेल्याचे सांगितले जाजत आहे. त्याबाबत माध्यमांनी खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता निकालाच्या वेळी याची स्पष्टता होईल, असे सूचक विधान त्यांनी केले. आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू शिंदे गटच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ठाकरे गटाच्या निर्णयावर साशंकता निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था हा एक मोठा घोडेबाजार आहे. यात सगळ्यांना उतरणे जमत नाही. त्यामुळे अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीपासून लांब रहावे लागते. नाशिकमध्येही सर्वांना घोडेबाजार काय असतो ते कळेल, असेही राऊत यांनी सूचित केले.

भाजपातील ४ नेते शिवसेनेच्या वाटेवर?

कल्याण-डोंबिवलीतील भाजपाचे चार प्रभावशाली नेते लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. शिंदेसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील सागाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिरातील सभागृहात हा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगितले जाते. शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असलेले भाजपाचे चारही नेते हे माजी नगरसेवक असल्याची माहिती आहे. भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जायचे. महापालिका निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्याने या चारही नेत्यांनी मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान, कल्याण, डोंबिवली परिसरातील आपली पक्षीय ताकद वाढविण्यासाठी शिंदेसेनेने इतर पक्षातील इच्छुकांना आपल्या पक्षात प्रवेश देण्याचा पुन्हा सपाटा लावला आहे. त्यामध्ये भाजपाच्याही नाराज नेत्यांचा समावेश असल्याने महायुतीत वाद वाढण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी भाजपाला मतदान करू नये : राऊत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने अखेर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार, दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. मात्र, योजनेत शासनाने अनेक जाचक अटी टाकल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला. त्यामुळे ही योजना फसवी असल्याची टीकाही करण्यात आली. त्यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले. देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्या घोषणा म्हणजे फसवणुकीचा प्रकार आहे. प्रत्येक योजनेत ते लोकांना फसवत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कडवट भूमिका घेऊन भाजपाला मदत करू नये, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानावर आता भाजपाकडून नेमकी काय प्रतिक्रिया दिली जाणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विधान परिषद निवडणुकीतून अचानक माघार

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ जागांसाठी येत्या १८ जूनला मतदान होणार आहे. त्याकरिता महायुती आणि महाविकास आघाडीने आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. यादरम्यान यवतमाळमधील काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी अचानकपणे उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या निर्णयामुळे आघाडीतील तीनही पक्षातील कार्यकर्त्यांना जोरदार धक्का बसला आहे. या निवडणुकीसाठी सुरुवातीला २० इच्छुकांनी ४८ नामांकन अर्जांची उचल केली होती. मात्र, त्यातील केवळ पाच जणांनी शेवटच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये महायुतीकडून शिंदे गटाचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांनी नामांकन भरले, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या साहेबराव कांबळे यांनी अर्ज दाखल केला होता. भाजपाचे समन्वयक नितीन भुतडा यांनीही उमेदवारी अर्ज भरल्याने या निवडणुकीत रंगत येण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र, कांबळे यांनी अचानकपणे उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जयंत पाटील यांची महायुती सरकारवर टीका

विधानसभा निवडणुकीत महिलांना आर्थिक मदतीची आश्वासने देत राजकीय लाभ मिळवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आता त्याच लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्यास सुरुवात केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून आतापर्यंत सुमारे ८० लाख महिलांना वगळण्यात आले असून पुढील काळात आणखी ५० ते ६० लाख महिलांची नावे कमी केली जाऊ शकतात, असा दावाही त्यांनी बुधवारी झालेल्या आंदोलनादरम्यान केला. नवी मुंबईत महागाईविरोधात महाविकास आघाडीतर्फे आयोजित आंदोलनानंतर माध्यमांशी संवाद साधताना पाटील यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणुकीपूर्वी महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र निवडणुका संपल्यानंतर लाभार्थींची छाननी करून नावे कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे चित्र दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. जयंत पाटील यांच्या या विधानामुळे लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढले असून आगामी काळात या योजनेतून आणखी नावे वगळली जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.