मुंबई : मुंबईतील उत्तर भारतीय व जैन समाज हा भाजपची मतपेटी मानली जात असून ही मतपेटी आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरे गटाने सुरु केला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागील चार दिवसांत भाईंदर येथील उत्तर भारतीयांच्या गोवर्धन पूजा कार्यक्रमाला व कुर्ला येथील जैन समाजाच्या सभेला आवर्जून हजेरी लावली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा, आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या समाजांना खुश करण्यावर ठाकरे यांनी भर दिला आहे. मुंबईत एकूण लोकसंख्येच्या वीस टक्के उत्तर भारतीय तर पाच लाख जैन समाजाची मते आहेत. हेही वाचा : शिवसेना लढणाऱ्या मतदारसंघांमध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा, अजितदादांचा दावा असलेल्या शिरुरमध्येही सभा मागील काही वर्षात मुंबईतील बिहार व उत्तर प्रदेशातील रहिवाशांची संख्या मुंबईत झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे ही मतपेटी आर्कषित करण्याचा सर्वच पक्ष प्रयत्न करीत आहेत. या स्पर्धेत भाजपने बाजी मारल्याचे दिसून आले आहे. शिवसेना भाजप युती मध्ये ही या मतपेटीचा फायदा दोन्ही पक्षांना होत होता. त्यामुळे मुंबईतील लोकसभा व विधानसभा मतदार संघावर युतीचा वरचष्मा असलाचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगाने चार वर्षापूर्वी शिवसेना भाजपा युती तुटली. गेली अनेक वर्ष शिवसेना भाजपाची मतपेटी असलेले उत्तर भारतीय व जैन समाज यामुळे विभागला गेला आहे. आगामी लोकसभा विधानसभा आणि पालिका निवडणूकीत ही मतपेटी काही मतदार संघात निर्णायक ठरणार आहे. गेल्या वर्षी शिवसेनेत उभी फूट पडल्याने शिवसेना ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे. हा तोटा भरुन काढण्यासाठी ठाकरे गटाने अनेक प्रयत्न सुरु केले असून मुंबईतील उत्तर भारतीय व जैन, गुजराती समाजाची संपूर्ण माहिती जमा करण्याचे काम हाती घेतले आहे. या समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जाण्याचा प्रयत्न ठाकरे गटातील प्रत्येक नेता करीत असून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी चार दिवसांपूर्वी भाईंदर येथील उत्तर भारतीय यादव समाज सेवा संस्था यांनी आयोजित केलेल्या गोर्वधन पूजेला आर्वजून हजेरी लावली. हेही वाचा : येडीयुरप्पांवर ४० हजार कोटींच्या कोविड घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या भाजपाच्या नेत्यावर पक्ष कारवाई करणार? उत्तर भारतीय आणि मराठी ही दुधात साखर विरगळून जावी असे मुंबईत एकमेकात मिसळून गेले आहेत. देश एका संकटातून वाटचाल करीत आहे. देशातील हुकूमशाही सरकार बदलण्यासाठी मला तुमचे अर्शिवाद आणि शुभेच्छा पाहिजेत असे ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना आवाहन केले. सोमवारी ठाकरे यांनी जैन समाजाच्या कुर्ला येथील सभेला उपस्थिती लावून ठाकरे गटाच्या पाठिशी उभे राहण्याचे अप्रत्यक्ष विनंती केली. त्यामुळे मुंबईतील भाजपची मतपेटी भेदण्याचा प्रयत्न ठाकरे गट करीत असल्याचे दिसून येत आहे.