आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : ठाकरे गटातील १६ आमदारांसह ७ खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येतील, असा खळबळजनक दावा आमदार कृपाल तुमाने यांनी केला… शिवसेनेची पुनरावलोकन मोहीम आधीच पूर्ण झाली असून गद्दार बाहेर गेल्याने पक्ष शुद्ध झाला, असा टोला माजी खासदार विनायक राऊत यांनी लगावला… महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात काँग्रेसची राजकीय तब्येत बिघडलेली असल्याची खोचक टीका शिंदेसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी केली… शरद पवार – उद्धव ठाकरे यांच्याइतका लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना भेटणारा नेता या क्षणी महाराष्ट्रात नाही, असे संजय राऊत म्हणाले… भाजपाने पैशांच्या बळावर उमेदवार फोडले आणि आता मतदारांनाही फोडलं जातंय, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या उमेदवाराने केला… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा फूट?

राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच शिंदेसेनेतील आमदाराने एक खळबळजनक दावा केला. ठाकरे गटातील १६ आमदारांसह ७ खासदार शिंदेसेनेत येतील, असे आमदार कृपाल तुमाने यांनी म्हटले आहे. ऑपरेशन टायगर पूर्ण झाले असून आता फक्त तारीख बाकी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. दुसरीकडे- ठाकरे गटाकडून हा दावा फेटाळून लावण्यात आला आहे. दरम्यान, ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला ९ पैकी ५ खासदारांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. ठाकरे गटाचे प्रभावशाली नेते संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यामागील कारणेही स्पष्ट केली होती. तरीदेखील ठाकरेंचे आमदार आणि खासदार हे आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटातील नेत्यांकडून केला जात आहे.

पक्षफुटीवरून विनायक राऊतांचा टोला

शिवसेनेची पुनरावलोकन मोहीम आधीच पूर्ण झाली असून गद्दार बाहेर गेल्याने पक्ष शुद्ध झाला, असा सणसणीत टोला ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी लगावला. वादळात टिकून राहणारेच खरे शिवसैनिक असतात. संकटाच्या काळात ज्यांनी साथ सोडली, ते आपोआप बाजूला गेले. मात्र ठाकरेंच्या विचारांशी एकनिष्ठ राहिलेली फळी आज अधिक सक्षमपणे उभी आहे, असेही ते म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथे ठाकरे गटातर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला विनायक राऊत यांनी हजेरी लावली. त्यापूर्वी झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली. रत्नागिरी जिल्ह्यात खऱ्या अर्थाने पुनरावलोकन मोहीम पार पडली आहे. शिवसेनेशी बेइमानी करणारे, स्वार्थासाठी निष्ठा विकणारे आणि संधीसाधू राजकारण करणारे अनेक जण पक्षातून निघून गेले. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शिवसेनेचे शुद्धीकरण झाले आहे. आजची शिवसेना ही धुवून-पुसून स्वच्छ झालेली, गद्दारमुक्त आणि निष्ठावंत शिवसैनिकांची शिवसेना आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

आमदार बच्चू कडू यांची काँग्रेसवर टीका

विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक चांगलीच गाजू लागली आहे. या रणधुमाळीत शिंदेसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात काँग्रेसची राजकीय तब्येत बिघडलेली दिसते आहे. राज्यामध्ये अनेक जागा बिनविरोध झाल्या, पण एवढा मोठा पक्ष असूनही काँग्रेसला प्रभावी उमेदवार उभा करता आला नाही. साधा उमेदवारही मिळत नाही, आणि उभा केलेल्या उमेदवारालाही रुग्णालयात दाखल व्हावे लागते; यापेक्षा दुर्दैवी बाब कोणती? अशा शब्दांत बच्चू कडू यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासून काँग्रेसने आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जिल्ह्यात साधी बैठकही घेतलेली नाही, काँग्रेसचा प्रदेश पातळीवरील एकही मोठा नेता अद्याप प्रचारात उतरलेला नाही. उमेदवार स्वतः आजारी असल्याने घरीच राहून केवळ ‘डिजिटल प्रचारा’चा दावा करत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी काँग्रेसवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

पक्षफुटीच्या चर्चेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

शरद पवार – उद्धव ठाकरे यांच्याइतका लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना भेटणारा नेता या क्षणी महाराष्ट्रात नाही, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना दिली. शरद पवार, उद्धव ठाकरे, आम्ही सगळे लोकप्रतिनिधींना भेटत असतो. मातोश्रीचे दरवाजे सदैव उघडे आहेत, असेही त्यांनी सांगितले. राज्यात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे काही खासदार हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरून ठाकरे गटातील खासदार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत का? असा प्रश्न माध्यमांनी संजय राऊत यांना विचारला. त्यावर प्रतिक्रिया देताना आमच्या पक्षात कोणीही नाराज नसून शिवसेना फुटीच्या जाणीवपूर्वक वावड्या उठवल्या जात आहेत. शरद पवार यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याइतका लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना भेटणारा नेता या क्षणी महाराष्ट्रात नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या उमेदवाराचा भाजपावर गंभीर आरोप

भाजपाने आधी पैशांच्या बळावर उमेदवार फोडले आणि आता मतदारांनाही फोडलं जात आहे, असा गंभीर आरोप विधान परिषदेच्या धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांनी केला. विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या असून उद्या म्हणजेच गुरुवारी या निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्याआधी एबीपी माझाशी बोलताना महेश देशमुख यांनी भाजपावर घोडेबाजाराचा आरोप केला आहे. भाजपचे उमेदवार बसवराज पाटील हे केवळ स्वतःची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. बसवराज पाटील यांना निवडून दिल्यास काहीही उपयोग होणार नाही, त्यांनी कधीही कोणाचा विचार केला नाही, असेही महेश देशमुख यांनी म्हटले आहे.