आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : ठाकरे गटात लवकरच मोठा फेरबदल होणार असून आदित्य ठाकरे यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली… राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू असतानाच जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाने भाजपालाच मोठा धक्का दिला… खरात प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री अदिती तटकरे यांनी महिला नेत्या म्हणून त्यांनी काय केले, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला… ठाणे महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ‘कैसे हराया?’ म्हणणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे नगरसेवक पद धोक्यात आले… भाजपाच्या बड्या नेत्यांनी सांगितल्यास करुणा मुंडे यांनी नक्कीच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असता, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

ठाकरे गटात लवकरच मोठा फेरबदल?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षात लवकरच मोठा फेरबदल होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. जून महिन्यात होणाऱ्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यातच खासदार संजय राऊत यांनीही याबाबत पत्रकार परिषदेत उत्तर दिल्याने या चर्चांना अधिकच हवा मिळाली. मात्र, या विषयावर खुद्द आदित्य ठाकरे यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट शेअर करीत याबाबत स्पष्टीकरण दिले. आज सकाळपासून काही टीव्ही चॅनेल्सवर बातमी आहे की, मला पक्षात काही पद दिले जाणार आहे. ह्या बातमीत काहीही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही. कृपया ह्याची सर्व माध्यमांनी नोंद घ्यावी, असे म्हणत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला.

आणखी वाचा : काँग्रेसमधील वाद मुख्यमंत्र्यांच्या उंबरठ्यापर्यंत; बड्या नेत्याला राजीनामा देण्याचे आदेश; प्रकरण काय?

शिंदेसेनेचा भाजपालाच मोठा धक्का

राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने जळगावात भाजपालाच मोठा धक्का दिला. भाजपाचे यावल शहराध्यक्ष राहुल बारी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली. विशेषतः भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रभावक्षेत्रात ही घटना घडल्याने या घटनेचे राजकीय महत्त्व अधिक वाढले. महाजन यांच्यासमोर शिंदे गटाने आव्हान उभे केले आहे. यावल नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपला आधीच पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पक्ष संघटनात्मक पातळीवर पुन्हा उभारी घेण्याचे प्रयत्न सुरू असताना शहराध्यक्षांचा पक्ष त्याग हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. परिणामी, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, काही ठिकाणी नाराजीचे सूरही उमटत आहेत.

सहर शेख यांचे नगरसेवक पद धोक्यात

ठाणे महापालिका निवडणूक विजयानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून ‘कैसे हराया?’ म्हणणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. बनावट जातीचा दाखला मिळवून शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा सहर शेख यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सहर शेख यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून आपल्या जातीचा बनावट दाखला काढला, अशी तक्रार त्यांच्याविरोधात करण्यात आली आहे. याशिवाय त्यांनी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ४ यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व प्रकारात आता सहर यांचं नगरसेवकपदचं धोक्यात येईल की काय असा सवाल आता उपस्थित होतो आहे. या प्रकरणात अंतिम निर्णय चौकशी अहवालानंतर होणार आहे. त्यामुळे सध्या सगळ्यांचे लक्ष तपास यंत्रणांच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.

खरात प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक

भोंदू अशोक खरात याचे एकापाठोपाठ एक कारनामे समोर येत असल्याने या प्रकरणावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री अदिती तटकरे यांनी महिला नेत्या म्हणून खरात प्रकरणात काय केले, असा प्रश्न अंधारे यांनी पत्रकार परिषदेतून उपस्थित केला. अमरावतीच्या परतवाडा प्रकरणातील आरोपीच्या घरावर प्रशासनाने बुलडोजर कारवाई केली. त्यामुळे खरात प्रकरणातही समान न्याय देण्याची मागणी करत दीप केसरकर आणि एकनाथ शिंदे यांचीही चौकशी व्हावी, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. तसेच खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकर यांना बळीचा बकरा बनवले जात असल्याचा आरोपही अंधारे यांनी केला. नोटीस नसताना प्रतिभा चाकणकर चौकशीसाठी का गेल्या, यावरही त्यांनी शंका उपस्थित केली.

हेही वाचा : भाजपामुळे शिंदे गटात वाद उफाळला? महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…

आमदार रोहित पवार यांचा मोठा दावा

भाजपाच्या बड्या नेत्यांनी सांगितल्यास करुणा मुंडे यांनी नक्कीच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असता, असा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी जाहीर करण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे रिंगणात आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. भाजपाच्या बड्या नेत्यांनी सांगितल्यास करुणा मुंडे यांनी नक्कीच उमेदवारी अर्ज मागे घेतला असता, असे रोहित यांनी म्हटले आहे. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात ज्या बाहेरच्या लोकांनी उमेदवारी अर्ज भरला त्यांना बारामतीतून एकही मतदान मिळणार नाही, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे.