Uddhav Thackeray on Waqf Act amendment Bill : मोदी सरकार ३.० ने ‘वक्फ बोर्ड अधिनियम – १९९५’ या कायद्यात सुधारणा करणारं विधेयक नुकतंच लोकसभेत सादर केलं. यासंदर्भात आधी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ४० सुधारणांवर चर्चा करून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र या सुधारित विधेयकाला अनेक विरोधी पक्षांनी व काही संघटनांनी विरोध केला आहे. इंडिया आघाडीतील पक्ष या सुधारित विधेयकाच्या विरोधात आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटानेही विरोध दर्शवला असला तरी मोदी सरकारने गुरुवारी (८ ऑगस्ट) वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत मांडलं तेव्हा ठाकरे गटाचे खासदार लोकसभेतील चर्चेवेळी अनुपस्थित होते. त्यामुळे ठाकरे गटाची गोची झाली आहे. या विधेयकाबाबत ठाकरे गटाची नेमकी भूमिका काय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. संसदेबाहेर विधेयकास विरोध केल्याने हिंदुत्ववादी संघटना व पक्ष ठाकरे गटाविरोधात आक्रमक झाले आहेत. तर संसदेत भूमिका न मांडल्यामुळे मुस्लिम समुदाय ठाकरे गटावर नाराज आहे.

शिवसेनेनं गेल्या अनेक दशकांपासून हिंदुत्वाचं राजकारण केलं आहे. त्यामुळे वक्फबाबतच्या सुधारित विधेयकाला विरोध दर्शवणाऱ्या ठाकरे गटाला हिंदुत्ववादी संघटनांचा रोष पत्करावा लागत आहे. दुसऱ्या बाजूला, गेल्या पाच वर्षांपासून ठाकरे गट काँग्रेसबरोबर आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मुस्लिम मतदारांनी भरभरून मतदानही केलं. मात्र वक्फबाबतच्या नव्या विधेयकाला संसदेत विरोध न केल्यामुळे ठाकरे गट मुस्लिम संघटनांच्या टीकेच्या केंद्रस्थानी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भूमिकेवर दोन्ही बाजूजे लोक साशंक आहेत.

दरम्यान, मुंबईतील मुस्लिमांच्या एका मोठ्या गटाने उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केलं. हे आंदोलक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने पैसे देऊन पाठवल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. मात्र या सर्व घटनांमुळे मुस्लिमांमध्ये ठाकरे गटाची प्रतिमा खराब झाली आहे.

हे ही वाचा >> लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार नाही; मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा निर्वाळा

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा पक्ष महाविकास आघाडीबरोबर निवडणुकीच्या मैदानात उतरला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवारांना मुस्लिम मतदारांनी जोरदार पाठिंबा दिला. त्यांचे राज्यात नऊ खासदार निवडून आले. मात्र वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाविरोधात ठाम भूमिका न घेतल्यामुळे मुस्लिम सुमदाय त्यांच्या पक्षावर नाराज आहे. नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते अहमद काझी म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी आमचा विश्वासघात केला आहे.”

लोकसभेतील चर्चेवेळी ठाकरे गटाचे खासदार अनुपस्थित का राहिले?

यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते म्हणाले, “ज्या दिवशी हे विधेयक संसदेत मांडलं तेव्हा उद्धव ठाकरे दिल्लीत होते. त्यांनी पक्षाच्या खासदारांची एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीमुळे खासदार त्या दिवशी सभागृहात उपस्थित नव्हते.” उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम समुदायाची बाजू घेतल्यास त्यांचा पारंपरिक हिंदुत्ववादी मतदार त्यांच्यापासून दुरावेल या भितीने ठाकरे गट वक्फबाबतच्या विधेयकवर ठाम भूमिका घेत नसल्याचा आरोप केला जात आहे.

हे ही वाचा >> अजित पवार यांच्याकडून मालेगावात अल्पसंख्यांकांना आपलेसे करण्याची खेळी

संजय राऊतांकडून सारवासारव

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सारवासारव करत म्हणाले, आमचा पक्ष विरोधकांच्या इंडिया आघाडीचा एक भाग आहे. विधेयक मांडलं तेव्हा खासदारांनी उपस्थित राहणं अत्यावश्यक नव्हतं. कारण विधेयक मंजूर झालेलं नाही. वक्फ बोर्डाच्या कामकाजावर चर्चा व्हायला हवी, असं आम्हाला वाटतं. जमीन घोटाळे ही एक मोठी समस्या असली तरी ते केवळ वक्फ बोर्डापुरतं मर्यादित नाही. या घोटाळ्यांच्या समस्येवर व्यापक चर्चा होणं आवश्यक आहे.

ठाकरे गटाची नेमकी भूमिका काय? खासदार अरविंद सावंत म्हणाले…

मात्र शिवसेनेने (उबाठा) या विधेयकाचा निषेध नोंदवला नसलयामुळे मुस्लिम नेते व संघटना त्यांच्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. विधीज्ञ व सामाजिक कार्यकर्ते झुबेर आझमी म्हणाले, ठाकरे गटाच्या संसदीय मंडळाचे सदस्य अरविंद सावंत यांच्याशी मी बोललो. त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की, ते या विधेयकाचा विरोध करतील. मी त्यांना म्हटलं की पक्षाने त्यांची भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे. भूमिका न मांडल्यामुळे लोकांमध्ये त्यांच्या पक्षाबाबत नाराजी पसरली आहे. ठाकरे गटाकडून याबाबत अधिकृत वक्तव्य येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. अरविंद सावंत हे ज्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत त्या मतदारसंघात मुस्लिम मतदार २५ टक्के आहेत व सावंत येथून ५०,००० मतांनी जिंकले आहेत.