आजच्या महत्वाच्या राजकीय बातम्या : शिवसेनेच्या खटल्याचा निकाल येण्यास वेळ लागणार असेल, तर धनुष्यबाण चिन्ह गोठवून टाकावे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली… शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत कठोर शब्दांत इशारा दिला… एमपीएससी परीक्षेच्या पेपरफुटीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपावर शाब्दिक हल्ला चढवला… मराठा समाजाला न्याय आम्हीच देणार असून त्याचसंदर्भात आमची चर्चा झालेली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले… डीजेबाबत भूमिका मांडताना दहीहंडीत नृत्यांगना नाचवणारे देशद्रोही असल्याचे विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
ठाकरेंच्या भूमिकेने शिंदेसेनेत खळबळ
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेनेच्या खटल्याचा निकाल येण्यास वेळ लागणार असेल, तर धनुष्यबाण चिन्ह गोठवून टाकावे, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले की, सध्या सत्तेत बसलेल्या राज्यकर्त्यांना सरकार चालवता येत नाही. आम्हाला आमच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळायला पाहिजे. खरे म्हणजे या मागणीसाठी खटला व्हायलाच नको होता. कारण बोगस पद्धतीने आमच्याकडून पक्षाचे नाव आणि चिन्ह घेण्यात आले. या खटल्यात एकूण चार वर्षे निघून गेली तरी तारीख पे तारीख असे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. यादरम्यान ठाकरे यांच्या मागणीवर शिंदे गटात मोठी खळबळ उडाली. यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या मांडीवर धनुष्यबाण ठेवण्याचे काम केले, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली. वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चालते, हे मतदारांनीही सिद्ध केले आहे, असेही ते म्हणाले.
मनोज जरांगे यांना शिंदे गटाचा इशारा
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात उपोषण सुरू केले आहे. मराठ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय तसूभरही माघार घेणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे. यादरम्यान सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केला होता. तसेच शिंदे आणि फडणवीसांची मिलीभगत असल्याचेही ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमच्या नेत्याला लक्ष्य केले जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे. मनोज जरांगेंना एवढेच सांगतो की त्यांनी संयम ठेवावा. आमच्या मुख्य नेत्यावर उगाच घसरू नये. त्यांनी टीका करणे सुरूच ठेवले तर एकही मराठा नेता गप्प बसणार नाही, असे गोगावले यांनी म्हटले आहे.
संजय राऊतांची भाजपावर सडकून टीका
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणानंतर राज्यात एमपीएससी परीक्षेच्या पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने टास्क फोर्सची नियुक्ती केली. यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, १० वर्षांपासून राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे राज्य आहे. ते महान गृहमंत्री आहेत. तरीही पेपरफुटीसारख्या प्रकरणांनी मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. ‘नीट’, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये भाजपचे कार्यकर्ते आहेत. यूपीएससी प्रकरणात पुणे आणि लातूरातून जे आरोपी पकडले ते भाजपशी संबंधित असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. लोकसेवा आयोग बरखास्त केला पाहिजे. सर्वसमावेशक पद्धतीने प्रक्रिया आणि परीक्षा झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
मराठा आरक्षणाबाबत फडणवीसांचे विधान
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठे विधान केले. संविधानात असेल ते मराठा समाजाला नक्की मिळेल, असे त्यांनी सांगितले. कुणाच्या ताटातले काढून कुणाच्या ताटात टाकणाऱ्यातले आम्ही नाह. मराठा समाज असो वा इतर समाज असो सर्व समाजाला आम्ही न्याय दिला आहे. मराठा समाजालाही आम्हीच न्याय देणार आहोत. त्यासंदर्भात आमची चर्चा झाली आहे. जे शक्य आहे ते सर्व आम्ही करू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेनंतर मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
“दहीहंडीत नृत्यांगना नाचवणारे देशद्रोही”
डीजेबाबत भूमिका मांडताना दहीहंडीत नृत्यांगना नाचवणारे देशद्रोही असल्याचे विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले. तसेच, डीजे आणि डॉल्बी हे उखडून फेकले पाहिजेत. त्याचा उपयोग काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक टाकळी या गावातील नागरिकांनी एमआयडीसीला विरोध करण्यासाठी आंदोलन केले. त्यात संभाजी भिडे यांनीही सहभाग घेतला होता. यावेळी भिडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दहिहंडीच्या कार्यक्रमात महिला नाचवणे हा महामूर्खपणा आहे. ते देशद्रोही आहेत. जरी ते आपले असले तरी असा प्रकार करणारे देशद्रोही आहेत अशा शब्दात आयोजकांवर घणाघात केला. त्यांच्या या विधानाची समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे.
