scorecardresearch

मराठवाडा साहित्य संमेलनावर उद्धव ठाकरेंच्या पक्षाची छाप

घनसावंगी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. संघटनात्मक कामांचा मागील पस्तीस वर्षांपेक्षा अधिक अनुभव असल्याने उद्धव ठाकरे यांना केंद्रबिंदू ठेवूनच या अधिवेशनाची तयारी केली हाेती.

मराठवाडा साहित्य संमेलनावर उद्धव ठाकरेंच्या पक्षाची छाप
सिद्धार्थनगरमधील रहिवासी पुन्हा रस्त्यावर (फोटो लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

प्रसिद्ध लेखक आणि शरद जाेशी यांच्या शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते शेषराव माेहिते यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या राैप्य महाेत्सवी वर्षाचे निमित्त साधून जालना जिल्ह्यातील घनसावंगी या तालुक्याच्या ठिकाणी दाेन दिवस आयाेजित केलेल्या ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनावर स्वागताध्यक्ष शिवाजीराव चाेथे आणि पर्यायाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचीच छाप हाेती. १९८४ मध्ये महाड (रायगड) येथे झालेल्या शिवसेनेच्या अधिवेशनात चाेथे यांची पक्षाचे जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आणि या पदावर ते जवळपास पंचेवीस वर्षे राहिले. १९९५ मध्ये विधानसभा सदस्य पदावर निवडून आल्यावर त्यांनी घनसावंगी येथे महाविद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर विधानसभेच्या दाेन निवडणुका लढविल्या. परंतु त्यांना यश आले नाही. नंतरच्या म्हणजे मागील दाेन निवडणुकांत शिवसेनेने घनसावंगी मतदारसंघात हिकमत उढाण या नवीन चेहऱ्यास उमेदवारी दिली. परंतु त्यांना राष्ट्रवादीचे राजेश टाेपे यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. 

हेही वाचा- रायगडमध्ये ग्रामपंचायतीत शिंदे गटाचा वरचष्मा, ५० पैकी ३८ बिनविरोध ग्रामपंचायती बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे

शिवसेनेच्या या पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेमुळे शिवाजी चाेथे यांना हिकमत उढाण यांच्यासारखा पर्याय उभा राहिला. या सर्व घडामाेडीत चाेथे मात्र उद्धव ठाकरे यांच्यासाेबतच राहिले. आता मराठवाडा साहित्य संमेलनाच्या आयाेजनामुळे चाेथे यांना उद्धव ठाकरे यांच्यासमाेर आपले अस्तित्व अधाेरेखित करण्याची संधी मिळाली, असे मानले जात आहे. संघटनात्मक कामांचा मागील पस्तीस वर्षांपेक्षा अधिक अनुभव असल्याने उद्धव ठाकरे यांना केंद्रबिंदू ठेवूनच चाेथे यांनी या अधिवेशनाची तयारी केली हाेती. युवा सेनेत पदाधिकारी असलेले त्यांचे पुत्र विनायक चाेथे यासाठी त्यांच्या मदतीला हाेते. तर स्वागत समितीत जालना जिल्हा शिवसेना प्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भास्कर अंबेकर आणि ए. जे. बाेराडे यांच्यासह माजी आमदार संताेष सांबरे हाेते.

हेही वाचा- गुजरातमधील भाजपच्या यशात मराठी नेत्याची भूमिका महत्त्वाची

जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निमंत्रण पत्रिकेत कुठेही स्थान नव्हते. जिल्ह्यातील भाजपच्या तीन आमदारांची नावे उद्घाटन समारंभाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये हाेती. परंतु त्यापैकी एकाही आमदाराने मात्र, उपस्थिती लावली नाही. उद्धव ठाकरे उदघाटक असल्याने व्यासपीठावर निमंत्रित नसणाऱ्या पुढाऱ्यांचीही गर्दी झाली. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेतील विराेधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब, खासदार अनिल देसाई, खासदार संजय जाधव, उपनेते लक्ष्मण वडले यांच्यासह अनेकांची उपस्थिती व्यासपीठावर हाेती. महाविकास आघाडीतील आमदार राजेश टाेपे (राष्ट्रवादी) आणि आमदार कैलास गाेरंट्याल (काँग्रेस) हेही शिवसेनेच्या या गर्दीत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हाेते. 

उद्घाटन कार्यक्रमात मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष काैतिकराव ठाले पाटील यांनी चाेथे यांना संमेलनाच्या यजमान पदाबद्दल धन्यवाद दिले आणि त्यासाठी त्यांनी कुणाकडून ” खाेके ” घेतले नसल्याचे सांगितल्यावर व्यासपीठावर हास्याची लकेर उमटली. उद्धव ठाकरे यांनी उद्घाटनपर भाषणात राज्यपाल काेश्यारी यांच्यावर टीका केली आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबद्दल भूमिका स्पष्ट करण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली.

हेही वाचा- खडसेंच्याविरोधात उत्पादकांचा कौल; जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक निकाल

मराठवाड्याच्या प्रश्नांसंबंधी एका परिसंवादात माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण यांनी राज्यात महापुरुषांचा अवमान करण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याचे सांगून उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर त्यावर कळसच केल्याची टीका केली. शिवसेनेतून वेगळे हाेऊन शिंदे गटात गेलेले ४० आमदार काहीही करू शकतात, असे सांगन मराठवाड्याचे विकास विषयक प्रश्न साेडविण्यासाठी सर्व पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे समन्वयक म्हणून काम करण्याचे आवाहन त्यांनी व्यासपीठावरील माजी राज्यमंत्री तथा शिंदे गटातील अर्जुनराव खाेतकर यांना केले. मागील वर्षातील विकास कामांना स्थगिती दिल्यावरून त्यांनी राज्य सरकारवर टीकाही केली.

संमेलनात एकूण तेरा ठराव संमत करण्यात आले. महापुरुषांबद्दल अनैतिहासिक आणि अवास्तक शेरेबाजी राज्यपाल भगतसिंह काेश्यारी सतत करीत आहेत. त्यामुळे अशा दुष्ट प्रवृत्तींचा आणि काेश्यारी यांचा हे संमेलन निषेध करत आहे. असा ठराव या संमेलनात संमत करण्यात आला. तर निवडून आल्यानंतर मतदारांचा विश्वासघात करून पक्षांतर करण्याची कृती लाेकशाहीला काळिमा फासणारी असून अशा अनैतिक वर्तनामुळे भ्रष्टाचारास चालना मिळते. अशा प्रतिनिधींना परत बाेलविण्याचा अधिकार असणारा कायदा संसदेत तसेच राज्य विधिमंडळात करावा, असा ठरावही या संमेलनात संमत करण्यात आला. 

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-12-2022 at 15:03 IST

संबंधित बातम्या