आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला… सर्वोच्च न्यायालयातील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर आम्ही समाधानी असून आता आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला… कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे ब्रह्मवाक्य नाही, आमची बाजू मांडल्यानंतर तुम्हाला खरी परिस्थिती समजेल, अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली… शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारे यांना खासदारकी मिळाल्याने ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याची टीका भाजपा आमदाराने केली… गडचिरोली येथील आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी प्रशासनावर चांगलाच संताप व्यक्त केला… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

“एकनाथ शिंदेंची निवडच लोकशाही विरोधी”

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश सूर्यकांत, व्ही. मोहना आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर झालेल्या या सुनावणीत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी निवडणूक आयोगाचे निर्णय आणि एकनाथ शिंदे यांच्या निवडीलाच आव्हान दिले. शिवसेना पक्षाच्या १९९९ च्या घटनेत मुख्य नेता असा उल्लेखच नाही. मग शिंदे स्वत:ला मुख्य नेता कोणत्या आधारावर म्हणवून घेता? २०१८ मध्ये शिवसेनेत करण्यात आलेला घटनाबदल संवैधानिक नाही, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे, मग त्याच घटनाबदलानुसार त्यांची निवड संवैधानिक कशी? असा मुद्दा सिब्बल यांनी उपस्थित केला. पक्षात आले, लाभ घेतला आणि नंतर पक्षच लोकशाहीविरोधी असल्याचे ते म्हणतात. मुळात शिंदे यांचीच निवड लोकशाही विरोधी असल्याचा दावाही सिब्बल यांनी केला. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी दुपारी २ वाजता होणार आहे. त्यामुळे सिब्बल आणखी काय बाजू मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आता आम्हाला न्याय मिळेल : संजय राऊत

सर्वोच्च न्यायालयातील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर आम्ही समाधानी असून आता आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी व्यक्त केला. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, शिवसेनेच्या प्रकरणात पावला-पावलांवर संविधान आणि घटनेचा भंग झाला आहे. त्यामुळे आज कपिल सिब्बल यांनी संविधानाच्या दृष्टीने बाजू मांडली आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाची पिसे काढली. निवडणूक आयोगाची प्रत्येक स्टेप ही कशी चुकली, याबाबत सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद ऐतिहासिक आहे. भविष्यातील निकालासाठी ही सकारात्मक बाब आहे. आम्ही सगळे समाधानी आहोत, आम्हाला आता न्याय मिळेल असा आत्मविश्वास वाटत आहे. आमचा न्यायालयावर पूर्णपणे विश्वास आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदेसेनेची प्रतिक्रिया

कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे ब्रह्मवाक्य नाही, आमची बाजू मांडल्यानंतर तुम्हाला खरी परिस्थिती समजेल, अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हस्के म्हणाले की, ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करणारे कपिल सिब्बल यांनी न्यायालयाकडे पुन्हा आपले म्हणणे ऐकून घेण्यासाठी वेळ मागितला आहे. आज सिब्बल हे तब्बल एक तास न्यायालयात उशीरा आले होते आणि यापुढेही ते अशीच वेळ मागतील. ठाकरे गटाच्या वतीने कायम भावनिक वातावरण तयार केले जात आहे. आजच्या सुनावणीत नवीन काही दिसले नाही. शिवसेना पक्ष पण हा आमच्या सोबत आहे. बाळासाहेबांचे विचार युबीटीने सोडले तेच त्यांना भोगावे लागत आहे. कपिल सिब्बल म्हणजे ब्रम्हवाक्य नाही. आमचा युक्तिवाद होईल त्यावेळी त्यांना समजेल, अशी सूचक प्रतिक्रियाही म्हस्के यांनी दिली.

सुषमा अंधारेंच्या डोक्यावर परिणाम झालाय : भाजपाची टीका

शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारे यांना खासदारकी मिळाल्याने ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याची टीका भाजपा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केली. अंधारेंचा पायगुण असा आहे की, त्या ठाकरे गटात गेल्या आणि त्या पक्षाचेही अस्तित्वच संपल्यासारखे झाले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. सुषमा अंधारे यांनी भाजपाचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपाच्या नेत्यांनी अंधारे यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी आमदार, नगरसेवक अशी ताकद निर्माण केली आहे. पण, सुषमा अंधारे आल्या आणि त्यांच्या मागे साधा सरपंचही दिसला नाही. सार्वजनिक जीवनात काम करत असताना आमच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत. अंधारे ज्या पक्षात काम करतात त्या पक्षातील नेत्यांच्या गुन्ह्यांची यादी वाचून दाखवावी, असे आवाहन कल्याणशेट्टींनी केले.

आमदार रोहित पवार यांचा प्रशासनावर तीव्र संताप

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील एका अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत विषारी सापाने सहा मुलींना दंश केला, ज्यामध्ये तीन विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आश्रमशाळांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा निधी लाटला जातो, तरीही आपल्या लेकींना जमिनीवर झोपावं लागतं. त्यांना साध्या खाटांची सोय देखील करता येत नसेल, तर हा निधी नेमका कुणाच्या खिशात जातो? स्वतःला ‘गतिमान’ म्हणवून घेणारं हे सरकार या लाजीरवाण्या कारभाराची चौकशी करण्याचं धाडस दाखवणार की नेहमीप्रमाणे पांघरूण घालणार? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला. विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे झालेला मृत्यू हा केवळ अपघात नसून या निर्दयी व्यवस्थेने केलेला ‘प्रशासकीय खून’ असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला. तसेच, या प्रकरणातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पीडित कुटुंबीयांना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.