महाराष्ट्रातील आजच्या राजकीय बातम्या : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मतदार नोंदणीतील कथित गैरव्यवहार आणि एसआयआर फॉर्मच्या मुद्द्यावरून भाजपावर गंभीर आरोप केला… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यानंद बापट यांच्या मराठीचे तोंडभरून कौतुक करताना त्यांना एक महत्वाचा सल्ला दिला… भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांत अंतर्गत बंडाळ्या सुरू असून २०२९ पूर्वीच भाजपाचा खेळ संपेल, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला… शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पक्षातील ११ नगरसेवकांनी शिंदेसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला… दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून पवार कुटुंबातच मतभेद सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
उद्धव ठाकरेंचा भाजपावर गंभीर आरोप
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मतदार नोंदणीतील कथित गैरव्यवहार आणि एसआयआर फॉर्मच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपावर गंभीर आरोप केला. बीड विधानसभा मतदारसंघातील तब्बल २५० ‘बुथ लेव्हल एजंट्सनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ठाकरेंनी भाजपावर जोरदार टीका केली. भाजपा कार्यकर्तांना बोगस एसआयआर फॉर्म भरण्याचे काम हाच मोदींनी दिलेला रोजगार असल्याचा टोला ठाकरेंनी लगावला. भाजपा निवडणुका जिंकण्यासाठी खालच्या पातळीवर जाऊन डावपेच खेळत आहे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्येही मतदार वगळल्याचे प्रकार घडले असून, महाराष्ट्रातही त्याचीच प्रचिती दिसून येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, प्रत्येकाने मतदार याद्यांची काटेकोरपणे तपासणी करायला हवी, असे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले. बीडमधील पक्षाच्या राजकीय वाटचालीवर भाष्य करताना “आता पुन्हा एकदा बीड भगवा करण्याची संधी आली आहे,” असे म्हणत ठाकरेंनी आगामी राजकीय लढाईचे संकेत दिले.
फडणवीसांकडून बापटांच्या मराठीचे कौतुक
पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला विरोध करणारे विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी हल्ला झाला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात, पण हिंसा योग्य नाही. एखादा सण-उत्सव साजरा करताना तो पारंपरिक पद्धतीनेच साजरा करावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले. यादरम्यान त्यांनी बापट यांच्या शुद्ध मराठीचे तोंडभरून कौतुकही केले. “विद्यानंद बापट यांची मराठी सध्या ट्रेंडिंग आहे. मराठीच्या शुद्धतेचा नमुना त्यांच्या बोलण्यामध्ये पाहायला मिळतो. आता अपेक्षा एवढीच आहे की, जसे ते त्यांचे विचार शुद्ध मराठीत मांडतात, तसेच त्यांनी ते सर्वसमावेशकपणे मांडावेत. बापट यांच्यासारखी भाषा बोलायला मला तर ट्यूशनच घ्यावी लागेल. केवळ बापटच नाही, तर जी कोणती व्यक्ती अशी शुद्ध भाषा वापरते, तिचे बोलणे ऐकून आनंदच होतो,” अशी मिश्किल टिप्पणीही फडणवीस यांनी केली.
२०२९ पूर्वीच भाजपाचा खेळ संपेल : संजय राऊत
भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांत अंतर्गत बंडाळ्या सुरू असून २०२९ पूर्वीच भाजपाचा खेळ संपेल, असा सनसनाटी दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. केंद्र सरकारची जागतिक पातळीवर ‘थापेबाज सरकार’ अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यामुळे देशाचा जीडीपी वाढल्याचे सांगितले तरी जनतेचा त्यावर विश्वास बसत नाही. विरोधकांना त्रास देण्यासाठी आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी कायद्याचा वापर केला जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करीत आहेत. मात्र, सरकार या प्रश्नावर राजकारण करीत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. संविधानाचा वापर सोयीनुसार करणारे सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अडचणीत आल्यानंतर संविधानाची चौकट सांगत आहे. मराठा समाजाच्या मागण्या खरोखरच पूर्ण करायच्या असत्या, तर सरकारने सर्वपक्षीय नेत्यांना चर्चेसाठी बोलावले असते, असेही राऊत म्हणाले.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा होत असतानाच भुसावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला. भुसावळ नगरपालिकेतील दोन माजी नगराध्यक्षांसह तब्बल ११ नगरसेवकांनी शिंदेसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांमध्ये सचिन संतोष चौधरी, इक्बाल दिलनवाज शेख, उल्हास भीमराव पगारे, सुभद्रा गुंजाळ, अमीन कुरेशी, शेख नसीब शेख नदीम, सचिन भास्कर पाटील, अकील नादर पिंजारी, शबाना बी. सिकंदर खान, पुष्पा कैलास चौधरी आणि सुनीता कृषधनकर यांचा समावेश आहे. नगरसेवकांसोबतच काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही यावेळी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे भुसावळच्या स्थानिक राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
अपघाताच्या चौकशीवरून पवार कुटुंबात मतभेद?
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून पवार कुटुंबातच मतभेद सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अपघाताच्या तपासावरून प्रश्न उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यावर प्रत्युत्तर दिले होते. अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करु नये, आमचा तपास यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असे त्या म्हणाल्या होत्या. यानंतर आता या मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांनी अतिशय आक्रमक पद्धतीने आपली भूमिका मांडली आहे. अजित पवारांच्या पक्षातील ४० आमदारांनी अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. त्याबद्दल त्यांना स्मरण पत्रही द्यावे लागले. तुमच्या सरकारमध्ये तुम्हाला स्मरण पत्र द्यावे लागत असेल आणि त्यालाही केराची टोपली दाखवली जात असेल तर हे दुर्दैवी आहे. स्वाभिमानी लोक असते तर ते लगेच सत्तेच्या बाहेर गेले असते. स्वाभिमान सगळ्यांकडेच असतो असे नाही. स्वाभिमान टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्याप्रमाणे आम्ही लढत आहोत, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. त्यांच्या या टीकेवर सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
