आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : राज्यात विधान परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच ठाकरे गटातील प्रभावशाली नेत्याने आपल्या पदांचा राजीनामा दिला… विधान परिषद निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतल्याने काँग्रेसकडून पक्षातील दोन नेत्यांची तातडीने हकालपट्टी करण्यात आली… खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधून किती बँगा भरून आणल्या याचा हिशेब द्यावा, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली… खरात प्रकरणात महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांना बळीचा बकरा बनवण्यात आले, असे विधान रोहित पवार यांनी केले… मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून त्यांची आणखी एक मागणी राज्य सरकारने मान्य केली. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
ठाकरेंच्या शिलेदाराचा तडकाफडकी राजीनामा
राज्यात विधान परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. ठाकरे गटाचे अमरावतीचे जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांनी आपल्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, पडोळे हे लवकरच आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून पडोळे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सध्या अमरावतीत सुरू आहे.
काँग्रेसमधून दोन नेत्यांची तातडीने हकालपट्टी
विधान परिषद निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतल्याने काँग्रेसमधून दोन नेत्यांची तातडीने हकालपट्टी करण्यात आली. पक्षाच्या आदेशाशिवाय उमेदवारी अर्ज मागे घेतल्याप्रकरणी यवतमाळचे काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात वागणाऱ्या नेत्यांना स्पष्ट संदेश देण्याचा प्रयत्न मानला जात आहे. काँग्रेसकडून निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेदवारांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
खासदार संजय राऊतांवर भाजपाचे टीकास्त्र
खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधून किती बँगा भरून आणल्या याचा हिशेब द्यावा, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार चालू असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. या आरोपांना आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. पक्षातील माणसे टिकवण्यासाठी पैसा नाही तर प्रेम आणि माणुसकी लागते. मात्र संजय राऊत आणि त्यांच्या नेतृत्वाकडे माणुसकीच उरलेली नसल्याने त्यांच्याकडे ना कार्यकर्ते टिकले, ना नेते टिकले. भारतीय जनता पार्टी आणि महायुती प्रेमाने माणसे जोडण्याचं काम करते. राऊतांच्या उद्धवसेनेने नाशिकमध्ये उमेदवार दिला नाही, मग त्या बदल्यात किती बॅगा भरून नेल्या? ज्या १५० कोटींचा ते आरोप करतात, त्या आरोपांपूर्वी राऊतांनी नाशिकचा हिशेब द्यावा, अशा शब्दांत बन यांनी टीकास्त्र सोडले.
आमदार रोहित पवार यांचे मोठे विधान
नाशिक येथील भोंदू अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांना बळीचा बकरा बनवण्यात आले, असे विधान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले. अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची संपूर्ण देशात चर्चा झाली होती. त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले होते. तसेच एका बँकेच्या घोटाळ्यातही त्याचे नाव समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सध्या तपासणी सुरू आहे. या प्रकणात अनेक राजकारणी नेत्यांची नावे समोर आली होती. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यादरम्यान आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य करत इतर अनेक नेत्यांचा सहभाग असल्याचे विधान केले आहे. तसेच चाकणकर यांना बळीचा बकरा बनवण्यात आले, असेही त्यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांची मोठी मागणी मान्य
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून त्यांची आणखी एक मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना सरकारकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या मराठा आंदोलनांत एकूण ३०९ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. ३४ व्यक्तींच्या कुटुंबांना सरकारकडून मदत मिळणे अद्याप बाकी होते. अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मृतांच्या वारसदारांना दिल्या जाणाऱ्या मदतीचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने या मृत व्यक्तींच्या वारसदारांसाठी २७ कोटी ५० लाख रुपये मंजूर केले आहेत.
