आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : कोकणात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे तडकाफडकी राजीनामे दिले… महेश सावंत यांच्या आमदारकीला आव्हान देणारी सदा सरवणकर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यात केलेल्या एका विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले… आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालात फेरफार होण्याची शक्यता व्यक्त करत प्रकाश आंबेडकर यांनी विरोधी पक्षांना सतर्कतेचा इशारा दिला… बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार देण्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

शिवसेना ठाकरे गटात सामूहिक राजीनामे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला कोकणात मोठा धक्का बसला. रत्नागिरीतील युवासेनेचे प्रभावी नेते उमेश खताते यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे तडकाफडकी राजीनामे दिले. खताते हे आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर रत्नागिरीतील राजकीय वातावरण तापले असून ठाकरे गटाला मोठे खिंडार पडल्याची चर्चा रंगली आहे. युवासेनेत काम करीत असताना खताते यांनी स्थानिक पातळीवर पक्ष संघटना उभी करण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यामुळे त्यांचा स्थानिक पातळीवर चांगला जनसंपर्क आणि प्रभाव असल्याचे मानले जाते. यादरम्यान खताते यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे रत्नागिरीच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. त्यांनी धनुष्यबाण हाती घेतल्यास या भागात शिंदे गटाची राजकीय ताकद वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शिंदेंच्या शिलेदाराला न्यायालयाचा दणका

माहीम विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार महेश सांवत यांना उच्च न्यायालयाने मंगळवारी मोठा दिलासा दिला. त्यांच्या आमदाराकीला आव्हान देणारी शिंदे गटाचे सदा सरवणकर यांची निवडणूक याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच सरवणकर यांनी ही निवडणूक याचिका दाखल केली होती. सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या फौजदारी खटल्यांची माहिती लपवून ठेवली. असे करून सावंत यांनी मतदारांची दिशाभूल केल्याचा आरोप सरवणकर यांनी याचिकेद्वारे केला होता. तसेच ही माहिती न देणे हे सावंत यांना अपात्र ठरवण्यासाठी आणि २०२४ च्या माहीम विधानसभा निवडणुकीचे निकाल रद्द करण्यासाठी पुरेसे कारण असल्याचा दावाही सरवणकर यांच्यातर्फे युक्तिवाद करताना करण्यात आला होता. मात्र ही याचिका न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठाने फेटाळून लावत सरवणकर यांना मोठा दणका दिला.

आणखी वाचा : तमिळनाडूत भाजपासहित राजकीय पक्षांना ब्राह्मण उमेदवार का नको? काय आहे इतिहास?

शिंदेंच्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यात केलेल्या एका विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. दहिसर मिरा भाईंदर मेट्रो मार्गिकेच्या लोकार्पणाचा कार्यक्रम मंगळवारी पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मेट्रोला हिरवा कंदील दाखवण्यात आला. लोकार्पणानंतर माध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, २०१८ साली देवेंद्र फडणवीस यांनी या मेट्रोचे भूमिपूजन केले होते. त्याच प्रकल्पाचे लोकार्पण त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात होत असल्याचा आनंद आहे. मात्र २०१९ मध्ये स्थापन झालेल्या सरकारच्या काळात या कामाला ब्रेक लागला होता. त्यावेळी सत्तेत असलेल्यांचा पाय ब्रेकवर होता, तर माझा पाय एक्सलेटरवर आहे. मेट्रो प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठीच मी २०२३ मध्ये मुख्यमंत्री झालो होतो. यादरम्यान शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

प्रकाश आंबेडकरांचा विरोधी पक्षांना इशारा

आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालात फेरफार होण्याची शक्यता व्यक्त करत प्रकाश आंबेडकर यांनी विरोधी पक्षांना सतर्कतेचा इशारा दिला. ईव्हीएम आणि मतदानाच्या आकडेवारीतील तफावतीमुळे लोकशाही धोक्यात असल्याचा दावा त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे केला आहे. “महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर तब्बल ७६ लाख मतांची वाढ दिसून आली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती डॉ. परकला प्रभाकर यांनीही त्याबाबतचा दाखल दिला होता. आंध्र प्रदेशात रात्री ९ ते पहाटे २ वाजेपर्यंत मतदान सुरू होते, हे अत्यंत गंभीर असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील ‘पॅटर्न’ इतर राज्यांतही राबवला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत आंबेडकरांनी तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षांना सतर्कतेचा इशारा दिला.

हेही वाचा : राघव चड्ढा यांच्या खासदारकीचे काय? जाणार की राहणार? नियम काय सांगतो?

पोटनिवडणुकीवरून काँग्रेसमध्ये दोन गट?

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार देण्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक मैदानात उतरल्या आहेत. ही निवडणुकीत बिनविरोध होण्यासाठी महायुतीतील नेत्यांनी सुरुवातीपासून प्रयत्न केल्याचे दिसून आले. मात्र काँग्रेसने पोटनिवडणुकीत आकाश मोरे यांना उमेदवारी देऊन त्यांचा उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. त्यावरून पक्षात दोन गट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देणे योग्य नसल्याचे एका गटाचे मत आहे; तर दुसरा गट निवडणूक लढण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.