Uddhav Thackeray Tour Rebel MP : उद्धव ठाकरे आगामी दिवसांत शिवसेनेच्या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये दौरे करणार आहेत. शिवसेनेने दिल्लीत बोलावलेल्या संसदीय पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला लोकसभेचे नऊपैकी सहा खासदार अनुपस्थित राहिले होते. तसेच त्या आधी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीलाही खासदार अनुपस्थित होते. शिवसेनेचे सहा बंडखोर खासदार वेगळा गट स्थापन करून शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मुंबईतील ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून २१ जून रोजी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरूवात झाली आहे. पक्षात पुन्हा एकदा फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे स्थानिक पातळीवर जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा बंडखोर खासदार कोण?
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा बंडखोर खासदारांनी वेगळा गट स्थापन करत असल्याचे तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होत असल्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्याची चर्चा आहे. या सहा बंडखोर लोकसभा खासदारांमध्ये परभणीचे संजय जाधव, यवतमाळ-वाशिमचे संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील आणि धाराशिवचे ओमराजे निंबाळकर यांचा समावेश आहे.
उद्धव ठाकरेंचा दौरा कसा असेल?
शिवसेनेत पुन्हा एकदा फूट पडण्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांत दौरा करणार आहेत. २१ जून रोजी उद्धव ठाकरे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भांडूप आणि कांजूरमार्गचा दौरा करणार आहेत. तर २७ जून रोजी यवतमाळ-वाशिम आणि हिंगोली, २८ जून रोजी परभणी आणि धाराशिव, २९ जून रोजी शिर्डीचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यांदरम्यान सामान्य शिवसैनिकांना उद्धव ठाकरे भावनिक साद घालणार आहेत.
शिवसेनेतील फूट
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेत एकूण नऊ खासदार आहेत. बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीत फक्त तीन खासदारांनी उपस्थिती दर्शवली. बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना एक पत्र दिल्याचे सांगितले जाते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर बसण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी बंडखोर खासदारांनी केल्याची चर्चा आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी दिल्लीतील बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच पक्षांतर कायद्यानुसार अपात्र ठरवले जाईल, असा इशाराही दिला होता.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात बंडखोर खासदारांचा उल्लेख “गद्दार” असा केला होता. तसेच त्यांच्या नेतृत्वाबाबत सामान्य कार्यकर्त्याला विश्वास नसेल तर शिवसेना पक्षप्रमुख पद सोडण्यासाठी आपण तयार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही, तसेच ते मतदारसंघांमध्ये दोरै करत नाहीत, असा आरोप बंडखोर खासदारांनी ठाकरेंवर केला आहे.
शिवसेनेचे (ठाकरे) लोकसभेचे दोन-तृतियांश खासदार फुटत असल्यामुळे त्यांना कायद्याने संरक्षण मिळू शकते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या खासदारांची मनधरणी करण्यापेक्षा मतदार व सामान्य शिवसैनिकांना भावनिक साद घालण्यास सुरूवात केली आहे. मतदारांना सुरक्षित करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काम करण्यास सुरूवात केली आहे.
बंडखोरांची मनधरणी
शिवसेनेचे (ठाकरे) आमदार कैलास पाटील यांनी पुण्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांचा वैयक्तिक निरोप त्यांनी निंबाळकरांपर्यंत पोहोचवत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. जे परततील त्यांचे स्वागत आहे, असे म्हणत आदित्य ठाकरेंनीही बंडखोरी टाळण्यासाठी प्रयत्न केला. दरम्यान, या प्रयत्नांना उशीर झाल्याचे म्हटले जात आहे. बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्याची चर्चा आहे. तसेच बंडखोर खासदारांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनी झालेल्या कार्यक्रमालाही हजेरी लावली नाही.
शिवसैनिकांना भावनिक साद
शिवसेनेच्या ६० व्या वर्धानपदिनी झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी सामान्य शिवसैनिकांना भावनिक साद घातली. तसेच त्यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांतील मतदारांची माफी मागितली. आपण निवडून दिलेल्या खासदारांनी विश्वासघात केल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी मतदारांची माफी मागितली. स्थानिक पातळीवरील शिवसैनिकांना नेतृत्वावर विश्वास नसेल तर शिवसेना पक्ष प्रमुख पदावरून पायउतार होईल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. बंडखोरांनी केलेले आरोप खोडून काढण्यासाठी तसेच भावनिक साद घालण्यासाठी ठाकरे यांनी ही भूमिका घेतली. शिवसेनेचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होईल, अशी भीती होती म्हणून बंड केले असे बंडखोर खासदारांचे म्हणणे असल्याबाबत ठाकरे म्हणाले, ३० वर्षांपासून भाजपाबरोबर मैत्री असताना आम्ही भाजपात विलीन झालो नाही, तर काँग्रेसमध्ये कसे विलीन होऊ शकतो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ऑपरेशन यशस्वी, रूग्ण सुस्थितीत – देवेंद्र फडणवीस
शस्त्रक्रिया (ऑपरेशन) यशस्वी झाली असून, रूग्ण सुस्थितीत आहे, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांच्या फुटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली. तर लवकरच खासदारांच्या फुटीवर ‘ब्रेकिंग न्यूज’ मिळेल असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी ही फूट यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.
